esakal | माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'
sakal

बोलून बातमी शोधा

letter

माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'

sakal_logo
By
अमोल सांगळे, amolsangle2181@gmail.com

सकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु होता. का कुणास ठाऊक पण पु.ल.चा अंतूबर्वा आठवला. पु.ल.चं  लिखाण आणि त्याहून वाचन हे इतकं प्रभावी होतं की त्यांच्या कथेतील पात्रं आयुष्यभर स्मरणात राहायचे त्याची खात्री लगेच पटली कारण मी अंतूबर्वा ऐकून किंवा वाचून १० वर्ष नक्कीच झाले आणि आजही ते मला स्पष्ट आठवत होते. पण हे आठवताना वाटलं की प्रत्येकाच्या आयुष्यात असे एक ना अनेक अंतू बर्वा आलेले असतात. पण फरक एव्हडाच की आपण त्यांना पु.ल.सारखा लिहून ठेवत नाही. मग सहज विचार आला की आपल्याला असा कोणी पात्र लिहून ठेवावं वाटलं तर कोण कोण असेल लिस्टमध्ये ? लिस्टची सुरवात करेपर्यंतच पहिलं नाव समोर आला ते म्हणजे आमचे “दादा”.

लेखाचं शीर्षक वाचून कदाचित मी हे आमच्या मोठ्या भाव बद्दल लिहीत असेल असा वाटणं साहजिक आहे पण, दादा, रामनाथ, दादा, गिरणीवाला, नवीन बाबा, अशा विविध उपाध्या आपल्या खांद्यावर दिमाखात मिरवणारे हे व्यक्तीमत्व म्हणजे आमचे सगळ्यात मोठे चुलते श्री. रामनाथ लहानू सांगळे. अंतूबर्वा इतकेच रंगीत, मिश्किल आणि खोडशाळ आमचा दादा.  

आमचं एकत्रित कुटुंब निफाड तालुक्यातील खानगाव बंधारा आणि आजूबाजूच्या परिसरात नावाजलेलं ते काही खास कारणांसाठी त्यातील एक महत्वाचं म्हणजे, गावातली आमची एकमेव पिठाची गिरण. त्यामुळ लोक आम्हा भावंडाना आमच्या नावापेक्षा जास्त "गिरणीवाल्यांची पोर किंवा कार्टी " असं परिस्थिती आणि संदर्भानुसार म्हणायचे. 

आमची ही गिरण म्हणजे आमच्यासाठी ८०-९० च्या कालखंडातील विकीपेडिया आणि गुगल इतकीच माहितीदायक होती. आणि ह्या संकेत स्थळांचा सर्वे सर्वा होते आमचे "दादा" म्हणायचो आणि कधी कधी रागाने पण "दादाच" म्हणायचो. आमचे हे दादा म्हणजे आमच्या कुटुंबातील एक विशेष गमतीदार व्यक्तीमत्व. मुळात दादांच्या आमच्या भावंडांमध्ये आपापसात भांडण लावणे, मस्करी करणे, घरात चुकून कधी कोणाला रागाने न बोलणे, कोणत्याही गोष्टीला नापसंद न दाखवणे अशा समजूतदार स्वभावामूळ ते आपल्या घरातील सगळ्यात मोठे चुलते आहेत हे समजायला आम्हाला बरेच वर्ष गेले. वयाने मानाने जरी ते घरात मोठे असले तरी जस मला बालपण आठवतंय तेव्हापासून दादा म्हणजे लहानांच्या घोळक्यात खोड्या करून हळूच कोपऱ्यातून मजा बघणारा खोडकर आणि ज्याच्या निष्पाप अविर्भावाने कोणीही त्याच्यावर संशय घेणार नाही असा बिलंदर.

