एका उत्तराची कहाणी...

bisexual
bisexual

“कोsहम्” आणि “सोsहम्” या दोन संकल्पना, अगदी वैदिक काळापासून आजपर्यंत, अनेक संदर्भात वापरलेल्या आढळतात. या दोन संस्कृत शब्दांचा नुसता शब्दशः अर्थ जरी पाहिला तरी विविध संदर्भात, “मी कोण?” हा प्रश्न पडण्यापासून त्याचं उत्तर मिळण्यापर्यंतचा प्रवाससुद्धा महत्वाचा. लैंगिकतेबाबत “मी कोण?” या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रवास महत्वाचा तर आहेच परंतु गरजेचादेखील आहे. तो प्रवास खडतर आणि असफल होऊ नये यासाठी प्रत्येकानं जागरूक असायला हवं. मुळात प्रवासाच्या सुरुवातीसाठी, “मी कोण?” हा प्रश्न पडणंच महत्वाचं. स्वतःच्या लैंगिकतेबाबत संदिग्धता असणाऱ्या व्यक्तीला जितक्या लवकर हा प्रश्न पडेल आणि जितक्या लवकर त्याचं उत्तर गवसेल तितकं ते त्या व्यक्तीसाठी आणि समाजासाठीसुद्धा हिताचं ठरेल. मात्र उत्तर शोधताना, प्रत्येकानं स्वतःशी प्रामाणिक राहायला हवं. अन्यथा पुरेशा गांभीर्यानं नं शोधलेलं उत्तरच इतर अनेक जटिल प्रश्नांना जन्म देणारं ठरेल.

मी माझ्या स्वतःच्या लैंगिकतेबाबत कधी गोंधळात नव्हतो. कामभावना जाणवू लागली तेव्हापासून, म्हणजे अगदी बारा-तेरा वर्षांचा किशोरवयीन मुलगा असल्यापासूनच, मला माझ्या वयाच्या मुलींबद्दल नव्हे तर मुलांबद्दलच आकर्षण वाटायचं हे मला पक्कं आठवतं आहे. संस्कारातून आलेल्या आणि सज्जनतेच्या अतिरेकी संकल्पनांमधून निर्माण होणाऱ्या पगड्यातून, “आपण मुलींच्या शरीराबद्दल विचार करत नाही हे सभ्यपणाला धरुनच तर आहे” असंही तेव्हा वाटायचं. त्या तशा वयात आणि काळात, मुलींच्या शरीराबद्दल विचार करणं बिघडलेपणाचं लक्षण वाटायचं. विचार नं करणं एकवेळ ठीक आहे परंतु “आपल्या मनात तसा विचारच आपल्या वयाच्या मुलींबद्दल येत नाही आणि आपल्या वयाच्या मुलांबद्दल किंवा आपल्याहून थोड्या मोठ्या, तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलांबद्दल मात्र, काही नं ठरवता, नैसर्गिक आणि स्वाभाविकपणे येतो याचा अर्थ काय असावा?” हा प्रश्न मात्र थोडा नंतर पडू लागला. मग “जसे मुलांच्या विचाराने आपण (नं ठरवता) उत्तेजित होतो तसेच मुलींच्या विचारानेपण उत्तेजित होऊ का?” असा प्रयत्न मी एखाद् वेळी करूनदेखील पाहिला (पण म्हणजे पुन्हा ठरवूनच करणं आलं. त्यात स्वाभाविकता आणि उत्स्फूर्तता नाहीच) आणि जाणवलं की, नाही. मुलींच्या विचाराने आपण बिलकूल उत्तेजित होत नाही. परंतु हे स्पष्ट झाल्यावरसुद्धा माझा गोंधळ वगैरे उडाला नाही. आपल्या अवस्थेला समलैंगिकता म्हणतात हे साधारण वयाच्या सोळा-सतराव्या वर्षी मला समजलं. मग ते समजल्यावर मला काही भीती वाटली का? मी ते लपवलं का? मला त्या साक्षात्काराने काही मानसिक त्रास झाला का? त्यातून आलेल्या अनुभवांना, जाणिवांना, शंकांना मी कसा सामोरा गेलो? या प्रश्नांबद्दल चर्चा हा दुसरा विषय होईल. परंतु मला इथे सांगायचं आहे ते हे की माझ्या लैंगिकतेबद्दल माझा कधी म्हणजे कधीही गोंधळ नव्हता. वयाच्या सोळा-सतराव्या वर्षीच त्याबद्दल माझे विचार, केवळ सुस्पष्टच नव्हे, तर समलैंगिकतेबद्दलचे असूनही स्वच्छच होते. त्यामुळे त्या वयात लैंगिकतेबाबत “मी कोण?” हा प्रश्न मला पडल्यास त्याचं माझ्यापुरतं उत्तरही माझ्याजवळ तयार होतं - मी समलैंगिक तरुण आहे.

