पाकिस्तानमध्ये सत्तावाटपाच्या नव्या समीकरणाचा उदय

The emergence of a new equation of power in Pakistan
The emergence of a new equation of power in Pakistan

ध्या पाकिस्तान एका गंभीर अशा आर्थिक उलथापालथीमधून जात आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाच्या सरकारपुढे महसूलाच्या अपुर्‍या वसूलीमुळे, प्रचंड वित्तीय तुटीमुळे, निर्यातीमधील नगण्य वृद्धीमुळे व दोन-आकडी महागाईमुळे अनेक आर्थिक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. याचाच अर्थ असा कीं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानची घडी सुधारण्याचे भयप्रद काम सुसूत्रपणे संपविणे आवश्यक झाले आहे. अन्यथा पाकिस्तानला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांकडे किंवा त्याच्या मित्रराष्ट्रांपुढे हात पसरावे लागतील.

४५ कोटी डॉलर्सचा तिसरा हप्ता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला लवकरच मिळणार आहे आणि याचा अर्थ करांचा बोजा वाढणार, वीज-पाणी यांसारख्या सेवांचे बिल वाढणार व रोजच्या गरजेच्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किमतीही वाढणार! अर्थव्यवस्थेला जोशात ठेवणे दिवसेंदिवस कठीण जात असल्याची, ही परिस्थिती म्हणजे गलबताला पडलेले भोक आहे याची व त्याचे गंभीर परिणाम कांहीं महिन्यातच सोसावे लागणार आहेत याची जाणीव ’तेहरीक-ए-इन्साफ पाकिस्तान’ (PTI) पक्षाला सत्तेवर आणणार्‍या लष्करशहांनासुद्धा होऊ लागली आहे.

हळूहळू घसरू लागलेल्या अर्थव्यवस्थेमुळे जनतेच्या मनातील वाढते वैफल्य हे या सरकारला समर्थन देऊन त्या सरकारला सत्तेवर आणण्याच्या लष्करशहांच्या निर्णयाचा त्यांनी पुनर्विचार करायला लावण्यासाठी पुरेसे कारण आहे. पण हे पाऊल टाकण्यात एक अडचण आहे. ती म्हणजे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे मुस्लिम लीग (नवाज) (PML-N) या आपल्या पक्षाची पाकिस्तान मुस्लिम लीग (कायदेआझम) या पक्षाबरोबर युती करायला तयार नाहींत आणि हे PML-N व इतर लष्करशहांमध्ये मतैक्य घडवले असूनही! इतकेच नव्हे तर पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP), जमीयत उलेमा-ए-इस्लाम फझल (JUIF) किंवा PTI मधून फुटून बाहेर पडलेला गट यासारख्या प्रमुख विरोधी पक्षांबरोबरही युती करावयास ते तयार आहेत.

शरीफ आपला पंजाब प्रांत पंजाब विधानसभेच्या सभापतीपदावर असलेल्या चौधरी परवेझ इलाही यांना सुपूर्द करावयास तर तयार नाहींतच पण त्यांच्याबरोबर राज्य पातळीवर तसेच केंद्र पातळीवरही युती करायलासुद्धा तयार नाहींत. याचे कारण आहे कीं इलाही हे एक ’महाचालू’ राजकारणी असून तो नेहमीच लष्करशहांवर अवलंबून असतात व त्यामुळे ते लष्करशहांच्या इशार्‍याबरहुकूम नवाज शरीफना कधीही डच्चू देऊ शकतात. म्हणूनच इलाहींनी PTI सरकारबरोबर सध्यापुरती तरी मैत्री प्रस्थापित केली आहे. कारण शरीफ आपल्याला राजकारणात कसलीच चांगली संधी देणार नाहींत किंवा आपल्याला भविष्यकाळातील राजकीय समीकरणात कधीच कुठलेही महत्वाचे मंत्रीपदही देणार नाहींत याची त्यांना खात्री आहे.

सध्या आजारी असलेले शरीफ हे देशाबाहेर उपचार करून घेत असले तरी ते परदेशातून बरेच निर्णय घेत आहेत व अद्यापही पाकिस्तानच्या राजकारणात खूप सक्रीय आहेत. त्यांनी अलीकडेच आपल्या PML-N या पक्षाच्या लंडनस्थित सभासदांच्या बैठकीचे अध्यक्षपदही भूषविले होते. ही बैठक पाकिस्तानचे लष्करप्रमुख ज. कमर जावेद बाजवा यांना मुदतवाढ देण्याच्या समर्थनार्थ योजण्यात आलेली होती. ते अलीकडे त्यांच्या पक्षाच्या सर्वसाधारण बैठाकांना हजर राहात नाहींत, पण प्रकृतीअस्वास्थ्य हे त्याचे कारण नसून आपल्या भावी चालींचा सुगावा कुणाला लागू नये हे त्याचे मुख्य कारण आहे. तसेच ते आपल्या आंतरराष्ट्रीय मित्रपरिवाराबरोबर व पाकिस्तानी ’व्यवस्थापना’बरोबर (म्हणजेच लष्कराबरोबर) कायम संपर्कात राहाण्याच्या प्रयत्नात असतात हेसुद्धा त्याचे आणखी एक कारण आहे.

