चीन पाकिस्तानचा सातत्याने, असा अपमान करत आहे!

China-Pakistan
China-Pakistan

लेखक : मायकेल रुबिन [१]
पाकिस्तान भारताबाबत पूर्णपणे झपाटलेला आहे. १९४७ मध्ये झालेल्या फाळणीच्या वेळी झालेल्या जातीय दंगलींत २० लाख लोक मारले गेले होते. त्यानंतर या दोन देशांत तीन युद्धे झाली: पहिले १९६५ साली झाले ते काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीला भारताने दिलेले सडेतोड उत्तर होते, दुसरे १९७१ साली झाले त्याला बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धाची पार्श्वभूमी होती. आणि पुन्हा १९९९ साली हे दोन देश भिडले ते कारगिलवर पाकिस्तानने नियंत्रणरेषा ओलांडून केलेल्या आक्रमणाला उखडून टाकण्यासाठी दिलेले प्रत्युत्तर होते. प्रिन्सटन विद्यापीठाचे दिवंगत इतिहासतज्ञ बर्नार्ड लुईस यांनी सांगितल्याप्रमाणे 'निर्वासित' या शब्दाची संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारलेली व्याख्या[२]

जर आपण वापरलॊ तर दक्षिण आशियामधील देशांत आज दहा कोटी लोक शरणार्थी म्हणून वसलेले आहेत. पाकिस्तानमध्ये पसरलेले तणावपूर्ण वातावरण कुणालाही जाणविण्यासारखेच आहे. उदाहरणार्थ २००० साली पेशावर येथे पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्राची प्रतिकृती चौकातल्या वर्तुळात उभी आहे.

तिच्या खाली "मला भारतात घुसायला मनापासून आवडेल" असे लिहिलेला एक भव्य फलकसुद्धा आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अनेक मोठे फलक काश्मीरमध्ये संचारबंदी जाहीर केल्यापासून लोटलेला अवधी मोजणारी व दर्शविणारी प्रचंड घड्याळेसुद्धा हा अवधी सातत्याने मोजत आहेत.[३]

पाकिस्तानमध्ये भारतविरोधी वैरभाव तर भरभरून वाहातो आहे पण अलीकडच्या काळात पाकिस्तानचा अपमान करणार्‍या देशांमध्ये चीनचाच पहिला क्रमांक लागेल. आणि हा अपमान इतका जबरदस्त आहे की तसा पाकिस्तानचा अपमान भारताने आजपर्यंत कधीच करता आलेला नाहीं. अखिल भारतीय मुस्लिम लीगचे नेते व पाकिस्तानचे संस्थापक मुहंम्मद अली जिन्ना यांनी पाकिस्तान बनविला तो एक मुसलमानांचा देश म्हणून. पाकिस्तानची वैधता धर्मावर[4] आधारित होती, वांशिकतेवर[4] नाही. खर्‍या अर्थाने ते आधुनिक जगातील पहिले-वहिले 'मुस्लिम' राष्ट्र होते.  ऐतिहासिक दृष्टीकोनातून पाहिल्यास मुस्लिम जनतेची वकीली करण्यात व मुस्लिम जनतेविरुद्धच्या जुलूम-जबरदस्तीच्या विरोधात, मग त्या खर्‍या असोत वा काल्पनिक, पाकिस्तान नेहमीच ठामपणे उभा राहिला आहे. याच तत्वानुसार पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये सोवियेत महासंघाच्या सर्व मनसुब्यांचा नायनाट केला होता.