माझा स्वतःच्या बाबतीतला अनुभव हा असा असल्याने, त्या वयात आणि नंतरही काही काळ, मला कायम हेच वाटत आलं की इतर समलैंगिकांचा या बाबतीतला वैचारिक प्रवासपण असाच काहीसा होत असणार. त्यांनादेखील ते समलैंगिक आहेत हे साधारण अशाच काहीशा पद्धतीने जाणवत आणि कळत असणार. मग आपसूकच असाही प्रश्न पडत राहिला की समलैंगिक असल्याचं जाणवूनही काही समलैंगिक, भिन्नलिंगी व्यक्तीशी विवाह कसा काय करतात? “समाजमान्य वैवाहिक आयुष्यात गृहीतच असणाऱ्या, दोन भिन्नलिंगी जोडीदारांमध्ये होणाऱ्या शरीरसंबंधांमध्ये, आपल्याला कधी स्वारस्य नसणार” हे माहीत असतानासुद्धा, मागे नं घेता येणारं, समाजमान्य विवाहाचं पाऊल ते का बरं उचलतात? आपण आपली स्वतःची आणि आपल्या जोडीदारीणीची या बाबतीत कायमची फसवणूक करणार आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही का? की लक्षात येऊनदेखील ते ही गोष्ट करतात? त्यांच्या दृष्टीने संसारामध्ये स्वतःचं-जोडीदारीणीचं शारीरिक सुख, शरीरसंबंधाच्या गरजा, मागण्या, अपेक्षा आणि त्या बाबतीत परस्परांमधली मतं जुळणं वगैरे गोष्टी महत्वाच्या नसतातच का? की “योग्य वयात” लग्न करण्याच्या धांदलीत इतर बऱ्याचशा भिन्नलैंगिकांप्रमाणेच या सगळ्या मुद्द्यांचा विचारच आलेला-केलेला नसतो? 

हे सगळे प्रश्न पडल्यावर मला अशा समलैंगिकांबद्दल फार राग यायचा. समाजव्यवस्थेने आणि न्यायव्यवस्थेने तुमच्यावर अन्याय केला आहे यात काहीच वाद नाही परंतु तुम्ही स्वतः असे अन्यायाने पोळलेले असतानासुद्धा, परत तसाच अन्याय कुणा दुसऱ्या, या बाबतीत निरागस आणि तुमच्या लैंगिकतेबाबत अजाण असणाऱ्या व्यक्तीबरोबर कसा काय करु शकता? आणि तो सुद्धा, ज्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यभरासाठी जोडीदार करुन घेणार आहेत अशा व्यक्तीबरोबर! तुमच्यावर अन्याय झाला कारण समाजाने आणि न्यायव्यवस्थेने तुमचा लैंगिक कल समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. तुमची लैंगिकता ही त्यांच्या कल्पनेत बसणारी गोष्ट नसल्याने, त्यांनी त्यांचे संकुचित मापदंड, आडमुठेपणाने तुमच्यावर आदळत, बेजवाबदार आणि निष्काळजीपणे, तुमच्या गरजांना बाद करुन टाकलं. तो समाज असमंजस आणि ती न्यायव्यवस्था अन्याय्य. परंतु जेव्हा निर्णय घेण्याची वेळ तुमच्यावर आली तेव्हा तुम्ही तर नक्की अजाण नव्हता. मग तुम्ही जाणतेपणाने हे असमंजस आणि अन्याय्य पाऊल उचलायचा निर्णय का घेतला? की “लाईफ इज नॉट फेअर” हा तुमच्या बाबतीत सतत जाणवलेला नियम, इतरांच्या बाबतीत अमलात आणण्यासाठी, तुम्हीपण एका निरागस भिन्नलैंगिक व्यक्तीला, त्या “अनफेअर लाईफ”चा अनुभव देण्याचा विडा उचललात?

