esakal | योगामुळे कॅनडात झाल्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध

बोलून बातमी शोधा

yoga

भारता बाहेरील लोकांना विशेषतः पश्चिमात्यांना ज्या भारतीय गोष्टींनी भुरळ घातली आहे त्यात भारतीय अन्न, योगा, IT (फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हे तर इंडियन टॅलेंट या अर्थाने), भारताचे अध्यात्मिक ज्ञान आणि थोड्याफार प्रमाणात भारतीय चित्रपट (बॉलिवूड) याचा मुख्यत्वे समावेश होतो हे आपल्या पैकी बहुतेकांनी या आधी बहुधा वाचले असेल. यातील भारतीय अन्न आणि योगा या दोन गोष्टींनी पश्चिमात्यांच्या समाज जीवनात मोठे स्थान मिळवले आहे.

योगामुळे कॅनडात झाल्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध
sakal_logo
By
अनिल साळुंके

भारता बाहेरील लोकांना विशेषतः पश्चिमात्यांना ज्या भारतीय गोष्टींनी भुरळ घातली आहे त्यात भारतीय अन्न, योगा, IT (फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हे तर इंडियन टॅलेंट या अर्थाने), भारताचे अध्यात्मिक ज्ञान आणि
थोड्याफार प्रमाणात भारतीय चित्रपट (बॉलिवूड) याचा मुख्यत्वे समावेश होतो हे आपल्या पैकी बहुतेकांनी या आधी बहुधा वाचले असेल. यातील भारतीय अन्न आणि योगा या दोन गोष्टींनी पश्चिमात्यांच्या समाज जीवनात मोठे स्थान मिळवले आहे.

भारता बाहेर भारतीय उपखंडातील लोकांनी भारतीय अन्नाच्या नावाखाली मुख्यत्वे पंजाबी आणि थोड्या फार प्रमाणात दक्षिण भारतीय पद्धतीची रेस्टॉरंटस् उघडली आहेत. याच बरोबरीने योगा शिकवणारे योगा स्टुडिओज् देखील पावसाळ्यात उगवणाऱ्या भुछत्रीप्रमाणे जागोजागी उगवले आहेत. मात्र बहुतांश योगा स्टुडिओ हे भारतीयांनी नाही तर मुख्यत्वे करून गोऱ्या मंडळींनी चालवले आहेत हा एक महत्वाचा फरक आहे. या गोऱ्या मंडळींनी योगासने भारताकडून शिकून त्यात थोडेफार बदल करून योगाचे वेगवेगळे प्रकार शोधून काढले आहेत. तरी बरं, अष्टांग योगातील फक्त आसने (physical postures), थोडेफार ध्यान (meditation) आणि प्राणायाम (breathing exercise) एवढेच या लोकांनां येते. सुरवातीला केवळ उत्सुकता म्हणून योगासने, ध्यानधारणा आणि प्राणायाम शिकल्यानंतर त्यातील फायदे लक्षात आल्यावर कित्येकांनी भारतात येऊन विविध भारतीय योगाचार्यांकडून रीतसर योगा शिकून त्यात प्राविण्य मिळवले आहे. त्याच बरोबर भारतीय योगाचार्यांना पाश्चिमात्य देशांत बोलवून योगा शिकून घेतला आहे. परंतु योगासनांची संस्कृत नावे लक्षात ठेवणे आणि त्यांचा उच्चार करणे पाश्चात्यांना अवघड असल्याने योगासनांना हेड स्टँड, शोल्डर स्टँड, डॉग पोज, कोब्रा पोज, बो पोज, कॉर्प्स पोज इत्यादी नावे ठेवली आहेत. अर्थात या मंडळींचे योगासनांचे संस्कृतोद्भव उच्चार ऐकता योगा नको पण संस्कृत आवर अशी अवस्था होते आणि अमुक पोज किंवा तमुक पोज अशी इंग्रजी नावे परवडली असे वाटते. योगा क्लासेसची नावे देखील मोक्ष क्लास, ऍक्टिव्ह रेस्ट, लेग्सबम्स&टम्स, रुद्रम मेडिटेशन, आसना वर्कशॉप, YogaButt, मॉम&बेबी, बोधीयोगा, YogaLoft, सत्वयोगा अशी मजेदार ठेवली आहेत. योगा क्लास बरोबरीने गुरुपूजा, भजन, कीर्तन, सत्संग, वर्कशॉप्स, काँसर्ट्स चालू केले आहेत.