जगातील सर्वात जास्त इस्रायलविरोधी व ज्यूविरोधी राष्ट्रांमध्ये पाकिस्तान खूपच अव्वल स्थानावर आरुढ आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमें म्यानमारमधील सर्वात जास्त गांजल्या गेलेल्या रोहिंग्या मुसलमानांबद्दल खूप सातत्याने लिहीत आलेली आहेत. पाकिस्तानी धर्मादाय संघटना सातत्याने चेचन्यामधील मुस्लिम जनतेसाठी काम करत असतात. भारताबाबत वैर धरणारे आतंकी गट पाकिस्तानात बघावे तिकडे आहेत व ते राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन नव्हे तर धार्मिक भावनेने भारताला लक्ष्य करीत असतात आणि तरीही केवळ मुसलमान म्हणून उईघूर समाजातील लाखों लोकांना तुरुंगात डांबणार्‍या चीनबद्दल पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान एकदम चुप्पी साधून आहे. एवढेच नव्हे तर त्याने चीनने केलेल्या चिनी मुसलमानांवरील अत्याचारांबद्दल चीनला समर्थन तर दिलेले आहेच पण पाकिस्तानमध्ये निर्वासित म्हणून वास्तव्यास आलेल्या उइघूर नागरिकांचे हालही केलेले आहेत!

पर्यटन व्यवसायाला पुष्टी देण्यासाठी दोन देशांतील दोन सारख्या शहरांना 'जुळ्या बहिणीं'चा दर्जा देण्याची राजनैतिक पद्धत बरीच रूढ आहे. इथेच न थांबता दोन शहरांनांच नव्हे तर दोन प्रांतांना 'जुळ्या बहिणीं'चा दर्जा देण्याची राजनैतिक पद्धत अनुसरून चीनने व पाकिस्तानने ही पद्धत एका नव्या पातळीवर नेलेली आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या बेजिंगस्थित दूतावासाने चिनी परराष्ट्रमंत्रायलाला चीनच्या उइघूर लोकांची वस्ती असलेल्या शिनज्यांग प्रांताला व पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान[५] या प्रांताला जुळ्या बहिणींचा दर्जा देण्याबद्दल एक पत्र लिहिले. म्हणजेच याचा अर्थ असा की इम्रान खान चीनच्या दबावापुढे इतका झुकलेला आहे कीं त्याला २१व्या शतकातील सर्वात जबरदस्त छळवणुकीला तोंड देत असलेल्या आपल्या मुसलमान बांधवांच्या यातनांकडे काणाडोळा करण्यापलीकडे जाऊन उलट या मुसलमानांच्या छळवणुकीचा केन्द्रबिंदू असलेल्या या प्रांताबरोबर 'जुळ्या बहिणींचे' नाते जोडायलासुद्धा त्याला कांहींच वाटत नाही. त्याला या कृतीचे समर्थनच करावे लागत आहे. इम्रान खान यांना चीन जी छळवणूक सध्या शिन्ज्यांग प्रांतातील मुसलमान उईघूर जनतेची करत आहे तशीच छळवणूक आपल्या गिलगिट-बाल्टिस्तान या वादग्रस्त प्रांताच्या जनतेची करण्यासाठी प्रोत्साहन वाटत असले तरी त्यासाठी मुसलमान धर्माविरुद्ध मुसलमान जनतेविरुद्ध वागणार्‍या बेजिंग राजवटीला गर्भित समर्थन द्यावे लागत आहे हे त्यांना लक्षात ठेवावे लागेल.

करोनाव्हायरसने पूर्णपणे ग्रस्त असलेल्या व या व्याधीचा केंद्रबिंदू असलेल्या वुहान प्रांतातील पाकिस्तानी विद्यार्थ्यांना वार्‍यावर सोडण्याचा निर्णय घेण्यामुळे पाकिस्तानचा आणखीच अपमान होत आहे. भारतासह जगातील जवळ-जवळ सर्वच इतर राष्ट्रांनी आपल्या विद्यार्थ्यांना खास विमाने पाठवून मायदेशी परत आणलेले आहे. स्वत:वर, स्वत:च्या परदेश वार्‍यांवर व लष्करावर भरमसाट खर्च करणार्‍या इम्रान खान यांनी आपल्या देशाच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आधारभूत संरचनेकडे अगदीच दुर्लक्ष केलेले आहे व तिला दयनीय अवस्थेला आणलेली आहे. थोडक्यात या संसर्गजन्य आजाराची लागण झालेल्यासाठी आवश्यक असलेली लोकांना अलग ठेवण्याची व्यवस्था भ्रष्टा़चार व अंदाधुंद कारभार या दोन समस्यांमुळे कडक शिस्तीने लागू करता येणार नाहीं याची इम्रान खान यांना कल्पना असणार. म्हणूनच त्यांनी आपल्या लागण झालेल्या संभाव्य लोकांना परदेशीच ठेवण्याचा निर्णय घेतला असावा. शहरात सोडून दिल्या गेलेल्या पाकिस्तान्यांची चीन मुळीच काळजी घेऊ शकत नाहींय्. थोडक्यात इम्रान खान यांच्या कारकीर्दीत पाकिस्तानी असणे याचा अर्थ मुकाट्याने दु:ख सहन करत रांगेच्या शेवटच्या जागेवर वाट पाहात उभे राहाणे असाच होतो.