मग काही काळानं असं कळलं की बरेच समलैंगिक हे खरोखरच स्वतःच्या समलैंगिकतेबद्दल खूपसा काळ गोंधळातच असतात. हे कळल्यावर सुरुवातीला तर मी ती शक्यता झटकूनच टाकली. कसं शक्य आहे गोंधळात असणं? इतर सर्व बाबतीत चारचौघांसारखं, भिन्नलैंगिकांसारखं आयुष्य जगणाऱ्या याच समलैंगिक माणसांना चारचौघांसारखीच बाकी सगळ्या बाबतीतली जाण असते. बाकी सगळ्या बाबतीत ते अगदी लहान वयापासून, किशोर-वयापासूनच “प्रगल्भ” असतात. यांना चतुरपणा करायचं कळत असतं तसं लांड्या-लबाड्या करायचंही कळत असतं. परीक्षांमध्ये कॉपी करणं कळत असतं, सोळाव्या वर्षीच दुचाकीचा दाखला मिळवताना लाच देण्याचा स्मार्टनेस यांच्यात सहज रुजलेला असतो, कर चुकवायचं कळत असतं, स्वतःच्या फायद्याचा व्यवहार आणि विचार करणं कळत असतं. तिथे यांचा कधीच गोंधळ होत नाही, तिथे यांची कधीच द्विधा मनस्थिती नसते, अगदी चुकीचं करतानासुद्धा “आपण चुकीचं वागतो आहोत” हे माहीत असूनही हे आखणीपूर्वकच चुकीचं वागत असतात. मग या एकाच विषयाच्या बाबतीत यांचा गोंधळ कसा काय असू शकतो? की इथेही ते आखणीपूर्वकच चुकीचं वागत असतात? परंतु घटकाभर या सगळ्या निर्दयी प्रश्नांना बाजूला सारुन, या गोंधळींचा थोडा नरमाईनं विचार करत, मी माझी अशी समजूत घालायचाही प्रयत्न केला की - ठीक आहे. मुळात लैंगिकता हा विषयच इतका लपूनछपून बोलला जाणारा आहे की किशोरवयीन काळात कामभावना निर्माण होऊ लागल्यानंतर पुढचा काही काळ गोंधळ असूही शकतो कुणाकुणाचा. एकतर विषय बोलला जाणारा नाही, कुणाचे अनुभव ऐकण्याची व्यवस्था नाही, स्वतः कुणाबरोबर अनुभव घेत परस्परांबाबतची या बाबतीतली पूरकता तपासायची, मौजमस्ती करायची पाश्चात्य संस्कृती आमची कशी नाही हे म्हणण्यातच धन्यता मानणारा आमचा समाज. समजा अगदी काही अनुभव घेतला किंवा घ्यायचा विचार केला तरी पुन्हा इतर सर्व बाबतीत असतो तसा समाजमान्य विचारांचा पगडा. त्यात पुन्हा, जाणवू लागलेल्या समलैंगिक भावना सर्वसाधारणपणे सर्वत्र दिसणाऱ्या नाहीत, अशा अनेक कारणांच्या (सोयीस्कर) आधारामुळे असा गोंधळ होणं साहजिक आणि शक्य आहे सुद्धा. परंतु किती काळ? एखादा महिना? एखादं वर्ष? कामभावना जाणवू लागल्यानंतर सुरुवातीची काही वर्षं? परंतु कधी ना कधी धुकं दूर होऊन, साधारण वयाची विशी पार करेपर्यंत, नाहीतर मग निदान विवाहबंधनात अडकेपर्यंत तरी चित्र नक्कीच स्पष्ट होत असेल ना?

