esakal | सायकलिंग: 3 देशातून 6 दिवसात 334 किमी!
sakal

बोलून बातमी शोधा

सायकलिंग: 3 देशातून 6 दिवसात 334 किमी!

सायकलिंग: 3 देशातून 6 दिवसात 334 किमी!

sakal_logo
By
संदीप कुलकर्णी, कझाकस्तान

...आणि मी ठरवलं कि व्हिएन्ना ते बुडापेस्ट सायकलिंगच करायची आणि ती हि एकट्याने. ऑस्ट्रियामधल्या खूप ट्रॅव्हल कंपनींना विचारून झालं होतं. पण हिवाळा सुरू होत असल्याने कोणीच ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सायकलिंग टूर ऍरेंज करायचं होतं. मला मात्र त्याच कालावधीत ब्रेम मिळाला होता आणि मला ही संधी सोडायची नव्हती. कझाकस्तानमध्ये जून-जुलैमध्ये जो उन्हाळा येतो तो भारतातील हिवाळ्यासारखा असतो. लहानपणी मी शाळेत सायकलवर जायचो. यामुळे लहानपणापासून सायकलवर असलेले प्रेम आणखीन वाढले. तसेच युरोप बघण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग सायकल आहे हे ही मागच्या वर्षी केलेल्या जर्मनी, झेक रिपब्लिक आणि पोलंड या टूर मध्ये लक्षात आलं होतं.

व्हिएन्ना एक्‍सप्लोरर ही व्हिएन्नामधील कंपनी. दीडशे डॉलर्समध्ये सायकलचे 6 दिवसांचं भाडं व बुडापेस्ट या शहरात सायकल डिलेव्हरी, सोबत नकाशा, हेल्मेट अशी डील द्यायला तयार होती. लगेच विमानाचं तिकीट चेक केलं आणि मला आस्ताना-व्हिएन्ना-बुडापेस्ट-आस्ताना असं विमानाचं टर्किश एअर लाईन्सच तिकीट देखील स्वस्तात मिळालं. सगळं काही जुळून येत आहे हे लक्षात आल्यावर मी ठरवलं की हे साहस करायचंच. भारतीय पासपोर्ट असल्याने व्हिसाचे सर्व सोपस्कार पूर्ण केले. 21 ऑक्‍टोबर शुक्रवार शाळा पूर्ण झाली की लगेच सरळ विमातळावर गेलो कारण माझी फ्लाईट संध्याकाळी 8 वाजता होती. शनिवारी सकाळी 8 वाजता मी व्हिएन्नाला पोहोचलो. बुक केलेल्या हॉटेलमध्ये चेकइन केलं आणि लगेच व्हिएन्ना एक्‍सप्लोरर कंपनीचा पत्ता शोधला. ई-मेलवरून बुक केलेली सायकल हस्तगत करण्यासाठी व्हिएन्ना एक्‍सप्लोररच्या दुकानात पोहोचलो. दुकानातल्या मुलीने माझी ओळख पटवून माझ्यासाठी तयार केलेली सायकल मला दाखवली तसेच सायकल सोबत पाठीमागे कॅरिअर ला लावायला दोन बॅग्स, हेल्मेट आणि रिपेरिंग किट ज्यामध्ये एक ट्यूब, पाने, स्क्रू ड्रायवर इत्यादी साहित्य होते. नंतर तिने बुडापेस्ट ला सायकल कुठे डिलीव्हर करायची ती जागा तसेच व्हिएन्नामधून बाहेर कसे पडायचे आणि सायकलचा रस्ता कसा शोधायचा हे सविस्तर समजावून सांगितलं. मी सगळं काही समजत आहे असा आव आणून फक्त सायकलकडेच लक्ष देत होतो. पाठीमागे 6 तर पुढे 3 गिअर असलेली सायकल जी पुढच्या 6 दिवसांसाठी 334 किमी अंतर व तीन वेगवेगळ्या देशात जाण्यासाठी वापरणार होतो. अशा या साहसाच्या विचारातच मी हरवून गेलो होतो. त्यामुळे तिने सांगितलेल्या सूचना महत्वाचं म्हणजे विशेष लॅन्डमार्क्‍स मी फार लक्ष देऊन ऐकलेच नाही. सायकल हस्तगत करून मी परत हॉटेलवर आलो. उत्साहाच्या भरात कधी सकाळ होते या विचारताच मी झोपून गेलो. नकाशा नीट बघण्याचे त्यामुळे राहूनच गेले.