आम्ही लहान असताना गावातील राजकारण, प्रेमप्रकरण,  सरकारच्या न पूर्ण झालेल्या योजना, हवामानाचे अंदाज, शेतपिकांचे भाव अशा आमच्या पंचक्रोशितील एक ना अनेक  "ब्रेकिंग न्यूज" मिळण्याचे दोन खात्रीलायक जागा, एक म्हणजे एस टी स्टॅन्डवरचं म्हसू न्हाव्याचे दुकान अन दुसरआमची पिठाची गिरणी. दोघांमधील फरक एव्हढाच म्हसू न्हावी सकाळी ७ ते सूर्यास्त पर्यंत प्रक्षेपण करायचा आणि संध्याकाळी ५ ते मध्यरात्री आमचा दादा गड राखायचा. गिरणीत येणाऱ्या महिला वर्ग, लहान मुलं, समवयस्क किंवा वयस्कर ह्या सगळ्यांशी गप्पा गोष्टी करत वाटेवर खेळीमेळीचं ठेवण्यात दादा एकदम पारंगत. 

आमची प्राथमिक शाळा गावातच होती त्यामुळं संध्याकाळी शाळा सुटली कि आम्हा भावंडांसाठी शाळेनंतर गिरणीत जाऊन दादाला भेटणं हा रोजचा नित्यक्रम. पण ह्या भेटण्यात एक छुपा हेतू असायचा तो आम्ही गिरणीच्या खिडकीत जाऊन दादाला "दादा" अशी जोरदार आरोळी दिली कि दादाला कळायचा. मग तो हळूच जसा धंदा झाला असेल गल्ला जमलं असेल त्या हिशोबाने कधी ५ पैसे कधी १० पैसे कधी २५ पैसे हातावर टेकवत तर कधी कधी फार आनंदी असेल तर "काय रोज रोज पैसे जा घरी पळा" असा जोरात खेकसत आमची मनधरणी करायचा. मग ते घेऊन कधी "पंडित पोंगे" कधी "खोबरं गोळ्या" कधी "पार्लेजी" चॉकलेट घेऊन आम्ही घरी निघायचो. 

आमचं घर हे गावातील मूळ वस्ती पासून एक ते दीड  किलोमीटर च्या अंतरावर शेतमळ्यात आणि तिथं जाण्या येण्याचा रस्ता हा धरणातून जाणाऱ्या कालव्याच्या बाजूने लावलेल्या आंब्याच्या आणि, शेतजमिनीच्या कडेने असलेल्या खोल चाकोऱ्यांमधून होता. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे रस्त्यात एक मोठ वडाचं डौलदार झाड आहे आणि त्यावर भुतं रात्री मिटिंग घेतात असा समज किंवा गैरसमज गावात सगळ्यांना माहित होता. त्यामुळं आम्ही सगळे भावंडं विज्ञानाच्या सिद्धांतांवर फार विश्वास न ठेवता अंधार पडायच्या आत घर गाठायचो. कारण रात्रीच्या अंधारात ह्या रस्त्याने घरी येणं म्हणजे शौर्याचं काम. आता तुम्ही म्हणाल दादा रोज मध्यरात्री गिरण बंद करून ह्या रस्त्याने यायचा म्हणजे एकदम निधड्या छातीचा शूरवीर असेल. पण गंमत म्हणजे दादा शूर असण्यापेक्षा चाणाक्ष होता. तो मुद्दाम आमच्या घराजवळच्या आलेल्या एखाद्या गिऱ्हाईकाला "जातं  पलटी केलय", "गव्हावर बाजरी नको", "कोथंबीर काय भाव गेली", "यंदा पाऊस काही मनावर घेईना", “कॉंग्रेस येईल बहुतेक परत” अशे अनेक महत्वपूर्ण विषय चघळून त्याच दळण शेवट पर्यंत लांबवायचा आणि जोडीला ठेऊन घायचा.  