पण अजून काही काळानंतर, आणखी काही उदाहरणांबद्दल वाचून-पाहून-ऐकून हे समजलं की - नाही. बऱ्याच जणांच्या तर, अगदी तिशीला पोचल्यावरसुद्धा हे लक्षात आलेलं नसतं. “आपण कोण?” हा प्रश्न त्यांना त्यांच्या लैंगिकतेबाबत पडलेला नसतो आणि समजा पडला असेल तर त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न आणि अनपेक्षित उत्तर मान्य करायचा प्रामाणिकपणा त्यांनी दाखवलेला नसतो. काहीजण या भ्रमातही असतात किंवा त्यांना या भ्रमात ठेवण्यात आलेलं असतं की लग्न झाल्यावर होईल आपोआप सगळं ठीक. काहीजण घरच्या कडक शिस्तीच्या वातावरणाचा, वडीलधाऱ्यांच्या शब्दाबाहेर जाऊन लग्नाला नकार देण्याची टाप नसण्याचा सोयीस्कर आधारपण घेतात. मी हे जे बोलतो आहे ते आत्ताच्या काळाबद्दल बोलतो आहे. पूर्वीचा काळ, तेव्हाची समाजरचना, लग्न होण्याच्या क्षणापर्यंतसुद्धा अगदीच अनोळखी असणारं शरीरसंबंधांचं जग, घरातल्या वडीलधाऱ्यांचा असमर्थनीय धाक आणि दरारा अशा कुठल्या काळाबद्दल बोलत नाही. आजच्या काळात सर्व माहितीची सहज उपलब्धी असतानासुद्धा हा असा गोंधळ व्हावा आणि असावा हे पटणं म्हणूनच जरा अवघड.

