पोलिसांच्या 'या' कृत्याचे होतेय सर्वत्र कौतुक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवीच्या यात्रोत्सव दरम्यान देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासून शहर-परिसरातील भाविक महिलांची गर्दी होती. त्यातच ऑक्‍टोबर हिटच्या तडाख्याने रांगेत उभ्या असलेल्या भाविक महिलांची तहान (नाशिक) मुंबई नाका पोलिसांनी भागविली. दर्शनासाठी रांगेत ताटकळत भर उन्हात थांबलेल्या भाविक महिलांसाठी ट्रस्टकडून पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांनी पाण्याच्या बाटल्या मागवित या भाविक महिलांची तहान भागविली.
 

नाशिक : नवरात्रोत्सवात कालिका देवीचा यात्रोत्सव असतो. त्यानिमित्ताने रोज हजारो भाविक कालिका देवी दर्शनासाठी येतात. सिडको, सातपूर, पंचवटी, आडगाव, नाशिकरोड या लांबच्या उपनगरातूनच नव्हे तर आसपासच्या खेड्यापाड्यातूनही महिला भाविक कालिका देवी दर्शनासाठी भल्या पहाटे पायी येतात. सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गर्दी असते. तर, सायंकाळीही चार वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत गर्दी असते. मात्र सध्या ऑक्‍टोबर हिटचा उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे सकाळी पायी दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलांची लांबच्या लांब रांग असते.

पोलिसांचे महिला भाविकांकडून कौतूक 

या भाविकांसाठी मंदिर ट्रस्टकडून पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे भर उन्हात महिला भाविकांना तहानेवाचून ताटकळत थांबावे लागते. ही बाब मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्‍स मागविले आणि भर उन्हामध्ये दर्शनरांगेत थांबलेल्या महिला भाविकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करीत त्यांची तहान भागविली. पोलिसांच्या या कृत्याचा महिला भाविकांकडून कौतूक होते आहे.
 

अल्पवयीन पायी येणाऱ्या मुलांना मनाई
गेल्या वर्षी भारतनगर परिसरातून भल्या पहाटे देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या 16 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्युची घटना घडली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शहराच्या उपनगरीय परिसरातून ÷अल्पवयीन मुले पालकांविना देवीच्या दर्शनासाठी पायी येत असतील तर संबंधित पोलीस ठाण्याच्या बिटमार्शलकडून त्यांना रोखले जाऊन परत घरी पाठविण्यात येते आहे. पोलिसांच्या या सतर्कमुळे दूर्घटना टळणार आहे.

प्रतिक्रिया
यात्रोत्सवात येणाऱ्या महिलांनी दागिने परिधान करू नयेत. लहान मुलांचेही दागिने काढून घ्यावेत. मौल्यवान वस्तू खिशात ठेवू नये. दर्शनासाठी पालकांविना ÷अल्पवयीन मुलांनी येऊ नये. अशा सूचना वारंवार केल्या जात आहेत. गर्दीमध्ये चोरीची शक्‍यता अधिक असते. तरी भाविकांनी पोलिसांना सहकार्य करावे.- विजय डमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई नाका पोलीस ठाणे.
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: act of the police was appreciated everywhere