esakal | हिसा (HISA): भारतीय विद्यार्थ्यांचा जर्मनीतील एक दुवा
sakal

बोलून बातमी शोधा

germany: rohit pawar write hisa article

हिसाचे सदस्य केवळ भारतीय विद्यार्थी अथवा भारतीय नागरिक राहिले नसून, विविध देशांमधील नागरिक आणि विद्यार्थी या संस्थेचे सदस्य आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये ते उत्स्फूर्त सहभाग घेतात.

हिसा (HISA): भारतीय विद्यार्थ्यांचा जर्मनीतील एक दुवा

sakal_logo
By
रोहित पवार (हायडेलबेर्ग, जर्मनी)

हायडेलबेर्ग… विद्यापीठांचे शहर. विचारवंतांचे... पाहताक्षणी प्रेमात पडावे असे शहर. अतिशय नयनरम्य डोंगररांगांनी वेढलेले. नागमोडी वळण घेत जाणारी नदी, त्यावरील जुना पूल, लाल रंगांची उतरत्या छपरांची घरे, प्राचीन किल्ला आणि नदीतून होणारी जलवाहतूक. नदीकिनारी असलेल्या बागा.. जणू काही एखाद्या चित्रकाराने आपल्या कुंचल्याच्या आणि रंगांच्या छटांची उधळण करीत काढलेली चित्रकलेची सुरेख अप्रतिम कलाकृती.

फ्रँकफुर्ट पासून साधारण 80 कि. मी. दक्षिण आणि जर्मनीच्या नैऋत्य दिशेला वसलेले हे शहर. या शहराची अजून एक खासियत म्हणजे जगप्रसिद्ध हायडेलबेर्ग विद्यापीठ. हायडेलबेर्ग विद्यापीठ हि एक नावाजलेली आणि प्राचीन संस्था आहे. इसवी सन 1383 मध्ये स्थापन झालेली जर्मनी मधील सर्वात जुनी संस्था म्हणून नावलौकिक आहे. युरोप खंडातील नामांकित विद्यापीठांमध्ये समाविष्ट आहे. विद्यापीठामध्ये साधारण 30,000 पेक्षा जास्त विद्यार्थी विविध शाखांमध्ये उच्चशिक्षण घेत असून, संपुर्ण जगभरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे. भारतामधून उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे.
 
'हिसा' अर्थात हायडेलबेर्ग इंडियन स्टुडंट्स असोसिएशन... (HISA)
हायडेलबेर्गमध्ये स्थापन झालेली 'हिसा' हि एक स्वयंसेवी संस्था असून, संपुर्णतः विना अनुदानित आहे. भारतीय नागरिकांना मुख्यत्वे भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याच्या हेतूने या संस्थेची स्थापना इसवी सन 2003 मध्ये करण्यात आली. 'हिसा' बर्लिन स्थित भारतीय दूतावासाच्या अंतर्गत स्थापित इंडियन स्टुडंट्स इन जर्मनीशी (ISG)संलग्न आहे. हि संस्था संपुर्ण जर्मनीमध्ये असणाऱ्या इतर भारतीय विद्यार्थी संघटनांशी देखील संलग्न आहे. सन 2001 नंतर, उच्च शिक्षणाकरीता भारतीय विद्यार्थ्यांचे जर्मनीमध्ये येण्याचे प्रमाण वाढू लागले होते. प्रत्येक भारतीय विद्यार्थी एकमेकांबाबत अनभिद्य होते. नवीन देशात भिन्न संस्कृती अन् भिन्न भाषा असल्यामुळे दैनंदिन कामकाजात अडचण येत होती. त्यात सणासुदीला मायदेशी परतता येत नसल्याची खंतही मनात होती. त्यातूनच काही भारतीय विद्यार्थी एकत्र आले आणि परदेशातही भारतीय सण साजरे करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. दरवर्षी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती आणि त्यातून बरेच देशी-विदेशी नागरिक या संस्थेशी जोडले गेले. 'हिसा' आता चांगले बाळसे धरू लागली होती.
 