नंतर एका मित्राने त्याच्या माहितीतल्या दुसऱ्या एका मुलाचं उदाहरण सांगितलं. त्या मुलाने “योग्य त्या वयात”, घरच्यांचं ऐकून, समाजाच्या चौकटीत राहून, शहाण्या मुलासारखं, समाजमान्य पद्धतीने, मुलीशी लग्न केलं. नजर लागावी अशा लक्ष्मी-नारायणाच्या या जोडप्याला एक गोंडस मुलगीपण झाली. परंतु साधारण तिशी ओलांडत असताना, “आपण समलैंगिक आहोत” हे पक्कं लक्षात आल्यावर मात्र, या मुलाला हा समाजमान्य विवाहाचा समाजमान्य दिखावा असह्य होऊ लागला. तो समलैंगिक असल्याचं बायकोला सांगितल्यावर, मुळात तिची फसवणूक झाल्याचा धक्का तिला बसला असल्याने तिच्याकडून लगेच सहानुभूती वगैरे मिळण्याची अपेक्षा करणं चुकीचंच परंतु या मुलाच्या स्वतःच्या घरच्यांना, त्याच्या आई-वडिलांना, त्याने स्वतःच्या समलैंगिकतेबद्दल सांगितल्यावर त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची प्रगल्भता दिसली नाही. हा मुलगा नुसताच विवाह बंधनात अडकलेला नव्हता तर एक मुलगी झाली असल्याने, माघार घेण्याच्या बाबतीत, समृद्ध देशी विवाहसंस्थेच्या दृष्टिकोनातून, गोष्टी खूपच पुढे गेल्या होत्या. माघार घेणं शक्य नव्हतं परंतु स्वतःच्या नैसर्गिक भावनांना दडपणंपण शक्य होत नव्हतं. हा समाजमान्य विवाह करून आपण आपली स्वतःची कायमची फसवणूक करून घेण्याबरोबरच आपल्या बायकोचीसुद्धा कायमची फसवणूक केली ही भावनाही त्रास देऊ लागली होती. आता या मुलाने दुसऱ्या कोणत्या मुलाशी काही विवाहबाह्य शरीरसंबंध वगैरे ठेवले होते असं नाही परंतु बायकोसोबतच्या शरीरसंबंधांमधून सुख मिळत नाही, आपल्या वयाच्या दुसऱ्या कुणा तरुणांबरोबर आपल्याला संबंध ठेवावेसे वाटतात परंतु समृद्ध परंपरेच्या “त्या” सुप्रसिद्ध, वलयांकित चंदेरी चौकटीत जाऊन बसलेलो असल्याने तसं काही करता येत नाही हेदेखील स्पष्ट होऊ लागलं होतं. मुळात शारीरिक आकर्षणाची ही आयुष्यभर पुरणारी महत्वाची गोष्ट, आपण जिच्याशी शरीरसंबंध ठेवले त्या बायकोपासूनसुद्धा लपवली आणि त्या अर्थाने तिची फसवणूक केली ही भावना त्रास देऊ लागली होती. उशिराने का होईना सुचलेल्या प्रामाणिकपणातून लैंगिकतेची बाब खुली केल्यावर, अवतीभवतीच्या जवळच्यांपासून परक्यांपर्यंत (म्हणजे चंदेरी चौकटीवाल्या, चौकोनी, ठोकळ्या समाजापर्यंत) वडिलकीच्या नात्याचा अधिकार गाजवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं, पोरकटपणा करत - “होईल सगळं सुरळीत” वालं, “चुकीचे विचार करु नको” वालं, “संसारात लक्ष दे म्हणजे मग असे “नाही ते” विचार येणार नाहीत” वालं - आपापलं घोडं पुढे दामटणं चालूच होतं. या सर्व “वडीलधाऱ्या हितचिंतकांच्या” दृष्टीने प्रश्न सोडवण्यापेक्षा, हे असले “थोरामोठ्यांचे सल्ले” देत ते दडपणं कधीही सोपं, नाही का? या सगळ्याचा शेवट, त्या मुलाने ऐन तारुण्यात आत्महत्या करण्यात झाला. (मला खात्री आहे, या ठिकाणी काही वाचक “बरं झालं स्वतः स्वतःला शिक्षा दिली ते - चूक करायचीच कशाला मुळात” असं म्हणाले असतील मनातल्या मनात. आपल्याला समस्येचं मूळ शोधायचंच नसतं कधी. “मेजॉरिटी विन्स्” सारख्या उथळ कल्पनांना, युक्तिवादाचा प्रतिष्ठित रंग देत, तितक्याच उथळपणे एकदाचा निकाल दिला म्हणजे झालं.)  त्या मुलानं स्वतःचं आयुष्य संपवलं आणि बायको-मुलीसाठी कायमचे काही प्रश्न-विचार-शंका मागे ठेवल्या. “मी कोण?” या एका प्रश्नाचं उत्तर वेळेवर नं शोधल्यानं किंवा नं मिळाल्यानं, मग उत्तर सापडूनही, अवघ्या एकाच उत्तराची ही कहाणी एका उत्तरी सुफळ संपूर्ण नं होता निष्फळ अपूर्णच राहिली. 

आता या मुलाचासुद्धा खरोखरच स्वतःच्या लैंगिकतेबद्दल कायम, अगदी तिशीला पोचेपर्यंतसुद्धा गोंधळ होता का? त्यालाही “लग्न झाल्यावर होईल सगळं सुरळीत” हा भ्रम होता का? की “आपल्याला मुलीच्या शरीराबद्दल बिलकुल आकर्षण वाटत नाही” हे माहीत असूनही, स्वतःशी प्रामाणिक नं राहता, त्याने - जाणूनबुजून किंवा - अशा बहुतांश समलैंगिकांच्या बाबतीत होतं तसं - समाजाच्या भीतीने - हे समाजमान्य लग्नाचं पाऊल उचललं होतं?