आमची आजी दादा येईपर्यंत झोपत नसायची किंवा चुकून डोळा लागला तरी एका हाकेत दरवाजा उघडायची, आजी अशिक्षित होती पण रात्रीच्या अंधारात, काजव्यांच्या किरकिरीवरून, वातावरणातील शांततेवरून ती दादा वेळेत घरी आलाय का उशीर झालाय हे अगदी अचूक ओळखायची. आजोबा -आजीची खोली आमच्या खोलीच्या बाजुलाच होती त्यामूळ दादा आल्यावर आजीच्या आवाजाने मलाही चाहूल लागायची. दादाचा रात्री घरी आल्यावर दिनक्रम अगदी सुनियोजित असायचा. दादा घरी आल्या आल्या पहिल आजीच्या खोलीत जाऊन शर्ट आणि कोपरीच्या खिशातून गिरणीत रोजचे जमलेले नाणी आणि नोटा पुढं ठेवणार, मग दिव्याच्या उजेडात ती दोघ ते अगदी चोख मोजनार, धंदा १०० रु. झालेला असो व १० रु, आमच्या आजीचा ठरलेला डायलॉग होता "आज एव्हढेच?" आणि दादाच त्यावर कधी वैतागून कधी सामंजस्याने उत्तर असायच कि "आज बाजार होता" , "ऊसतोड कामगार रजेवर आहेत" किंवा अजून काही...

मग आजी ती रक्कम तिच्या उशाजवळ असलेल्या एक दणकट लाकडी संदुकात असलेल्या पितळी डब्ब्यात ठेवायची आणि त्याला कुलूप लावून ती चावी तिच्या कमरेला असलेल्या पिशवीत ठेऊन झोपी जायची. नगद  एकदा का आजीच्या बँकेत जमा झाली कि दादाला डोक्यावरून मोठं ओझं खाली ठेवल्यासारखं व्हायचं आणि तो आपल्या जीवनातील अजून एक दिवस सफल झाला ह्या समाधानात खोलीतून बाहेर पडायचा. 

आम्हा भावंडांच्या प्राणी प्रेमळ स्वभावामुळे आमच्या अंगणात रोज ३-४ कुत्रे रात्री झोपायला नसतील तर नवल आणि हीच गोष्ट दादाला खूप खटकायची, त्यामुळं आजीच्या खोलीतून बाहेर आला कि दादा आपल्या आयुष्याचा निवांत आनंद घेत झोपलेल्या सगळ्या कुत्र्यांना  इर्षेने आणि रागाने एकदा जोरदार "हाड हाड काय दिमाखात झोपलेत इथं .. सगळी पिल्लावळ करून ठेवलीय... कोणी आणले हे कुत्रे " असा ओरडून हातात मिळेल ते लाकूड दगड घेऊन त्यांच्यावर फेकून दिवसभराचा थकवा काढायचा आणि लिस्ट वरच अजून एक काम पूर्ण करायचा. आणि झोपलेल्या कुत्र्यांपैकी बरेच जण "यार आला हा परत झोप मोडायला" असा अविर्भाव चेहऱ्यावर आणून दादाच्या खोट्या रागाला अजिबात ना जुमानता तिथेच पडून राहायचे.  

दादा मग त्याच्या खोलित जाऊन कपडे बदलून अंगणातील हौदावरून हातपाय तोंड धुवायचा. आलोम विलोम, भस्रिका हे असले नावं तुम्ही २०व्या शतकात रामदेव बाबांसारख्या अनेक योग गुरूंकडून ऐकले किंवा बघितले असाल पण हे सगळं आम्हाला दादाने १९ व्य शतकात अनुभवायला दिला होत. दादा हातपाय तोंड धुताना इतके काही चित्र विचार आवाज काढायचा कि ते म्हणजे रात्रीच्या भयाण शांततेत आमच्या शेतमाळ्यातील आजूबाजूच्या १ किलोमीटरच्या परिसरातील घरांना "मी घरी आलो बर,,," हे सागणंच असायचा. मग जवळच तिथेच अंगणात असलेल्या मोठ्या रांजनातून एक तांब्या भरून पिण्याचे पाणी घेऊन ते शांततेत पिऊन दादा त्याच्या खोलीत "बाईने" (म्हणजे आमची मोठी चुलती) जेवण वाढून ठेवलेलं असायचं ते एकटाच बसून जेवायचा. ते झालं कि जेवणाचं ताट आणि त्यातलं खरकटं घेऊन अंगणात "यु यु " करत ज्या कुत्र्यांना थोड्या वेळापूर्वी हाकललं होत त्यांना बोलवायचा. 