दुसऱ्या दिवशी आठ वाजता हॉटेलमधून चेक आउट केलं आणि सायकलिंगला सुरुवात केली. जीपीएसच्या सहाय्य्यने थोडा अडखळत कसाबसा शहराच्या बाहेर पडलो आणि जीपीएसवरच अवलंबून राहायचे असे ठरवले. पहिल्या दिवसाचे अंतर होते 76 किमी व मला स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लाव्हा येथे पोहचायचे होते. ब्रातिस्लाव्हा आणि व्हिएन्ना या जगातल्या सगळ्यात जवळच्या राजधान्या आहेत. साधारण 10-12 किमी नंतर मी एका चौकात आलो आणि जीपीएस दाखवत असलेल्या मार्गाने मला उजवीकडे मी वळालो पण 5-10 मिनिटात लक्षात आलं कि आपण एक्‍प्रेस वे ला लागलो आहोत म्हणून. भरधाव वेगाने जाणाऱ्या कार्स बघून तसेच रस्त्यावरचा 120 किमी/तास बोर्ड बघून माझ्या लक्षात आले की आपण काहीतरी चूक केली आहे. आता परतही जाता येत नव्हते आणि सरळ जाणे धोकादायक होते. तेवढ्यात एक भरधाव जाणारी कार अचानक रस्त्याच्या कडेला थांबली व त्यातला माणूस चक्क माझ्यावर ओरडला व म्हणाला कि, "ऑस्ट्रियामध्ये एक्‍प्रेस वे वर सायकल्सला परवानगी नाही. पोलीस पकडतील, निघून जा इथून' पोलीस शब्द ऐकून मी हादरूनच गेलो. पोलीस ते ही परदेशातले त्यात मी शिक्षक. यापुढे मी कल्पनाच करू शकलो नाही. मी काही म्हणायच्या आत तो म्हणाला कि, "इथून 200 मीटरवर एक्‍झिट आहे तिथून लवकरात लवकर बाहेर पड.' मी शक्‍य तेवढ्या वेगात 200 मीटर सायकलिंग केली आणि एक्‍स्प्रेस वे वरून बाहेर पडलो. पण पुन्हा तिथेच आलो जिथून एक्‍स्प्रेस वे ला लागलो होतो. काहीच समजत नव्हते की आता काय करायचे ते. एक दोघांना विचारून पाहिलं. पण कोणी च ब्रातिस्लाव्हाचा सायकलचा रस्ता सांगू शकत नव्हतं. असं ही समजलं की जीपीएस फक्त हाय वे आणि एक्‍स्प्रेस वे च दाखवतं. सायकलिंग ट्रक्‍स तितके शे अपडेट झालेले नाहीत म्हणून आणि मग माझ्या लक्षात आलं की सायकलच्या दुकानात ली मुलगी मला सविस्तर सांगत होती. पण उत्साहाच्या भरात मी काही लक्षपूर्वक ऐकलं नव्हतं. स्वतःवर चिडत मी ठरवलं की आता परत व्हिएन्नाला जायचं आणि सायकल देऊन टाकायची आणि चुपचाप बसने किंवा ट्रेनने फिरायचं. असं म्हणून मी वापस व्हिएन्नाकडे निघालो. दोन-तीन किलोमीटर नंतर, माझ्याविरुद्ध दिशेने एक आजी आणि आजोबा स्पोर्ट सायकल वरून येताना मला दिसले. त्यांच्या पोषाखावरून लक्षात आलं की ते लांबच्या ठिकाणावरून सायकलिंग करून आले आहेत. मी शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना विचारावं असं ठरवलं. आणि काय आश्‍चर्य, ते दोघे ब्रातिस्लाव्हावरूनच आले होते. ते नेहमी व्हिएन्नाला सायकल वरच येतात. त्यांचं वय साधारण 60 पेक्षा नक्कीच जास्त असावं, असं मला समजलं. ते म्हणाले की ब्रातिस्लाव्हाला सायकल वर जाण्यासाठी रस्त्यावरचं वळण मी घेतलचं नाही. त्यामुळे मी एक्‍स्प्रेस वे ला लागलो. ते यावरच थांबले नाहीत तर केवळ माझ्यासाठी साधारण 5 किमी परत आले व मला ते वळण त्यांनी दाखवलं. हे कमी होतं की काय तर त्यांनी मला पुढचा रस्ता अतिशय व्यवस्थित सांगितला आणि यावेळेस मी तो लक्षपूर्वक ऐकला. त्यानंतर मला कुठेच त्रास झाला नाही. त्यांनी सांगितलेल्या खाना-खुणा मला व्यवस्थित सापडत गेल्या. एरवी नशीबावर विश्वास न ठेवणारा मी मात्र ते दोघे आजी आणि आजोबा भेटल्यामुळे नशीबवान ठरलो होतो. 66 किमी एका दिवसात माझ्यासारख्या सवय नसलेल्याला जरा जास्तच होते. परंतु युरोप मधल्या खेडेगावांचे अस्सल सौंदर्य बघून थकवा मुळी जाणवताच नव्हता. एका ठिकाणी एक छोटंसं हॉटेल दिसलं. त्या हॉटेलात उकडलेले बटाटेही होते. तिथे मी खाऊन घेतलं. हिरवेगार गवत, थोडीशी थंडी, ऑटम असल्याने रंगीबेरंबगी झाडांची पाने, निळे आकाश आणि त्यात दूरपर्यंत मागे, पुढे बाजूला कोणीच नाही. हे सगळं बघून जणू काही हा अद्‌भूत निसर्गाचा नजारा फक्त माझ्यासाठी होता असं वाटत होतं.