पाकिस्तानच्या अमेरिकाविरोधी धोरणामुळे त्याणे चीनकडे झुकणे अगदी सोपे झाले. पण दरम्यान चीनने पाकिस्तानला अनेक महामार्ग व एक बंदर बांधून दिले आहेत. पाकिस्तानची अशी गैरसमजूत झाली कीं तो आता चीनच्या 'खुष्कीच्या मार्गांच्या व जलमार्गाच्या विकासाच्या प्रकल्पात एक मुकुटमणी झालेला आहे. पण हळूहळू सत्य परिस्थितीचे ज्ञान त्याला होऊ लागले आहे. चीन आणि अमेरिका या देशांना एकमेकांविरुद्ध भिडवून आपले स्वतंत्र अस्तित्व व प्रतिष्ठा अबाधित राखण्याची आशा ठेवण्यापेक्षा एका पाठोपाठ एक सत्तेवर येणार्‍या पाकिस्तानचे राज्यकर्ते चीनच्या इतक्या कचाट्यात सापडलेले आहेत कीं ते आता मुसलमानांच्या हितासाठी तर सोडाच पण स्वत:च्या नागरिकांच्या हितासाठीसुद्धा ठामपणे उभे राहू शकत नाहींत. पाकिस्तानला भले वाटत असेल कीं तो एक प्रबळ प्रादेशिक सता आहे पण अलीकडील घटनांकडे पाहाता असे लक्षात येते कीं चीन पाकिस्तानकडे केवळ आपली एक दुय्यम दर्जाची 'वसाहत' म्हणूनच पाहातो. म्हणजेच एक अशी वसाहत तिचा फक्त उपभोग घ्यायचा पण तिच्या कुठल्याही मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे!

टिपा 
[१] मायकेल रुबिन हे अमेरिकन एंटरप्राईज इन्स्टिट्यूट मध्ये निवासी विशेषज्ञ (resident scholar) म्हणून काम करत आहेत व तेथे ते अरबस्तानचे राजकारण, आखाती सहकार परिषद, इराण, इराक, कुर्ड, आतंकवाद आणि तुर्कस्तान या विषयांवर संशोधन करीत आहेत. तसेच ते FBI साठी आतंकवाद आणि अमेरिकेच्या व 'नाटो'च्या लष्करी अधिकार्‍यांसाठी सुरक्षा, राजकारण, धर्म व इतिहास हे विषय शिकवितात.
[२] ही व्याख्या इस्रायलने विस्थापित केलेल्या पॅलेस्टाईच्या नागरिकांबद्दलची आहे.
[३] पाकिस्तानच्या 'पछाडलेल्या मनोवृत्ती'चे हे उदाहरण खूपच बोलके आहे व ते उदाहरण मुस्लिम समाजाच्या जगभरच्या वागणुकीतही आपल्याला सर्वत्र दिसते. या उदाहरणांमधून आपण एकाद्या समाजाची एकजूट कशी केली पाहिजे याबद्दल अभ्यास करून ते ज्ञान आपल्या स्वत:च्या समाजाच्या एकजुटीसाठी वापरले पाहिजे.
[4] religion आणि ethnicity
[५] हा एके काळच्या जम्मू आणि काश्मीर संस्थानाचा भाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com