मग ताट धुऊन टाकून ते कुठं तरी सोयीने ठेऊन ५-७ मिनटात दादाची आमच्या खोलीच्या दरवाजावर थाप पडायची. "झोपला रे ?" अशी आज्ञा वजा विनंती आमच्या पप्पांना करायचा. मग कितीही झोपेत असले तरी "नाही आत्ताच पडलो होतो" असा उत्तर देऊन जणू  पप्पा दादाच्या हाकेच्या वाटच पाहत होते असा वाटायचं.  मग पप्पा दार उघडून लाईट लाव्हायचे आणि दादा नेहमीच अगदी नेहमीचं कारण सांगायचं काही नाही "चुना पुडी पाहिजे होती". मग दादा आणि कधी तलप  आली तर आमचे पप्पापण गायछापची पुड मळायचे. आणि हे सगळं करताना दादाने गावात घडलेली एखादी "ब्रेकिंग न्यूज" सांगितली नाही तर नवलंच आणि दादा घरात आलाय आणि माझी झोपमोड झाली नाही ते अजून नवल.  दादा एव्हड्या रात्री येऊन झोप मोडतो, आवाज करतो वगैरे फालतू कारणांमुळं कधी दादाचा राग येत नव्हता पण दादा गावातील खबरी सांगताना जे मोठे मोठे "प्वाज" घायचा ना ते म्हणजे श्रीराम लागूंना लाजवणारे होते. 

दादा गोष्टीची सुरूवात साधारण अशी करायचा.. 

"कारभारी पाटलाच्या पोराला बडवल चांगलच"... 
अशी सुरुवात ऐकून माझे कां भर झोपेत पण ऐकायला तयार व्हायचे पण मग हा कारभारी पाटील कोण? त्याच्या मुलाला का बडवल ? कोणी बडवल? अशे अनेक कायदेशीर प्रश्न गोधडीच्या गर्मीत माझ्या डोक्यात यायचे. मग दादा पुढं सांगेल आताच सांगेल असा वाटायचं पण घरात एकदम शांतता... कारण दादाने चर्चेचं शीर्षक सांगून खोलीच्या बाहेर डोकावत जणू विषय फार गंभीर आहे आणि बाहेर कोणी ऐकताय का हे बघण्याचा अविर्भाव आणलेला असायचा. 

मग आमचे पप्पाहि त्यांची सहनशक्ती संपवून "काय रे, कोणी मारलं ते तर सांग" असा बोलून दादा कुठे गेला ते तपासायचे. 
दादा : आलो आलो हे बाहेर कुत्रे हुसकट होतो.  (मग दादा पुन्हा घरात येऊन )
दादा: (मूळ प्रश्नाला कलाटणी देऊन, रहस्य अजून वाढवत ) मारला म्हणजे चांगलाच मारलाय, वाचला तो आज. 
पप्पा: काय झालं ?
दादा: (पुन्हा तंबाखू थुंकण्याचं कारण करत खोलीच्या बाहेर आणि घरात पुन्हा शांतता .....)

ह्या वेळेस पप्पा मात्र कुठचीही प्रतिक्रिया ना देता शांत वाट पाहत... मग दादा पुन्हा खोलीत येऊन. 

दादा: झोपला रे ?
पप्पा: नाही बोल ना. 
दादा : हा गेला होता तिथं मग झाला असा मग तसं ... पण तसं  

असा सुंदर पण लांबलचक कथापट मांडत मांडत समालोचन करत असताना मधेच आमची आईची झोप मोडायची आणि आणि वैतागून आमच्या पप्पांना "अहो किती वाजलेत, तुम्हाला दोघांना सकाळ झालीय का ती लाईट बंद करा आधी आणि बाहेर जाऊन बडबड करत बसा बरं " दणकून सांगायची. आणि हि पप्पांना मिळालेली सूचना वजा आज्ञा दादा क्षणात ओळखून खोलीतून काढता पाय घेत "झोप सकाळी बोलू" म्हणत झोपायला जायचा.  मग अर्थात उशिरा झोपला म्हणून सकाळी आरामशीर सूर्य उगवुन ३-४ तास गेल्यावर आमच्या दादाची सकाळ व्हायची... अन मग सुरु व्हायचा नवा दिवस नवा डाव... 