काही गोऱ्या मंडळींनी संस्कृतप्रचुर भारतीय नावे धारण करून योगासनांमध्ये काही किरकोळ बदल करून ते स्वतःच्या नावावर खपवण्याचे उद्योग (Yoga piracy) देखील केले आहेत. तर काही अति हुशार मंडळींनीं बर्गरानंद किंवा पिझ्झादेवी तत्सम नावे घेऊन स्वतःचे योगा पंथ (yoga cults) चालू केले आहेत. योगातील फायदे समजल्यावर आणि त्यातील अर्थकारण लक्षात आल्यावर व्यापारी वृत्तीने योगा फिटनेस इंडस्ट्री जोरात सुरू आहे आणि दिवसेंदिवस वृद्धिंगत होते आहे. योगा शिकवणाऱ्या योगा स्टुडीओंचे जागोजागी पेव फुटले आहे. योगा शिकताना लागणाऱ्या योगा-मॅटस् आणि त्याच्या पिशव्या (मॅट बॅग्ज आणि स्लिंग्ज), मॅट क्लिनर्स, योगासने करताना लागणारे स्त्री आणि पुरुषांचे आरामदायी व विविध शारीरिक हालचालींना सहाय्यभूत ठरणारे, घाम शोषून घेणारे कपडे, फुल आणि हाफ टो योगा ग्रिप सॉक्स, ग्लोव्हज, रिस्ट आणि नी सपोर्ट्स, हेडबँडस् आणि हेअर टाईज्, टॉवेल्स, ब्लॅंकेट्स, पट्टे, ध्यानासाठी लागणारे बस्कर (मेडिटेशन कुशन्स), वेगवेगळ्या आकाराचे ठोकळे आणि साधने (प्रॉप्स), पाण्याच्या बाटल्या, योगा संदर्भात असंख्य प्रकारची पुस्तके, मासिके, सीडीज्, योगा ज्वेलरी अशा विविध गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे ध्यान धारणेसाठी उपयुक्त अशा वेगवेगळ्या सुवासिक उदबत्त्या, दिवा किंवा समई साठी विविध प्रकारची तेले, धुपदानी, ध्यानस्थ बसलेला झेन किंवा लाफिंग बुद्ध त्याच बरोबरीने श्रीकृष्ण, गणपती, डिव्हाईन डांसिंग शिवा म्हणजे नटराज, ओम च्या विविध प्रतिमा, देवादिकांची चित्रे असलेल्या शाली, पडदे, टॅपेस्ट्रीज्, वेगवेगळ्या योगासनांच्या छोट्या प्रतिकृती या सगळ्या गोष्टींची मोठी उलाढाल आहे. योगा स्टुडिओसाठी योग शिक्षक (योगी आणि योगिनी), स्वागतिका, ऍडव्हरटायझिंग आणि मार्केटिंग, ऍडमिनिस्ट्रेशन आणि मेंटेनन्स, वेब साईट्स, वेब विक्री स्टोअर्स, कुरिअर यंत्रणा यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