संध्याकाळी साधारण 6 वाजेपर्यंत मी ब्रातिस्लाव्हा शहरात पोहोचलो. सायकलचा रास्ता सरळ सिटी सेंटर मध्ये घेऊन गेल्याने फार काही त्रास नाही झाला. पर्यटकांची वर्दळ व खूप सारे हॉटेलचे बोर्डस दिसले. लगेच मला परवडेल असं हॉटेल शोधलं आणि काही विचार करायच्या आत पलंगावर स्वतःला झोकून दिलं. रात्री साधारण 9.30 ला उठलो आणि भारतीय रेस्टॉरंट शोधले. भरपेट भारतीय जेवण केलं. रात्री हातात शहाण्यासारखा दुसऱ्या दिवशीचा मार्ग नकाशावर बघितला आणि झोपी गेलो.
ब्रातिस्लाव्हा शहर तसे छोटे असल्याने शहराबाहेर पडायला काहीच त्रास झाला नाही. माझे दुसऱ्या दिवसाचे अंतर होते 60 किमी आणि ठिकाणाचे नाव होते मोसोनमगिरोव्हर. हे हंगेरीतील एक छोटेसे खेडे आहे, असे वाचण्यात आले होते. मोसोनमगिरोव्हर पर्यंतचा रास्ता जवळपास पूर्णच सायकलसाठी स्वतंत्र होता. त्यामुळे थोडाही त्रास झालं नाही. पुन्हा एकदा लांब, स्वच्छ, गुळगुळीत सायकलचा ट्रॅक. दोन्ही बाजूला हिरवळ निरभ्र आकाश. अख्ख्या ट्रॅक वर पुन्हा एकदा मी एकटाच. अगदी सहज कुठलीही औपचारिकता पार ना पाडता मी हंगेरीमध्ये आलो. खेळण्यासारखी छोटी छोटी घरे, समोर छोटं अंगण, अतिशय स्वच्छ आणि सुंदर हंगेरीमधील खेडेगावं बघून तिथून निघावेसेच वाटत नव्हते. तरी हळू हळू सायकलिंग करत साधारण पाचच्या दरम्यान मोसोनमगिरोव्हर पोहोचलो. पुन्हा एकदा हॉटेल शोधण्याचा उपक्रम पार पाडला व जवळच्याच रेस्टारंट मध्ये शाकाहारी पिज्जा खाऊन दुसऱ्या दिवसाच्या मार्गाचा वेध घेतला. दुसऱ्या दिवस हा या मोहिमेतला सर्वात आव्हानात्मक दिवस ठरला. दुसऱ्या दिवसाचे अंतर होते 80 किमी आणि गावाचे नाव होते कोमाराम. गुगल वर असं कळलं कि सहसा सायकलिंग करणारे इथे सायकल ट्रेन मध्ये टाकून नेतात. कारण एकच
आढळून आलं आणि ते म्हणजे अंतर. मी मात्र ठरवलं कि आपण हे सायकलनेच पूर्ण करायचं. 80 किमी असल्याने मी सुरुवात जरा लवकर केली.

