अबुधाबीत उलगडले मराठी साहित्यातील पैलू  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

abudhabi.jpg

पुणे : मराठीतील दिग्गज साहित्यिकांची ओळख करून देत अबुधाबीमध्ये मराठी साहित्यातील विविध पैलू उलगडण्यात आले. निमित्त होते संयुक्त अरब अमिरातीची राजधानी असणाऱ्या अबुधाबीमध्ये भरविण्यात आलेल्या "अबुधाबी इंटरनॅशनल बुक फेअर'चे. या पुस्तक मेळाव्याच्या यजमानपदाचा मान संयुक्त अरब अमिरातीने यंदा भारताला दिला आहे. यानिमित्त देशातील साहित्यिकांची ओळख विविध कार्यक्रमांद्वारे करून देण्यात आली. 

अबुधाबीत उलगडले मराठी साहित्यातील पैलू 

संयुक्त अरब अमिराती या देशाने हे वर्ष "टॉलरन्स ईअर' म्हणून पाळायचे ठरविले आहे. साधारणत: एक कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशात दोनशेहून अधिक देशांचे नागरिक राहतात. या पुस्तक मेळाव्याच्या निमित्ताने भारत आणि अमिरातीमधील दृढ संबंध अधोरेखित झाले. मेळाव्यात विविध देशांतील नामवंत लेखक, साहित्यिकांना वाचकांसमवेत संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. भारताच्या "राष्ट्रीय पुस्तक न्यास'नेदेखील देशातील लेखक आणि वाचकांची भेट घडवून आणली. 

यानिमित्त विविध भारतीय भाषांमधील साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित करून स्थानिक कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्यात आली. याचाच एक भाग म्हणून मराठीतील नामवंत लेखक, साहित्यिक, कवी यांच्यावर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला. 

"ज्ञानपीठ' पुरस्काराने सन्मानित मराठी साहित्यिकांची ओळख विशाखा पंडित यांनी करून दिली. डॉ. पल्लवी बारटक्के यांनी संचालित केलेल्या मराठी कवी आणि त्यावर बालकलाकारांनी सादर केलेली नृत्य-गाणी वाखाणण्याजोगी होती. पावनी बारटक्के आणि अनन्या कुमठेकर यांनी बालगीतांवर नृत्य सादर केले. श्रेयस वाघमारे, शर्वील खटावकर, वेद गुप्ते, अर्चित शेपुंडे यांनी समूहगायन केले. तर डॉ. प्रसाद बारटक्के, देवेंद्र भागवत, विजया सोनवणे, शीतल अंबुरे यांनी कविता सादर केल्या. प्रशांत कुलकर्णी यांनी कोकणी भाषेतील साहित्यिकांचा परिचय करून दिला, तर रूपाली कीर्तनी यांनी कोकणी भाषेतील गोडव्याचे कवितेतून दर्शन घडविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रचिती गांधी तलाठी यांनी केले.