योगा बरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे मसाज, निसर्गोपचार पद्धती, अभ्यंग, स्वेदन, शिरोधारा आणि इतर आयुर्वेदिक उपचार, हर्बल आणि इतर हेल्थ सप्लिमेंट्स, ऍक्युप्रेशर, ऍक्युपंक्चर, अरोमाथेरपी, Zumba, Pilates या सर्व गोष्टींची जोड दिल्यामुळे योगा इंडस्ट्रीची भरभराट होते आहे. भारतातील अध्यात्मिक गुरूंनी देखील पाश्चिमात्य देशात प्रसिद्ध शहारांजवळ मोठमोठया जागा घेऊन प्रशस्त आश्रम बांधले आहेत आणि योगा रिट्रीट सेंटर्स हा या आश्रमांचा एक महत्वाचा भाग आहे. हि गुरू मंडळी भारताप्रमाणेच भारताबाहेर देखील मोठ्या संख्येने भक्त बाळगून असतात. किंबहुना ना घरचा ना दारचा अश्या त्रिशंकू अवस्थेतील विच्छेदीत अनिवासी भारतीयांना मातृभूमीच्या प्रेमाचे उमाळे आल्याने अशा मानसिक आधाराची गरज वाटत असावी. त्यामुळे ज्या गुरुचे मार्केटिंग आणि पी. आर. चांगला त्याची भक्तांची फौज मोठी असा साधा सरळ हिशेब आहे. जागोजागी असणाऱ्या विषेशतः उत्तर अमेरिकेतील योगा स्टुडिओजची संख्या बघता फास्ट फूड साखळीच्या दुकानाप्रमाणे या स्टुडिओज् ना McYoga असे नाव मिळाले आहे. योगा शिकवणे (आणि पैसे कमावणे) हा या सर्व स्टुडिओज् चा हेतू असला तरी सद्य कालीन योगातील विविध पंथांच्या (Yoga brands) शिकवणी प्रमाणे आपापल्या पंथातील योगाचार्याला गुरुस्थानी मानून योग शिक्षण देत आहेत. योगासनांमध्ये प्राविण्य मिळवल्यावर पश्चिमात्यांनी
त्यांच्या चिकित्सक तैल बुद्धीला अनुसरून योगाचे विविध प्रकार शोधले आहेत. प्रसूतीपूर्व गरोदरपणातील प्री-नेटल योगा, प्रसूती नंतर आईचा लहानग्या बाळा समवेत योगा, मुलांचा किड्स योगा, प्रौढांसाठी बिगीनर्स ते ऍडव्हान्स असा विविध पातळीवरचा योगा, पॉवर योगा, हॉट योगा, चेअर योगा, ऑफिस योगा, फिट योगा, फ्लो योगा, Yang&Yin योगा, कम्युनिटी मेडिटेशन, वृद्धांसाठीचा जेंटल योगाचा आणि अशा अनेक योग प्रकारांचा यात समावेश होतो. अगदी टोकाचे उदाहरण द्यायचे झाले तर कुंडलिनी योगा, हवेत करायच्या एरियल योगा (trapeze yoga) पासून
पाश्चात्यांच्या समाजजीवनातील लैंगीकतेला असलेले महत्व लक्षात घेता कपल्स योगा, तांत्रिक योगा, सेक्स योगा ते योगाझम पर्यंत त्यांनी मजल मारली आहे. योगाची लोकप्रियता बघता हॉलिडे रिसॉर्टस, हॉटेल्स, टूर्स ट्रॅव्हल्स यांनी देखील मसाजच्या बरोबरीने योगा रिट्रीट सेंटर्स सुरू केली आहेत. ऑल इंक्लुझीव डेस्टिनेशन योगा ही नवीन कल्पना पुढे आली आहे. इतकेच नाही तर ब्रू किंवा बीअर योगा, पूल म्हणजेच पाण्यात आणि पाण्यावर करायचा फ्लोटिंग प्लॅन्क वॉटर योगाचे प्रकार सुरू केले आहेत. हे म्हणजे खरे तर योगाच्या नावाखाली पैसे कमावण्याचे विविध मार्ग आहेत. टीव्ही आणि इंटरनेट मीडियाने योगा इंडस्ट्रीमध्ये जोमाने उडी घेतली आहे. भारताप्रमाणेच टीव्हीवर योगा बद्दलचे विविध कार्यक्रम येत आहेत. इंटरनेटवर योगाचे असंख्य व्हिडीओ उपलब्ध आहेत आणि योगा गुरूंची नवी जमात उदयाला आली आहे. यातील बहुसंख्य योगा गुरु (योगी आणि योगिनी) हि मंडळी पूर्वाश्रमीचे जिमनॅस्ट खेळाडू असावेत अशी शंका येण्याइतकी शारीरिक लवचिकता आणि विविध आसनांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले आहे हे मात्र नक्कीच कौतुकास्पद आहे. ऑन लाईन सशुल्क योगा क्लासेस हे व्हिडीओ आणि आहार सल्यासह सुरू आहेत. एकंदरीत योगा मुळे होणारी ही सर्व आर्थिक उलाढाल डोळे दिपवणारी आहे.

