किर्तीध्वजाची पाचशे वर्षांची परंपरा निरंतर....

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

नवरात्रोत्सवातील आज (ता.७) महानवमी हा मुख्य दिवस असून आज (ता.७) मध्यरात्री १२ वाजता सुमारे पाचशे वर्षांच्या पंरपरेनूसार सप्तश्रृंगी मातेचा कीर्तीध्वज लाखो भाविकांच्या साक्षीने मोठ्या दौलात फडकणार आहे. कीर्तिध्वजाची ध्वजाच्या मानकऱ्यांसह ढोल ताशांच्या निनादात व सप्तश्रृंगी मातेच्या जयघोषात भव्य मिरवणूक निघते. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होवून ध्वजाचे दर्शन घेतात.  मिरवणूकीनंतर ध्वजाचे मानकरी सायंकाळी साडेसहा वाजता देवी भगवतीच्या मंदिरात पोहोचून देवीसमोर नतमस्तक होतात.

नाशिक : आद्यस्वंयभू शक्तीपीठ सप्तश्रृंगी गडावर अश्विन शुध्द १ अर्थात २९ सप्टेंबरपासून आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव सुरु असून नवरात्रोत्सवातील आज (ता.७) महानवमी हा मुख्य दिवस असून आज (ता.७) मध्यरात्री १२ वाजता सुमारे पाचशे वर्षांच्या पंरपरेनूसार सप्तश्रृंगी मातेचा कीर्तीध्वज लाखो भाविकांच्या साक्षीने मोठ्या दौलात फडकणार आहे. सह्याद्रीच्या पूर्व - पश्चिम पर्वत रांगेत समुद्रसपाटी पासून ४५६९ फूट उंचीवर सप्तश्रृंगीगडाच्या शिखरावर वर्षभरातून दोनदा कीर्तिध्वज मंदिराच्या शिखरावर फडकवला जातो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच चुतर्दशीच्या मध्यरात्री व नवरात्रौत्सव विजयादशमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीच्या मध्यरात्री आदिशक्ती आदिमाया श्री भगवतीचा कीर्तीध्वज (भगवे निशाण) मंदीरावरील अतिशय अवघड व उंच अशा सुळका चढुन शिखरावर फडकविले जाते. दरेगाव, ता. कळवण येथील गवळी पाटील कुटुंबीयांना शेकडो वर्षांच्या पंरपरेनूसार कीर्ती ध्वजाचे रोहण करण्याचा मान आहे.

दरेगावच्या गवळीं पाटलांची परंपरा कायम
 श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या स्थापने (सन १९७५) पूर्वी बेटावद  (जि. जळगाव) येथील रेणूकादास पुजारी (बुवा) हे तेथील रेणूका देवी मंदीरातून दरवर्षी चैत्रोत्सवात पदयात्रेने देवीच्या शिखरावर लावण्यासाठी निशाण घेवून असत व ते निशान सप्तश्रृंगी गडावर ध्वजाचे मानकरी गवळी पाटील यांच्याकडे विधीवत सोपवत. व ते निशान गवळी पाटील मंदीराच्या शिखरावर लावीत असे. आजही ही परंपरा बेटावद येथील रेणूकादास पुजारी यांच्या अनुयायी व भक्त मंडळाने कायम ठेवली आहे. असे असले तरी बेटावद येथील निशान फक्त चैत्रोत्सवातच येत असल्याने नवरात्रोत्सवासाठी निशानासाठी काहीशा अडचणी येत असल्यामुळे ट्रस्टची स्थापना झाल्यापासून सदरचे निशान ट्रस्ट मार्फतच विधीवत पुजा करुन गवळी पाटलांकडे सुपुर्त केले जाते.

११ फुटांची काठी तसेच देवतांची पूजा

या ध्वजासाठी ११ मीटर कापड, साधारणपणे त्याच मापाची साडीही लागते. ११ फुटांची काठी तसेच शिखरावर जातांना मार्गातील देवतांची पूजा करण्यासाठी २५ ते ३० किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य या वस्तूंचे न्यासाच्या कार्यालयात विधीवत पुजन करुन गवळी पाटलांकडे दिले जातात. यानंतर गावातून कीर्तिध्वजाची ध्वजाच्या मानकऱ्यांसह ढोल ताशांच्या निनादात व सप्तश्रृंगी मातेच्या जयघोषात भव्य मिरवणूक निघते. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होवून ध्वजाचे दर्शन घेतात.  मिरवणूकीनंतर ध्वजाचे मानकरी सायंकाळी साडेसहा वाजता देवी भगवतीच्या मंदिरात पोहोचून देवीसमोर नतमस्तक होतात. व त्यानंतर गवळी पाटील ध्वज व पुजेचे साहित्य घेवून उतरेकडील सुळक्यावरून रात्र असतानाही टेंभा किंवा प्रकाशासाठी लागणारे कोणतेही उपकरण सोबत न घेता चार ते पाच तासांनी मार्गावरील इच्छीत देवतांचे पुजन विधी करीत शिखरावर पोहोचतात. यानंतर जुना ध्वज काढून त्यांनी तेथे नवा ध्वज लावला जातो. ध्वज लावल्यानंतर पहाटे शिखरावरून गवळी पाटील यांचे मंदिरात आगमन होताच भाविक आदिमायेचे व शिखरावरील ध्वजाचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला लागतात.

 शिखरावर पोहचण्याचा मार्ग रस्ता शोधण्याचा अनेकांचा प्रयत्न अयशस्वी

दरेगाव येथील हरी गवळी, लक्ष्मण गवळी, रामकृष्ण गवळी, तुळशीराम गवळी यांचा वारसा सध्या ६८ वर्षीय एकनाथ गवळी पाटील यांनी पुढे सुरु ठेवला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबातील सदस्यांनी आपापसात मान ठरवून शिखरावरील निशान फडकविण्याची परंपरा कायम ठेवली आहे. नवरात्रोत्सवा दरम्यान शक्यतो परतीचा पाऊस असतो. पावसाळ्यात इच्छीत मार्गावरील शेवाळलेल्या कडे कपाऱ्या, डोंगर कपारीतून पडणारे पाणी व जोरदार हवा अशा प्रतिकुल परिस्थित गवळी पाटील सहजरीत्या शिखरावर जावून ध्वजारोहण करतात. आतापर्यंत अनेकांनी शिखरावर पोहचण्याचा मार्ग रस्ता  शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला किंवा पुन्हा समोर आलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The five hundred year tradition of fame continued in vani