सध्या भारताच्या विविध राज्यांमधुन अनेक विद्यार्थी हायडेलबेर्गमध्ये उच्च शिक्षणासाठी येत आहेत. तसेच शेजारी मोठी उद्योगनगरी असल्याकारणाने बरेच भारतीय नागरिक हायडेलबर्गमध्ये कामानिमित्त येत आहेत व स्थायिक होत आहेत. विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये काही अडचण येऊ नये या करीता 'हिसा' प्रयत्न करीत आहे. जर्मनीमध्ये आल्यानंतरची नोंदणी प्रक्रिया, निवास व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक, आपत्कालीन सुविधा, आरोग्य विमा इत्यादी विषयांबाबत मार्गदर्शन करणे हे देखील कार्य 'हिसा' करते. भारतीय नागरिकांना एकत्र आणणे आणि परदेशी नागरिकांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, ह्या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे. ज्या विद्यार्थ्यांना मायदेशात परतून समाजासाठी काहीतरी योगदान द्यावयाचे आहे, अशा विद्यार्थ्यांना 'सिम' अर्थात 'सेंटर फॉर इंटरनॅशनल मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट' (CIM) हि स्वयंसेवी संस्था मार्गदर्शन करते आहे आणि 'हिसा' अशाप्रकारचे विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात मदत करते आहे. 'हिसा'ने आतापर्यंत विविध प्रकारचे सण, उत्सव व कार्यक्रम पार पाडले आहे. उदाहरणार्थ स्वातंत्र्य दिन, होळी, क्रीडा दिन, गरबा-नवरात्री, दिवाळी व सांस्कृतिक कार्यक्रम असे मनोरंजनाचे तर स्टार्टअप बिसनेस आयडियाज सेमिनार, जॉब हंटिंग सेमिनार असे वैयक्तिक विकासाचे कार्यक्रम पार पाडलेले आहेत.
 
डोईचेस क्रेब फोरशुंग झेंटरूम (DKFZ), युरोपिअन मोलेक्युलर बायॉलॉजि लॅब्रोटोरी (EMBL), हायडेलबर्ग युनिव्हर्सिटी, मॅक्स प्लांक इन्स्टिट्युट (MPI), एस आर एच युनिव्हर्सिटी (SRH) या संस्थांचे विद्यार्थी तर SAP, BASF, IBM, Accenture, Heidelberg Cement, IHI इत्यादी नामांकित कंपन्यांचे सदस्य या संस्थेचे भाग आहेत. हिसाचे सदस्य केवळ भारतीय विद्यार्थी अथवा भारतीय नागरिक राहिले नसून, विविध देशांमधील नागरिक आणि विद्यार्थी या संस्थेचे सदस्य आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये ते उत्स्फूर्त सहभाग घेतात. 'हिसा'चे काही पूर्व सदस्य आज केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, येल, लक्समबर्ग सारख्या परदेशातील युनिव्हर्सिटी तर काही इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER, पुणे) मध्ये दाखल झाले आहेत. हे सदस्य जगाच्या विविध कानाकोपऱ्यात राहून 'हिसा' च्या संपर्कात राहतात. काही जण कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवतात. सध्या 500 पेक्षा जास्त नागरिक 'हिसा'चे सदस्य आहेत तर अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सल्लागार आणि सांस्कृतिक सचिव असे 'हिसा' च्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.
 
भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी हायडेलबर्ग मध्ये यायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न 'हिसा' नक्कीच करेल.
अधिक माहितीसाठी 'हिसा' चे फेसबुक पेज लाईक करा अथवा ई-मेल करा-
E-mail:  hisa.heidelberg@gmail.com
Facebook: https://facebook.com/hisaheidelberghisa
Website : http://hisaheidelberg.com/