जर PML-N पक्षातच अंतर्गत बदल घडून आले तर पाकिस्तानमधील पुढील सरकारचे नेतृत्व करणार्‍यांमध्ये त्याचे माजी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी हे सध्या सर्वात बलवान उमेदवार आहेत. पण यातही एक समस्या आहेच आणि ती आहे कीं शरीफ यांना ताबडतोब सार्वत्रिक निवडणुका हव्या आहेत. कारण जर सध्याच्या केंद्रीय सभेत (आपल्या लोकसभेचा पाकिस्तानी अवतार) जर मध्यावधी निवडणुकांशिवाय सरकार बदलले तर त्या घटनेचा आपल्या खास ’मतदारपेढी’वर (vote bank) दुष्परिणाम तर होईलच पण अशा सरकारला राज्य करण्याचा नैतिक अधिकारही असणार नाहीं![१]

आणि म्हणूनच पाकिस्तानमधील राजकीय ’अदृश्य शक्ती’बरोबर झुंज घ्यायला शरीफ पुन्हा एकदा आखाड्यात उतरले आहेत. याच बरोबर त्यांची सुकन्या मर्यम नवाज हिचे राजकीय भविष्य घडविण्याचा उद्देशही त्यांच्या मनात आहेच. कारण त्यांना आपल्या कन्येने ताबडतोब निवडणुकीच्या राजकारणात भाग घ्यावा असे वाटते व त्यासाठी या ’अदृश्य शक्ती’ने तिच्याविरुद्धचे सर्व खटले मागे घ्यावेत अशी मागणी शरीफ करत आहेत.

शरीफ यांनी मर्यमला आतापुरते तरी अजीबात न बोलण्याचा, तोंड न उघडण्याचा उपदेश दिलेला आहे. कारण ते सध्या तिच्यासाठी राजकारणात एक स्थान बनवू इच्छित आहेत व हे होईपर्यंत तिने कुठलेही वक्तव्य करू नये असे त्यांचे मत आहे. या उलट लष्करशहांना त्यांच्या व नवाज यांच्यामधील करारात मर्यम अडचण आणत आहे असे वाटते. आणि नवाज यांनी कितीही खात्री दिलेली असली तरी मर्यम एकदा या खटल्यांतून निर्दोष सुटली तर ती तिचा आपल्याविरुद्धचा आक्रमक राजकीय विरोध सोडून देईल अशी खात्री लष्करशहांना वाटत नाहीं. त्यामुळे शरीफ व लष्करशहांच्यामधील करार लटकतच राहिला आहे.

हे सुरू असतानाच सामान्य जनतेला भाववाढ, बेरोजगारी व नव्या करांच्या भारामुळे अतोनात कष्ट उचलावे लागत आहेत. कदाचित् यामुळेच शरीफ सध्या त्यांच्याकडे असलेल्या पर्यायांचे मूल्यमापन करत आहेत. कुठलेही पाऊल उचलावयाचे असेल तर त्याला अमेरिका व सौदी अरेबिया यांच्याकडून समर्थन मिळवावे लागेल याची जाणीव तर शरीफना आहेच पण ते चीनलाही दूर ठेवत नाहींत. कारण त्यांच्या विनाविलंब निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे व ’चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गा’सारख्या प्रकल्पांना मार्गावर लावण्याच्या त्यांच्या या क्षमतेमुळे ते चीनमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. त्यांना एकाच गोष्टीची काळजी आहे आणि ती म्हणजे सौदी अरेबियामध्ये त्यांची लोकप्रियता उतरणीस लागली आहे. याची कारणे आहेत ते सत्तेवर असतांना त्यांनी घेतलेल्या सौदीविरोधी निर्णयांमुळे! ते निर्णय होते येमेनबरोबर सौदी अरेबियाच्या बाजूने लढण्यासाठी पाकिस्तानी सैन्य पाठविण्यास त्यांनी दिलेला नकार व सौदी अरेबियाच्या प्रभावापासून त्यांनी केलेली पाकिस्तानची सुटका!

या उलट इम्रान खान तर केवळ स्वत:ला राजकीय पटावर कसेबसे सक्रीय ठेवण्यात मग्न आहेत. त्यांच्याच पक्षात पंजाब प्रांतात झालेली दुफळी  त्यांना दिसत नाही किंवा या परिस्थितीत शरीफ यांच्यासारख्या धूर्त नेत्याला या दुफळीचा फायदा घ्यायला आणि PTI पक्षातून फुटून वेगळ्या झालेल्या राज्य पातळीवरील व केंद्र पातळीवरील गटाबरोबर युती करायला लष्करशहांच्या समर्थनाशिवायही कांही दिवसांचाच अवधी पुरे होईल हेही त्यांना दिसत नाहीं.

