esakal | संवादातून स्पर्श आणि स्पर्शातून संवाद 
sakal

बोलून बातमी शोधा

chitra bhave writes about Touch and communication

संवादातून स्पर्श आणि स्पर्शातून संवाद 

sakal_logo
By
चित्रा भावे

एक दिवस आमच्या मावसबहिणीकडे गच्चीतल्या बागेत फिरत असताना अनीशचा हात एका झाडाला लागला. त्या झाडाची पाने एकदम मिटायला लागली. अनीशला खूप आश्‍चर्य वाटले. त्याला मी सांगितले की, या झाडाचे नाव आहे. लाजाळू किंवा Touch–me-not पुढे गेलो तर एक केशरी फुलांचे झाड होते. त्या फुलांना काहीच वास येईना. मी अनीशला म्हणाले की, ही तर अबोली आहे तर तो पटकन म्हणाला म्हणजे"Speak –me-not" ???? 

त्याच्या या प्रश्नावरून "स्पर्श' आणि "संवाद' या शब्दांनी माझ्या डोक्‍यात पिंगा घालायला सुरवात केली. स्पर्शातून संवाद घडू शकतो का असा विचार मनात आला. भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग आठवला"टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या सांग, देवाजीच्या दारी आज, रंगला अभंग". त्यामध्ये एक कडवे आहे, 
""जनसेवेपायी काया झिजवावी, घाव सोसूनिया मने रिझवावी, 
ताल देउनी हा बोलतो मृदूंग ....देवाजीच्या दारी आज रंगला अभंग'' 

मृदूंगावर थाप पडली तरच त्यातून छान ताल निर्माण होतो. झाकीर हुसेन यांनी तबल्यावर नुसता हात फिरवला तर स्वर्गीय संवाद ऐकायला मिळतो"ता धि ना..ता धि ना 
काही काही वेळा स्पर्श खूप काही सांगून जातो. मला आठवते आहे एकदा रिव्हर राफ्टिंगला करताना माझ्या डोळ्यासमोर अनीश वाहत्या पाण्यात पडला आणि नदीच्या प्रवाहामुळे वाहत जायला लागला. मी माझ्या बरोबर असलेल्या मैत्रिणीचा हात एवढा घट्ट दाबला होता की तिला माझ्या मनातल्या भीतीची पूर्णपणे जाणीव झाली. ती मला धीर देऊ लागली की अनीशला काही होणार नाही. आमच्या दोघीतला संवाद केवळ त्या स्पर्शाने सुरु झाला. 

कधी कधी खुश होऊन आपण समोरच्या व्यक्तीच्या हातावर टाळी देतो. तो सुद्धा एक संवाद असतो. केवळ स्पर्शातून सुरु झालेला ! मुलांच्या यशाच्या आनंदाने त्यांना आपण कौतुकाची शाबासकी देतो आणि मग वेगळे कौतुक करायची गरजच राहत नाही. तो स्पर्श खूपच बोलका असतो. कधी कधी सांत्वनासाठी पण हळूवार स्पर्शाची गरज असते. अशा वेळी शब्दांची जागा स्पर्श घेतो. 
मात्र काही काही स्पर्श जीवघेणे असतांत. डिसेंबर रात्री "निर्भया'ला झालेले सगळे स्पर्श असेच जीवघेणे ठरले. सगळे संवाद, सगळ्या किंकाळ्या त्या बसमध्ये संपवण्यात आल्या. तिच्या मनाविरुद्ध, तिच्या मित्राच्या विरोधाला न जुमानता क्रौर्याचा कळस झाला. 