मी माझ्या इतरही लिखाणात नमूद केले आहे आणि इथे पुन्हा नमूद करू इच्छितो की समलैंगिक हे ओळखता येऊ शकत नाहीत. आयुष्याच्या इतर क्षेत्रांत ते चारचौघांसारखेच असतात. अभ्यासू असतात, हुशार असतात, खेळाडू असतात, कलाकार असतात, तंत्रज्ञ, गणितज्ञ, शास्त्रज्ञ असतात. समाजात भरीव योगदान देऊ शकणारे असतात. त्यांच्या नैसर्गिक लैंगिक कलाला योग्य ती दिशा नं  मिळू शकल्याने, त्यांच्यापैकी बरेच जणांची संपूर्ण आयुष्यच झाकोळली जातात. समाजाच्या दबावाखाली आल्याने मग ते असं समाजमान्य विवाहाचं चंदेरी पाऊल उचलून, स्वतःबरोबर स्वतःच्या जोडीदारालासुद्धा अंधेरी दिखाव्याच्या खाईत कायमचं लोटतात. मग त्यातलेच काही जण, चंदेरी चौकटीतला हा अंधेरी दिखावा आणि देखावा असह्य झाला की आत्महत्येचा मार्ग निवडतात. परंतु पुन्हा, चौकटीतल्या चौकडीला, हे असले प्रश्न निर्माण करणाऱ्या चौकट-सभासदांपेक्षा चौकटीबाहेर नं जाता, चौकटीतच राहून आयुष्य संपवणारे सभासद चालतातच … चौकट वाकवू नका, चौकट मोडू नका म्हणजे झालं … स्वतः वाकून मग मोडलात तरी हरकत नाही.

समाजात सर्वत्र लपूनछपून हे असं घडत असताना हे थांबवायचं कसं? हे क्षणार्धात थांबवण्याचा सोपा सुटसुटीत मार्ग नसला तरी हे होऊ नये यासाठीचे उपाय वाटतं तितके अवघडसुद्धा नाहीत. पहिलं सगळ्यात महत्वाचं पाऊल म्हणजे, दुसऱ्याच्या अतिखाजगी आयुष्यामध्ये सदैव नाक खुपसण्याच्या समाजकार्याची हौस असणाऱ्या व्यापक समाजाने, समलैंगिकता नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे हे मान्य करायलाच हवं. त्या बरोबरीने उचलायचं दुसरं पाऊल म्हणजे समलैंगिक विवाहास कायद्याने मान्यता देणं हे. आपण चौकट मोडण्याबद्दल बोलत नाही तर ती विस्तारण्याबद्दल बोलतो आहोत. या दोन गोष्टी मान्य झाल्या की समलैंगिक, निर्भयतेने इतर समलैंगिकांशी लग्न करु शकतील. त्यामुळे स्वतःच्या आणि भिन्नलैंगिक जोडीदाराच्या आयुष्याची वाताहात लावण्याचा प्रश्नच येणार नाही.