भारतात आल्यावर गावी जाऊन सगळ्यांना भेटणं , आमच्या गावच्या ज्या घरात आई पपांच्या हातचा मार खाल्ला आणि त्याहून जास्त प्रेम पोटात घेऊन मोठा झालो तिथं जाणं , ज्या अंगणात आंबे, चिंचा, बोरांच्या वाटणीवरून भावंडांशी भांडलो  त्या अंगणात ५ मिनिटं  का होईना शांत बसून त्या मातीचा वास घेत अंगणात स्वतःला ३०-३५ वर्ष पूर्वीच्या आठवणीत घेऊन जाणं हे एक नेहमी करतो. वर्षामागून वर्ष गेलीत  घरात नाही पण घरातील नात्यांमध्ये बरेच बदल झालेत... आजी आजोबा जाऊन काही वर्ष झाले, आत्या गेली.. शिक्षण, नोकरी साठी भावंडं बाहेर पडली. आमचं घर अजूनही तिथं आमच्या सगळ्यांच्या स्वागतासाठी आणि पाहुणचारासाठी खंबीर उभं आहे पण आता तेही आता थकल्यासारख वाटतंय जणू रस्त्यावर डोळे लावून बघत असत कधी येतील वासरं माघारी.... 

मागच्या जून जुलै मध्ये भारतात आलो तेव्हा सगळ्यांना भेटलो, दादालाही भेटलो. दादा आहे तसाच आहे. ना रुबाब ना अहंकार पण दादाच वय आता दिसायला लागलं पण तो अजूनही संध्याकाळी गिरणीवर जातो,आता पैसे कमवण्यापेक्षा विरंगुळा म्हणून असेल कदाचित. आमची आजी जाऊन ५ वर्ष झाली,  आईपप्पा मोठ्याभावा बरोबर मुंबईला राहत असतात. दादा कदाचित त्याच्या संध्याकाळचं  आजीला पैसे नेऊन देणं आमच्या पप्पांबरोबर गप्पा - गोष्टी नक्कीच मिस असेल. पण पप्पा गावी आले कि पुन्हा दादा आणि पप्पांची जोडगोळी आणि गप्पा ऐकायला मिळतात. पाहून छान वाटतं.  मी दादाला भेटायला गेलो तेव्हा आमच्या मळ्यातील दादाच्या समवयस्क वय आणि आजारपणामुळे गेली काही महिनेअंथरुणाला खिळून होते, दादा संध्याकाळी त्यांच्या बद्दल मला सांगत होता. आणि बोलता बोलता वयाचा अंदाज घेत म्हणत होता "तो आणि मी बरोबरीचाच, सगळ्यांचीच वय झालीत आला दिवस आपला समजायचा..."  हे वाक्य दादाच्या तोंडून ऐकणं तस मनाला चिमटा घेणारा होतं पण तितकंच सत्यात नेणारं. 

आपण सगळे शिक्षण, करियर, संसार, मुलं  ह्या सगळ्या गुंतागुंतीत इतकं मग्न होऊन जातो कि आपली मागची पिढी जिणं आपल्याला आपल्या जडण घडणीत मोलाची साथ दिलेली असते हे क्षणभर दुर्लक्षित झालेलं असतं. पैसे, जमीन हे इतकं महत्वाचं होऊन बसतं कि नाती दुय्यम वाटायला लागतात.  मग दुरावा अबोला सुरु होतो, बघा कधी ह्या सगळ्यांच्या पलीकडं जाऊन जुन्या पिढीबरोबर सुखाचे क्षण घालवता येतात का ? त्यांना पैसे, प्रॉपर्टी ह्याही पेक्षा जास्त अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांच्या जाणिवेची. जाणीव त्यांनी केलेल्या कष्टांची, त्यागाची आणि आपल्याला उभा राहण्यासाठी दिलेल्या आशीर्वादाची.

दादा म्हणजे आमच्या घरातील न चिडणार ना रुसणार ना हट्ट करणार एक वयाने मोठं पण मनाने कधीच नं  मोठं झालेलं बाळ. दादा, तुला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! तब्येतीची काळजी घे !