सध्याच्या बैठ्या जीवन शैलीचे लोण शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आहे. मोबाईल आणि कॉम्पुटरवरच्या खेळांमुळे प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळणे कमी झाले आहे. त्यामुळे सुदृढ वाढीसाठी आवश्यक असणारा शारीरिक व्यायाम कमी झाला आहे. त्याच बरोबरीने अन्नाची, विशेषतः जंक फुडची, मुबलक उपलब्धता आणि शर्करावगुंठित फसफसणाऱ्या पेय्यांमुळे जवळजवळ एक तृतीयांश मुलांमध्ये स्थूलत्वाची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर योगापासून होणारे फायदे लक्षात घेऊन बऱ्याच शाळांनी मुलांच्या एकाग्रतेसाठी आणि निकोप शारीरिक वाढीसाठी योगाभ्यासाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केला आहे. परंतु काही उजव्या मंडळींनी असे करणे हे निधर्मी शिक्षणाच्या विरुद्ध असल्याचा दावा करत विरोध दर्शवला आहे. आसने ही भारतीयांच्या चार हात किंवा तीन तोंडे असणाऱ्या देव देवतांचे प्रतीक असल्याचे आणि योगातील प्रार्थना म्हणजे धार्मिक शिक्षण असल्याचा या मंडळींचा समज आहे. न्यायालयीन
लढाईत न्यायालयाने मात्र शाळेतील योग शिक्षण हे धार्मिक नसून केवळ मुलांच्या चांगल्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी आहे असे मत नोंदवल्याने शाळांना दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य जनतेने मात्र योगातील फायदे लक्षात आल्याने योगाला होणाऱ्या विरोधाकडे दुर्लक्ष करत नेटाने योगाभ्यास चालवला आहे. कित्येकदा तर घरातील सगळे योगाभ्यास - फॅमिली योगा - करताना दिसत आहेत आणि योगा करणे ही अभिमानाने मिरवण्याची गोष्ट झाली आहे असे आढळून येते. गोऱ्यांच्या बरोबरीने कृष्णवर्णीय आणि पितवर्णीय आशियायी लोक देखील उत्साहाने
योगा करताना दिसत आहेत. उन्हाळ्यात बागांमध्ये किंवा मोकळ्या मैदानात सार्वजनिक योगा करण्याची टूम निघाली आहे. या मागील आर्थिक कारण लक्षात घेतले तरी याचा योग प्रचारासाठी फायदा होतो आहे हे नक्की.
योगा केल्यानंतर होणारा शारीरिक आणि मानसिक फायदा लक्षात आल्यावर त्यावर विविध संस्थांमध्ये संशोधन चालू झाले. या मध्ये डॉक्टर मंडळी देखील आघाडीवर आहेत. एकेका आसनाचा अभ्यास करून त्याचा शरीरावर होणारा परिणाम समजल्यावर साहजिकच मुळातच आजार होऊ नये आणि झाला तर त्यावर योगासनांचा उपयोग होऊ शकतो का याची चाचपणी सुरू झाली. यातून योगा थेरपिस्ट ही नवी जमात उदयास आली. जे मुळात डॉक्टर होते, फिजिओ थेरपिस्ट होते किंवा स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर होते आणि ज्यांचा योगाभ्यास होता अशी मंडळी रजिस्टर्ड योगा थेरपिस्ट (RYT) या नावाने ओळखू यायला लागली. वेगवेगळ्या संस्थांमधून क्रॅश कोर्स पासून ते काही महिन्यांचे RYT चे कोर्सेस सुरू झाले. प्राणायाम केल्याने रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते असा समज झाल्याने स्टॅमिना वाढण्यासाठी खेळाडूंचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे लक्ष योगा कडे गेले. खेळामध्ये एकाग्रता वाढावी आणि लवचिकता यावी या साठी खेळाडूंना योगाची शिफारस करणे सुरू झाले. खेळातील दुखापती कमी करण्यासाठी योगाXस्पोर्ट्स असे क्रॉस ट्रेनिंग सुरू झाले. डॉक्टरांकडून उत्तम, निरामय आरोग्यासाठी आणि समांतर उपचार पद्धती म्हणून योगाची
शिफारस चालू झाली. वेगवेगळ्या व्यवसायासाठी योगाचा वापर सुरु झाला. अगदी फॅशन आणि ब्युटी पासून ते अग्निशामक दलातील जवानांपर्यंत योगा जाऊन पोचला. McYoga पासून सुरवात झालेला हा प्रवास आता RxYoga
(YogaCikitsa) पर्यंत येऊन पोचला आहे. अशा रीतीने सध्या शारीरिक, मानसिक आणि त्याबरोबरीने आर्थिक लाभासाठी सुरू झालेला भारता बाहेरील योगाभ्यास लवकरच षटचक्र आणि कुंडलिनी मार्गे अध्यात्मिक पातळीवर जाऊन पोचेल यात शंका नाही. पाश्चिमात्यांच्या अंधानुकरण करण्याच्या आपल्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे काही काळानंतर ह्या गोऱ्यांकडून कडून आपल्याला अष्टांग योग शिकायची वेळ न यावी हीच योगमहर्षी पतंजलींच्या चरणी प्रार्थना.
सर्वे सन्तु निरामयः !