पहिले 30 किमी सायकलचाच ट्रक होता, एकदम मजेत हे अंतर गेलं, नंतर अचानक सायकलची खून असलेला बोर्ड एका कच्च्या पायवाटेकडे वळण्यासाठी सांगत होता. मी थांबलो आणि नकाशात बघावे असा विचार केला बॅग उघडून बघितली तर नकाशा सापडतच नव्हता. आणि लक्षात आले कि नकाशा हॉटेलमध्ये सकाळच्या गडबडीत विसरला. जीपीएस कामाचे नाही. रस्त्यावर विचारायला कोणी नाही. अशा परिस्थितीत निर्णय घेणे महत्वाचे होते. मी ठरवले की त्या पायवाटेनेच जायचे. कदाचित पुढे चांगला रस्ता असेल असा विचार केला . आणि ज्याची भीती होते तेच झाले, साधारण 1 तास रस्ता कच्चा व झाडाझुडपातून जाणारा होता. मला सर्वांत भीती होती ती म्हणजे चाक पंक्‍चर होईल याची. पण एक तासाच्या कच्च्या पायवाटेवरून जाताना सुदैवाने असे काहीच घडले नाही. पायवाट संपली आणि लक्षात आलं की मी थोड्या उंचीवर आलो आहे. आता एका मोठ्या रस्त्याला लागलो आहे. अचानक इथे ढग दाटून आले आणि जोराचा पाऊस सुरु झाला. एकही झाड किंवा छतासारखा काहीही आजूबाजूले नव्हते ज्याचा मी आडोसा घेऊ शकत होतो. सात-आठ मोठमोठ्या पावन चक्‍क्‍यातेवढ्या जवळ होत्या आणि पुन्हा एकदा निर्मनुष्य जागा. इथे तर मी जाम घाबरलो. माझ्या सोबतच्या बॅग्स वॉटरप्रूफ असल्याची मी खात्री करून घेतली आणि तसाच पावसात भिजत उभा राहिलो. भिजत असतांना लक्षात आलं कि का सायकलिस्ट साहसा कोमारामला ट्रेनने जाणं पसंत करतात. पुन्हा एकदा स्वतःला दोषी ठरवत मी पाऊस कमी होण्याची वाट पाहत राहिलो. दुसरी पंचाईत अशी झाली की माझा वेळ वाया जात होता. दुपारचे दोन वाजले होते. थोड्याच अंतरावर कोमारामची पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं 30 किमी म्हणजे मला आणखीन 30 किमी जायचे होते. दुपारी दोनपर्यंत जवळचे फळ आणि ब्रेडच फक्त काय ते खाल्लेले होते. पाऊस कमी झाला. मी तातडीने सायकलिंगला सुरुवात केली. संध्याकाळी पाचपर्यंत अंधार पडू लागला आणि आणखीन ही मी कोमारामला पोहोचलो नव्हतो. आता मात्र मी हादरूनच गेलो. अंधाराच्या आत ठरलेल्या शहरात पोहोचायचे हा माझा ढोबळ नियम होता. पण या दिवशी सगळंच विचित्र घडलं. तरीही कसातरी सायकलिंग करत राहिलो, रात्री सातच्या दरम्यान शहरात पोहोचल्याची जाणीव झाली. लगेच हॉटेलचा बोर्ड दिसला. काय किंमत असेल ती द्यायची आणि झोपायचं या विचारात आत गेलो. चुपचाप हॉटेल बुक करून न जेवताच झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग आली. त्या दिवसाचे लक्ष होते एस्टरेगोम नावाचे गाव. हे 55 किमी वर होते. आपण 55 किमी सहज करून जाऊ असा विचार आला, आणि लगेच सुरुवात केली. पुन्हा एकदा युरोपमधील शहरांच्या बाहेरील सौंदर्याने एकदम ताजेतवाने वाटले होते. थकवा नावाचा प्रकार काय असतो याची जाणीवच होत नव्हती. विशेष म्हणजे आता सायकलिंगचा ट्रॅक पूर्णपणे डॅन्यूब नदीच्या काठा काठा ने होता. डॅन्यूब हि युरोप मधली सर्वात लांब नदी असून ती जवळपास युरोपमधल्या सगळ्याच देशांतून जाते. एका बाजूला स्वछ सुंदर नदी. कुठेही घाण, कचरा, नाही. दुसऱ्या बाजूला मोठ्या वाहनांसाठी रस्ता आणि त्याच्या पलिकडे युरोप मधली शेतीचे अप्रतिम सौंदर्य असा नयनरम्य नजारा होता. ते चित्र अक्षरशः कॉम्प्युटर मधल्या रेडिमेड वॉलपेपर सारखे होते. पुन्हा एकदा पुष्कळ ठिकाणी अंतर लवकर संपेल या विचाराने सायकल न चालवता सायकल हातात घेऊन पायीच चालत होतो. एस्टरेगोम ला पोहोचल्यावर fortune favors the brave याचा अनुभव आला. एस्टरेगोम सुद्धा अप्रतिम सौंदर्य असलेले खेडे होते. मी 2-3 ठिकाणी हॉटेलची चौकशी केली. सगळे हॉटेल्स बुक झाले होते. भूक लागली म्हणून एका रेस्टारंट मध्ये शिरलो तिथल्या मुलीला सहज म्हणून विचारले आणि माझ्या व्हिएन्ना ते बुडापेस्ट टूर ची कल्पना दिली. ती अतिशय नम्रपणे तिला काही माहित नाही असे म्हणाली. आमचे संभाषण बाजूच्या टेबलवर बसलेल्या दोघांपैकी एकाने ऐकले व तो माझ्या जवळ येऊन म्हणाला, " रूमसाठी किती बजेट आहे?" मी म्हणालो, "30- 40$ एका रात्री साठी'. त्याने मला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. मी सरळ निघालो. बाहेर आल्यावर तो एका मोठ्या आलिशान कारमध्ये बसला. त्याच्या मागे मी सायकल वर निघालो. थोड्याच वेळात तो एका मोठ्या आणि चकचकीत इमारतीसमोर थांबला. हे हॉटेल मी आधी बघितले होते. पण ते महाग असेल हा विचार करून मी तेथे गेलोच नाही. कार मधून उतरल्यावर मी त्याला म्हणालो, "मिस्टर, तुम्हाला माझे बजेट माहित आहे ना?' तो फक्त हसला आणि मला त्याच्या मागे येणास सांगितले. आम्ही जसे आत मध्ये गेलो तसे मधले सगळे कर्मचारी आम्हा दोघांना पाहून आपापल्या जागेवरून उठत होते. मला काही की कळायच्या आत त्याने मला एका रूममध्ये नेले. जे त्याचे केबीन होते. कारण तो सरळ मेन खुर्ची वर बसला. त्याने त्याचे व्हीसीटींग कार्ड मला दिले. त्यावर लिहिले होते hotel director. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तो लगेच मी काही बोलण्याच्या आत मला म्हणाला, "मी तुझे रेस्टारंटमधले बोलणे ऐकले आणि मला नवल वाटले की एक भारतीय व्हिएन्ना ते बुडापेस्ट एकट्याने करतो आहे आणि मी सुद्धा सायकलिस्ट आहे. हा टूर दोन वेळेस मी सुद्धा केला आहे, त्यामुळेच मी तुला माझ्यासोबत येण्यासाठी सांगितले. 30 डॉलर्स चालेल ना? "पंचतारांकित हॉटेल आणि ते ही तीस डॉलर्समध्ये? मला विश्वासच बसत नव्हता. त्याने लगेच त्याच्या सेक्रेटरीला बोलावून मला रूम दाखवण्यासाठी तिला सांगितले. river side view रूम, स्पा, स्विमिंग पूल, फ्री नाश्‍ता एवढ्या सगळ्या गोष्टी तीन डॉलर्समध्ये मिळणार, हे ऐकून मी जाम खुश झालो आणि no pain no gain हे वाक्‍य मला एकदम आठवले. रात्री सगळ्या सोयींचा पुरेपूर लाभ घेऊन मी पुन्हा एकदा आलिशान अशा रूममध्ये झोपी गेलो.

