अनुभव सातासमुद्रापारचे... : अधिक काळजी आवश्‍यक

Tejswini-Ghanekar
Tejswini-Ghanekar

जपानमध्ये स्वयंशिस्त खूप आहे. त्यामुळेच इकडे आणीबाणी जाहीर होऊनही दैनंदिन व्यवहारांवर फारसा परिणाम झालेला नाही. पण कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

फार आधीपासूनच जपानचा स्वभाव इतर देशांपेक्षा वेगळा आहे. साम्राज्यवाद संपल्यापासून या देशाने टोकाची कार्यसंस्कृती स्वीकारली. त्यामुळे आता जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही आणि इकडेही बाधितांची संख्या दहा हजारांपर्यंत गेल्यावरही रोजच्या व्यवहारांमध्ये लक्षणीय असा काही फरक पडलेला नाही. सरकारने नागरिकांना घरी थांबायला सांगितले असले तरी तशी सक्ती नाही. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली असून बरेच जण कामावर जात आहेत.

मी, टोकियोमध्ये काही वर्षांपासून कामानिमित्त राहात आहे. मला सध्या घरून काम करण्याची सवलत मिळाली आहे. माझ्या काही भारतीय मित्र-मैत्रिणींना मात्र ऑफिसला अजूनही जावे लागत आहे. जपानमध्ये अनेक लोकच लॉकडाउनला अनुकूल नाहीत. हे लोक कामसू म्हणून जगप्रसिद्ध असून त्याचा सध्याच्या कठीण काळातही प्रत्यय येत आहे. अगदी मागे एकदा मोठी सुनामी आणि भूकंप आले होते, त्यावेळीही या लोकांनी झपाट्याने स्वतःला सावरत नेहमीच्या कामांना सुरवात केली होती. आताही विमान उड्डाणे सुरू आहेत. जपानी लोकांमध्ये स्वयंशिस्त भिनलेली आहे.

आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये, असा त्यांचा कायमच प्रयत्न असतो आणि लहानपणापासूनच त्यांना तशी सवय लावलेली असते. इतर वेळीही स्वतःच्या आरोग्याची अतोनात काळजी घेतात. म्हणूनच, येथील सरकारनेही ‘‘आम्ही नियम घालून दिले आहेत, पाळण्याची जबाबदारी तुमची’’ असे धोरण स्वीकारले आहे. सरकारने जनतेच्या सद्सद्विवेकबुद्धीवर ही गोष्ट सोडून दिली आहे. तरीही, युरोप-अमेरिकडे पाहिले तर जपानने काळजी घेण्यात उशीर तर नाही ना केला, अशी शंका येते. 

जपानची अर्थव्यवस्था मजबूत आहे. तिला तडा जाऊ नये, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. इतर देशांनी सहभागासाठी नकार दिल्यावर नंतर ऑलिम्पिक रद्द करण्याचा निर्णय, हा त्याचाच भाग आहे.

वृद्ध व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगतात. जपानमध्ये तर नव्वदी, शंभरी ओलांडलेलेही मोठ्या संख्येने आहेत. जपानी लोक एकमेकांत फारसे चर्चा करताना दिसत नाहीत. दररोज वृत्तपत्र वाचणे, असा काही प्रकारच नाही. तरीही, जागतिक परिस्थितीचे पडसाद जपानी मनांवर उमटत असल्याचे दिसत आहे. शिस्त, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा देश कधी काळी शून्यातून वर आला आहे. आताही त्याच आत्मविश्वासावर तो अवलंबून आहे. 
(शब्दांकन : सारंग खानापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com