esakal | होळी रे होळी , पुरणाची पोळी
sakal

बोलून बातमी शोधा

holi celebration at boston

होळी रे होळी , पुरणाची पोळी

sakal_logo
By
विद्या भुतकर.

होळीच्या दिवशी सकाळ-सकाळी माझ्या पाच वर्षाच्या मुलाने मला विचारले, "आई, आज होळी आहे तर मग आम्ही कधी खेळणार?"आम्ही अमेरिकेतल्या बॉस्टन जवळील एका शहरात राहतो. सध्या थंडी असल्याने बाहेर रंग किंवा पाणी काहीच खेळणे शक्‍य नव्हते. मी त्याला काय सांगणार पण? म्हटले,"अरे महाराष्ट्रात होळीला रंग नाही खेळात, होळी पेटवतात आणि पुरणपोळी करतात.''पुरणपोळी म्हटल्यावर तो एकदम खुश झाला. त्याचा तो आनंद पाहून पुरणपोळीचा बेत नक्की झाला होता. मी कामाला लागले.
आमच्या शहरात भारतीयांची संख्या तशी बऱ्यापैकी आहे. दुपारी आमचे मित्र, दिपक आणि नेत्राली दळवी यांच्याकडे होळी करण्याचे निश्‍चित झाले.त्यांनीही सर्व दिवसभराचे तापमान पाहून दुपारी चार वाजताचा बेत ठरला. त्याप्रमाणे आम्ही दुपारचे जेवण उरकून, होळीचा बाजूला ठेवलेला नैवेद्य घेऊन त्यांच्याकडे गेलो. पहिले तर एकदम जय्यत तयारी झाली होती. साधारण आठ कुटुंब एकत्र जमले होते. दारात फायर-पिट म्हणजे एका धातूच्या पात्रामध्ये लाकडे लावून ठेवलेली. रस्त्यावर किंवा जमिनीवर होळी पेटवून ती आग पसरू नये म्हणून ही खबरदारी. आजूबाजूला मोठमोठी झाडे असल्याने तसं करणं योग्यच होतं. चार वाजून गेले तसा दिवस उतरू लागला आणि थंडी वाढू लागली.
लवकरच सर्व मंडळी जमली आणि होळी पेटवली गेली. प्रसादाचे नारळ, पोळी पूजा सर्व झाल्यावर आरतीही म्हटली गेली. आता या सर्व गोतावळ्यांत दोन दक्षिण भारतीय कुटुंबेही होती. त्यांनीही मिठाई आणली होती आणि प्रथा म्हणून गुलाल आणला होता. सर्वांना थोडा-थोडा लावून, मिठाई वाटली. मुलेही या सर्व गोष्टींचा आनंद घेत होती. होळीतून बाहेर आलेला प्रसादाचा नारळ फोडून खोबरे खाण्यात कोण आनंद मिळत होता त्यांना आणि भोवतालच्या बारीक काटक्‍या जमा करून होळीत घालण्यामध्येही. थंडी वाढू लागली म्हणून आम्ही सर्वजण आत गेलो. बाकीची मंडळी बाहेर खुर्चीत बसून होळी थंड व्हायची वाट बघत होते. पेटलेली आग तशीच ठेवून आत जाता येणार नव्हतं.
आमच्या ज्या मित्रांकडे गेलो होतो त्यांनी बरेच खाद्यपदार्थ केले होते. पुरणपोळ्या, वडा सांबर, ढोकळा, चिप्स इतर स्नॅक्‍स सर्व होते. भूक तर लागलेलीच होती. सर्वानी खाण्याचा आणि गप्पांचा आस्वाद घेतला. गरम गरम चहा घेऊन आम्ही नाईलाजानेच सर्व घरी परतलो.
तसे पहिले तर छोटासा सोहळा पण सर्व मित्र-मंडळींमुळे एकदम छान साजरा झाला. मुलांनाही थोडी त्यातून आपल्या सणांबद्दल माहिती मिळाली आणि मिठाई, मित्रांसोबत खेळ हे वेगळेच. मुलांनी आपण रंग कधी खेळायचे हा प्रश्न विचारलाच. थंडी कमी झाल्यावर नक्की खेळू असा शब्द घेऊनच ते शांत झाले. सध्या अमेरिकेत भारतीयांना आलेले दडपण थोडे फार का होईना प्रत्येकाला जाणवतेच. पण या अशा सणाच्या वेळी इथे राहून आपण ते मोकळेपणाने साजरे करू शकलो याचा आनंद आणि ते करू शकतो याचे समाधान वाटले.