तिसरं अजून एक खूप महत्वाचं पाऊल म्हणजे लैंगिक कलाबद्दलचं शिक्षण शाळेमध्ये सक्तीचं करणं. मी शरीरसंबंधांबद्दलचं शिक्षण म्हणत नाहीये. त्याहून कैकपटीने महत्वाच्या आणि निकोप शरीरसंबंधांची पूर्वअट असणाऱ्या, लैंगिक कलाच्या शिक्षणाबद्दल बोलतो आहे. त्यातसुद्धा वर्षातून एखाद् वेळेला वगैरे ते शिक्षण घेण्याचा पर्याय आणि तोसुद्धा ऐच्छिकपणे उपलब्ध करुन देण्याचा आचरटपणा नं करता, किशोरवयात (वयाच्या तेराव्या वर्षात) पदार्पण केल्यापासून पुढील काही वर्षांसाठी दर आठवड्यात एखादा तास किंवा निदान दर महिन्यात एकदा तीन-चार तासांचा वर्ग त्यासाठी सक्तीने ठेवणे गरजेचे आहे. विषय शिकवल्यावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून, त्यांना त्याबद्दल बोलतं करुन, विषय त्यांना समजला आहे की नाही हे जाणून घेणे, या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवणे गरजेचं आहे. आयुष्यात कधीही उपयोगी नं पडणाऱ्या जागतिक लढाया शिकवणाऱ्या इतिहास विषयात किती गुण मिळाले याची नोंद वर्षानुवर्षे ठेवली जाते. कधीही न भेटणाऱ्या कोणा एस्किमो लोकांबद्दल आणि कधीही राहावं न लागणाऱ्या इग्लू घरांबद्दल, भूगोल विषयात उत्तर देता येतं आहे की नाही याला गुण देऊन त्याची नोंद ठेवली जाते. बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार आणि फारफार तर टक्केवारीच्या पलीकडे बहुतांश माणसांच्या आयुष्यात गणिताचा संबंध येत नसताना, क्लिष्ट सूत्रं आणि प्रमेयं शिकवत आयुष्यातल्या सुंदर वर्षांचा चिखल करत त्या चिखलाची नोंद वर्षानुवर्षे ठेवली जाते. परंतु आयुष्यभर सतत उपयोगी पडणाऱ्या, लैंगिकतेच्या विषयाच्या शिक्षणाची आणि त्याच्या नोंदींची व्यवस्था मात्र कुठल्या शिक्षण पद्धतीत नसते.

अर्थात हा विषय शिकवण्याची जबाबदारी असणारे शिक्षक स्वतः या बाबतीत सज्ञान, प्रगल्भ आणि जवाबदार असणंही अतिशय गरजेचं आहे. ते स्वतःची मतं, स्वतःची बाजू विद्यार्थ्यांवर थोपवणारे असून चालणार नाही. या बाबतीतली माहिती आहे तशी विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणारे असायला हवे. मोकळेपणाने प्रश्न विचारायची भीती विद्यार्थ्यांना वाटणार नाही असे असायला हवे. परंतु आजच्या काळातही हा विषय बोलणं आणि शिकवणं शिक्षकांना प्रशस्त वाटत नसेल तर मग ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करुन देऊन विद्यार्थ्यांना ते पूर्ण करायला लावणं उपयुक्त ठरू शकेल. जर काही शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना, समोरासमोर, उघडपणे या विषयावर बोलणं प्रशस्त वाटत नसेल तर तो अडसर अशा ऑनलाईन कोर्सेसमुळे दूर होऊ शकेल. शेवटी योग्य ते ज्ञान योग्य त्या वयात आणि योग्य त्या खात्रीशीर माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवत, जनतेला लैंगिक-सज्ञान करण्याचा हेतू सफल होणं महत्वाचं.

भिन्नलैंगिकता म्हणजे काय? समलैंगिकता म्हणजे काय? या गोष्टी कशा नैसर्गिक असतात? विचारांना अनुसरून येणारे शरीराचे प्रतिसाद हे कसे सहज आणि स्वाभाविक असतात, ते कसे समजून घ्यायचे असतात? समलैंगिकता किंवा अगदी भिन्नलैंगिकतासुद्धा कशी “निवडायची” वगैरे गोष्ट नसते? आपल्या शरीराच्या नैसर्गिक उर्मी कशा जाणायच्या असतात? त्या न जाणल्यास त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात? ते स्वतःच्या आणि इतरांच्याही आयुष्यावर कसा दीर्घकालीन परिणाम करू शकतात? हे किशोरवयीन काळातच समजावलं गेलं तर तारुण्यात पाऊल ठेवताना आणि त्याहीपुढे, आयुष्यभराच्या साथीदाराची निवड करताना गोंधळ होण्याचा प्रश्न राहणार नाही.

थोडक्यात काय? या विषयाच्या बाबतीत योग्य वयात “कोsहम्”ला जागृत करुन “सोsहम्” मिळवल्यास पुढचं “काम” सोपं होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com