संवादातून स्पर्श सुद्धा घडू शकतो. जेंव्हा आपण एखाद्या प्रसंगाचे किंवा ठिकाणचे "वास्तववादी वर्णन ऐकतो तेव्हा आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा, तिथल्या गोष्टींना हात लावल्याचा भास होतो. हल्लीच्या व्हर्च्युअल जगात तर कुठे अमेरिकेत पूजा चालली असली तरी वेबकॅम वरून भारतातल्या लोकांना व्हच्युअल फुले वाहता येतात! आणि ते सुद्धा तिथे उपस्थित लोकांशी गप्पा मारत मारत ! आता तर तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की व्हिडिओ कॉन्फरन्स वरून एका ठिकाणी चाललेले  life saving operation जगात कुठेही बघता येते आणि आपण प्रत्यक्ष त्यात सहभागी असल्याचा समाधान मिळते! 

आपण फोन वर आई-वडिलांशी बोलतो. कधी कधी जेव्हा आपण भावुक झालेलो असतो आणि त्यावेळा जर आईचा आवाज पलीकडून ऐकला तरी त्या मायेचा स्पर्श त्या आवाजातून जाणवतो. "मधु' इथे आणि "चंद्र' तिथे असेल तर फोनसारखे वरदान नाही. "चंद्र' असे काही बोलतो की दूर देशी असलेल्या "मधुच्या' गालावर मोरपीस फिरले जाते! संवादात अशी जादु असते. 

काही काही संवाद म्हणा किंवा शब्द असे पण असतात की समोरच्या व्यक्तीच्या मनावर ओरखडे उमटले जातात. हा पण एक प्रकारचा स्पर्शच की जो संवादातून साधला जातो! 
संवाद आणि स्पर्श जर एकमेकाला पूरक असले तरी आपापल्या परीने दोन्ही तेवढेच परिणामकारक असतात! 

शिवाजीमहाराजांच्या एका हाकेसरशी सर्व मावळ्यांनी पेटून स्वराज्याचे तोरण बांधले आणि शिवशाही घडवली. हल्लीच्या काळात सावरकर, टिळक यांच्या भाषणातून स्फूर्ती घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले. चांगल्या गोष्टी घडण्यासाठी संवाद घडणे अतिशय महत्वाचे आणि गरजेचं आहे. पण पाहिजे तसे संवाद न घडल्यामुळे सुद्धा कोणाकोणाचे भले झाले आहे. उदाहरणच घ्यायचे तर "बालाजी फिल्म्स'ची एकता कपूर ! तिच्या मालिका वर्षानुवर्ष यशस्वी का लोकप्रिय होतात...कारण त्या मालिकेतल्या पात्रांमध्ये पाहिजे तेंव्हा संवाद घडतच नाहीत! 

स्पर्शाचे म्हणाल तर परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते पण "Midas Touch ' ने मात्र चालत्या बोलत्या राजकन्येच पण सोने झाले असं आपण कथेत वाचले आहे. 
रामायणातले एक छान उदाहरण द्यावेसं वाटतं . गौतम ऋषींनी दिलेल्या शापामुळे ( हा झाला एक संवाद )अहिल्येची शिळा झाली (म्हणजे स्पर्शाचा शेवट). पण श्रीरामाच्या "चरण स्पर्शाने'त्याच शिळारुपी अहिल्येचा उद्धार झाला आणि केवळ स्पर्शानेच परत संवादाची सुरवात झाली. 

आपण दुसऱ्या व्यक्तीचे वर्तन फार तर फार धाक घालून, धपाटा घालून बदलू शकतो पण जर त्या व्यक्तीचे मन वळवायचे असेल तर त्यासाठी केवळ मुद्देसूद आणि मोजक्‍या शब्दांनी संवाद करणे हाच खरा मार्ग असतो. 

वपुंच्या भाषेत सांगायचेच तर"मुळाक्षर, बाराखडी म्हणा किंवा वर्णमाला सगळेच शिकतात. पण याच वर्णमालेत सुसंवादातला "सु' मिसळला की त्याचीच "सुवर्णमाला होते. 

अशा "सुवर्णमालेच्या' मदतीनं आपण सगळ्यांशी मनमोकळा "सुसंवाद' घडवून तरल मनाला स्पर्श करू या का?