सकाळी चेकआउट करताना रिसेप्शनिस्ट ने hotel director चा मॅसेज सांगितला. hotel director ला मला भेटायचे होते, अर्धा तास वाट पाहिल्यावर तो आला व त्याने मला त्याच्या तीन स्पोर्ट सायकल दाखवल्या व माझ्यासोबत फोटो काढून घेतले. हे सगळं माझ्या सोबत घडत आहे यावर माझा विश्वास च बसत नव्हता. त्याने मला बुडापेस्टपर्यंतचा रस्ता समजावून सांगितला व मी बुडापेस्टकडे निघालो. माझे पुढचे ठिकाण होते, डुनकेसतझी. हे एस्टरेगोम पासून 65 किमी वर होते व तेथून बुडापेस्ट फक्त 10 किमीच होते. अनोख्या डॉनबे नदीच्या निसर्गाचा आस्वाद घेत, मागच्या 4 दिवसात जे घडलं ते सगळं आठवत डुनकेसतझी ला कधी पोहोचलो ते कळेलच नाही. त्यावेळेस दुपारचे चारच वाजले होते. आता बुडापेस्ट जे माझे अंतिम ठिकाण होते ते फक्त 10 किमीवरचा आहे. हे कळल्यावर मी त्याच दिवशी बुडापेस्टला जायचे असे ठरवले. एका तासात मी बुडापेस्टला पोहोचलो. सहा दिवसांचे 334 किमी केलेले नियोजन मी पाचच दिवसात सायकल चा कुठला ही त्रास न होता पूर्ण केले. यावर विश्वासबसत च नव्हता. मागच्या चार दिवसात खेडे गावातले अनोखे सौंदर्य अनुभवल्याने शहरात ल्या उंच इमारती मुळीच आकर्षित करत नव्हत्या. पुन्हा एकदा हॉटेल शोधण्याचा खटाटोप केला आणि आपल्या बजेटमधील हॉटेल शोधून मी खऱ्या अर्थाने समाधानी झाल्यामुळे झोपून गेलो.