आतल्या गोटातून आलेल्या माहितीनुसार लष्करशहांनाही PTI पासून मुक्ती हवी आहे पण त्याच वेळी त्यांना PML-N लाही पूर्ण मोकळीक द्यावयाची नाहींय्. दुसर्‍या बाजूला शरीफ लंडनमधील आपल्या वास्तव्याचा उपयोग करून आपल्या प्रभावी आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधांचा आणि मित्रराष्ट्रांचा मुक्तहस्ताने वापर करून त्यांच्यातर्फे लष्करशहांवर त्याच्या मागण्यांना होकार देण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

या परिस्थितीत लष्करशहांना वेळ वाया जाऊ न देता त्यांना सगळ्यात फायदेशीर करार तातडीने कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. कारण त्यांना माहीत आहे कीं वेळ जाऊ दिल्यास शरीफ आपल्या वैयक्तिक राजकीय संबंधांचा वापर करून त्यांना चांगलाच शह देऊ शकेल. एका बाजूला सध्याच्या राजकीय समीकरणांना बदलून घेतल्यानंतरच नवीन सार्वत्रिक निवडणुकींना संमती देणे ही लष्करशहांची इच्छा आहे, तर दुसर्‍या बाजूला शरीफ यांना केवळ नव्या निवडणुकाच हव्या आहेत असे नव्हे तर मर्यमवरील सर्व आरोप मागे घेतले जावेत व तिला ’क्लीन चिट’ दिली जावी अशीही  त्यांची इच्छा आहे व त्या बाजूनेसुद्धा त्यांचे प्रयत्न चालू आहेत.

इम्रान खान यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांना आता आपल्या पदच्युतीला सामोरे जावे लागणार आहे याची कल्पना आहे कारण कांहीं काळापूर्वी शरीफनासुद्धा पदच्युतीला सामोरे जावे लागलेच होते. कांहीं महिन्यांनंतर इम्रान यांनासुद्धा “जनतेने कौल दिलेलाच आहे व मी जनतेचा कौल शिरोधार्य मानतो” अशी विधाने देण्याची वेळ येणार आहेच आणि हे माहीत असल्यामुळे शरीफ यांनी चातुर्याने मर्यमला सध्यापुरते तरी या परिस्थितीच्या बाहेर ठेवले आहे म्हणजे जेंव्हां कांहीं महिन्यांनंतर इम्रान यांच्या ’मुलकी सरकारच कसे सर्वश्रेष्ठ’ या पोपटपंचीला उत्तर म्हणून त्यांना मर्यमला निवडण्कीच्या रिंगणात मोकळे सोडून देता येईल.

कसेही पाहिले तरी सत्तेच्या बुद्धिबळपटावर एका बाजूला शरीफ तर दुसर्‍या बाजूला लष्करशहांच्या अदृष्य शक्ती यांच्यामध्ये सत्तावाटपाबाबत होणार्‍या आणखी एका लढतीची सुरुवात होऊ लागली आहे कारण जो आपले डोके शांत ठेवून जास्तीत जास्त वेळ संधीसाठी दबा धरून बसू शकेल त्यालाच जे हवं ते मिळेल व त्याच्या सर्व अटी मान्य केल्या जातील हे नक्की. मग आपले पाठीराखे आपल्याविरुद्ध शरीफसाहेबांच्याशी काय काय करार करतील याकडे इम्रान खान हताशपणे पाहात बसतील. कांहीं महिन्यांसाठी आपण जी सत्ता उपभोगली ती अशा लोकशाहीविरुद्ध असलेल्या लष्करशहांशी संगनमत करण्याच्या लायकीची तरी होती काय हा विचारसुद्धा त्यांच्या मनात येऊन जाईल!

या क्षणी तरी शरीफ आणि लष्करशहा यांच्यामध्ये सत्तावाटपाच्या भविष्यकाळातील समीकरणाबाबत एक कोंडी निर्माण झाली आहे, पण ती  कांहीं फार काळ टिकणार नाहीं आणि कांहीं महिन्यातच इम्रान खान यांचे हे सत्तेचे गलबत बुडून जाईल यात शंका नाहीं.

मूळ लेखक इमाद जाफर हे वृत्तपत्रांत लिखाण करणारे स्तंभलेखक असून ते अनेक दूरचित्रवाणी-नभोवाणी वाहिन्या, वृत्तपत्रें, वृत्तवितरणसंस्था आणि राजकारण, धोरण आणि प्रसारमाध्यमांशी निगडित असलेल्या विचारमंचाशी संलग्न आहेत.

टीप:१] शरीफ आणि लष्करशहा यांच्यात बोलणी चालू आहेत पण शरीफ सध्याच्याच ’केंद्रीय सभागृहा’त अंतर्गत बदल घडवून आणून नवे सरकार प्रस्थापित करण्यास अनुकूल नाहींत. लष्करशहांनी राजकारणात ढवळाढवळ करणे ताबडतोब थांबवावे व नव्याने निवडणुका घ्याव्यात अशी त्यांची मागणी आहे (On my request for elaboration, author Imad Jafar adds “They (Nawaz & the Establishment) have been involved in talks but till now Sharif not agreeing to inhouse change he want Establishment to stop interfering in politics and conduct new elections.”
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com