अनुभव सातासमुद्रापारचे... : नव्या सुलतानसाहेबांचे स्वागतही राहिले!

Shivkanya-Shashi
Shivkanya-Shashi

ओमान सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय पंधरा मार्चपासून लागू केला. शाळा बंद करायच्या आधी मशिदीची दारं बंद केली गेली. 

ओमानचे सुलतान काबूस बिन साईद यांचे १० जानेवारीला निधन झाले आणि देशातील सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले. पुढील चाळीस दिवस सुतक. नव्या सुलतानसाहेबांनी संपूर्ण देशाचा क्रीडा दिन चार मार्चला साजरा करायचा आदेश काढला. सगळीकडे उत्साही वातावरण होते आणि अचानक धाडकन फतवा आला, क्रीडा दिन रहीत. तेव्हा पहिल्यांदा कोरोनाची तीव्रता लक्षात येऊ लागली. आता सगळ्या अरब देशांनी शाळा, महाविद्यालये, थिएटर, मॉल बंद केली आहेत.

दरम्यान मुले शाळेत कमालीची काळजी घेत होती. सकाळी असेम्ब्लीमध्ये कोरोना काय आहे, आपण काय खबरदारी घेतली पाहिजे हे अरबी आणि इंग्लिश दोन्ही भाषांतून मुले स्टेजवर सांगत. आठवीच्या वर्गात तर वर्गातल्या वीस मुलांनी पैसे जमा करून सॅनिटायझर आणि हॅण्डवॉशच्या बाटल्या आणून वर्गात एका कोपऱ्यात ठेवून दिल्या. कुणीही न सांगता. एक तास संपून दुसरा तास सुरू होताना, शिक्षकांची जी ये जा होते, तेवढ्यात वर्ग शिस्तीत हाताला सॅनिटायझर लावे. दोन-तीन तासांनंतर सरफेस क्लिनिंग म्हणून डेस्क, खुर्ची यावरही सॅनिटायझरचे दोनचार थेंब घालून, टिश्यू पेपरने पुसापुशी करत! मुलांच्या या उत्स्फूर्त स्वच्छतेचे कौतुक वाटत होते. मुले आपल्यापेक्षा पुढे असतात, ते अशा प्रसंगी कळते. 

ओमान हा गल्फमध्ये सगळ्यात जास्त काळ धीर टिकवून ठेवणारा, आरोग्य सुविधा देणारा छोटासा देश. शाळा बंद करायच्या आधी मशिदीची दारं बंद केली गेली. मुस्लिम हा राष्ट्रीय धर्म असूनही, कोणताही आव न आणता योग्य ती पावले उचलली. इथले विशेष म्हणजे, सरकारी सूचनांचे तंतोतंत पालन करणे हा इथला शिरस्ता आहे. अशावेळी एक हुकमी राजसत्ता बरी वाटते. 

आम्ही अंदाज घेऊन आधीच ऑनलाइन क्लाससाठी पूर्वतयारी करून ठेवली होती. परंतु जेव्हा प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा मात्र सगळ्यांनाच ताण आला. मग स्वत:च्या आवाजात लेसन रेकॉर्ड करण्यापासून ते छोट्या छोट्या गोष्टी स्वत: करून त्याचे शुटिंग करण्यापर्यंत या सगळ्याचा आवाका वाढत गेला. आमच्या शिकण्या शिकवण्याच्या संकल्पना नव्या नव्या होऊ लागल्या. जे वेळेअभावी प्रत्यक्ष करता येत नव्हते, ते आता ऑनलाइन क्लासमध्ये पाठवता येऊ लागले आहे. पाठ्यपुस्तकाबाहेर जाऊन शिकवणे होऊ लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com