आस्तानाच्या परतीच्या विमान प्रवासात ब्रातिस्लाव्हा मधला एक प्रसंग आठवला. ब्रातिस्लाव्हाला दुसऱ्या दिवशी पोहोचल्यावर भारतीय रेस्टारंट जेवण करताना वेटर जो भारतीयच होता त्याच्याशी गप्पा मारल्या. तो म्हणाला, "नक्कीच तुम्हाला कोणीतरी अशी सायकलिंग करायचे पैसे देत असेल, त्याशिवाय का कोणी असले कुटाने कामं धंदे सोडून करता? खरं सांगा किती पैसे मिळतात तुम्हांला याचे?" मी हसलो व त्याला उत्तर दिले, "अशा प्रकारच्या साहसी मोहिमा मी पैशासाठी करत नसतो. तर स्वतःवर विजय मिळवण्यासाठी करत असतो. आणि यात कोणाशीच स्पर्धा नसते, स्पर्धा असेल तर ती निसर्गाशी आणि स्वतः शी. यात हार जीत वगैरे काही नसते. यातून आलेले अनुभव हेच आपलं बक्षीस असतं.' मला वाटले की एक तर माझे बोलणे त्याला कळले नसावे अथवा दुसऱ्या टेबलवरून त्याला ऑर्डर घ्यायची असल्याने एक विचित्र नजरेने माझ्याकडे बघून तो माझ्यासमोरून निघून गेला.