esakal | "एनर्जी हब'मध्ये शिवरायांचा "जागर' 

बोलून बातमी शोधा

houston - shivjayanti
"एनर्जी हब'मध्ये शिवरायांचा "जागर' 
sakal_logo
By
अतुल पाटील : सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील ह्युस्टनस्थित कुटुंबीयांची पहिलीच शिवजयंती, घराचेच केले म्युझियम 

औरंगाबाद - जगभरात "एनर्जी हब' अशी ओळख असलेल्या अमेरिकेतील टेक्‍सास प्रांतातील ह्युस्टन शहरात यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्रातील ह्युस्टनस्थित कुटुंबीयांनी शिवजयंती दणक्‍यात साजरी केली. यानिमित्त आरती, माहितीपट, जन्मगीत, पोवाडा, व्याख्यान, भित्तिपत्रक, लहानग्यांसाठी भाषणे, खेळ यांसारखे भरगच्च कार्यक्रम पार पडले. 

भारतीय प्रमाण वेळेनुसार रविवारी (ता. 19) रात्री सव्वाबारा वाजता सुरू झालेला कार्यक्रम पहाटे साडेपाचपर्यंत रंगला. शिवजयंतीनिमित्त तानाजी दबडे यांनी संपूर्ण घराचेच म्युझियम केले होते. एका खोलीत बुरुजाची प्रतिकृती उभारत त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून ह्युस्टनमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या कुटुंबीयांना यानिमित्त बोलावले होते. विविध कार्यक्रमांत त्यांनी पारंपरिक वेशात सहभाग नोंदविला. दरम्यान, सर्वांनी स्नेहभोजन घेतले. गजानन गायकवाड यांनी आभार मानले. 

अशी झाली शिवजयंती... 
शिवरायांच्या आरतीने सुरवात 
"शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार' या आदर्श शिंदे यांच्या यू ट्यूबवरील आरतीने शिवजन्मोत्सवाची सुरवात झाली. त्यानंतर शिवरायांचा जागर करण्यासाठी घोषणा देण्यात आल्या. लहान मुलांनी हा क्षण एन्जॉय केला. 

भित्तिपत्रकावर शस्त्रे, गड, किल्ले 
शिवकालीन हत्यारांची माहिती मुलांना व्हावी, यासाठी नेटवरून हत्यारांच्या फोटोसह माहिती आणि शिवाजी महाराजांच्या गड, किल्ल्यांचीही भित्तिपत्रके तयार केली होती. संपूर्ण खोलीत ते चिटकविण्यात आली. ते सर्वांनी आत्मियतेने पाहिले. 

माहितीपट अन्‌ जन्मगीत 
"छत्रपती शिवाजी महाराज - अ बायोपिक ऑफ दि लिजेंड' हा शिवाजी महाराजांवरील 12 मिनिटांचा माहितीपट दाखविण्यात आला. यासाठी 20 बाय 12 च्या पडद्यावर हे सादरीकरण झाले. शिवाजी महाराजांचे जन्मगीत प्रशांत घाडगे, इंद्रायणी घाडगे, रोहिणी दबडे यांनी म्हटले. 

लहान मुलांच्या गोष्टी 
लहान मुलांनी हिरकणी बुरुज, आग्य्राची सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडल्याचे प्रसंग मनोगताद्वारे सर्वांसमोर मांडली. यात ग्रीष्म गायकवाड, अंशूल पाटील, आरव गाडेकर, विहा दुसाने यांचा समावेश होता. लहानग्यांची भाषणे कुतुहलाचा विषय ठरली. 

रोमांचकारी पोवाडा 
"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या मराठी चित्रपटातील अफजल खानाचा वध आणि शिवरायांची कीर्ती सांगणारा पोवाडा अभिजित पाटील (सांगली) यांनी सादर केला. तानाजी दबडे, रोहिणी दबडे, इंद्रायणी घाडगे यांच्यासह तबल्यावर प्रशांत घाडगे यांनी साथसंगत केली. 

असे होते रयतेचे राजे 
कोल्हापूरच्या अभिजित पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माणावर व्याख्यान दिले. इतरांपेक्षा शिवरायांचे वेगळेपण सांगत ते रयतेचे राजे कसे होते, ते सांगताना त्यांनी अनेक प्रसंग उलगडून सांगितले. तब्बल 20 मिनिटे त्यांनी मार्गदर्शन केले. 
 
चर्चेतून कळावे शिवाजी 
शिवरायांच्या काळात प्रचलित झालेली "वेडात वीर दौडले साथ' यासारखी काही प्रेरणादायी वाक्‍ये चर्चेत घेऊन त्यावर सविस्तर मते मांडण्यात आली. कोल्हापूरच्या गोरख पाटील यांची ही संकल्पना सहभागींना आवडल्याने चर्चेला रंगत आली. 

खेळ अन्‌ बक्षीस वितरण 
लहान मुलांसाठी पूनम पाटील, तन्वी दुसाने यांनी खेळाचे आयोजन केले होते. सुटे केलेले किल्ल्याचे पार्ट जोडण्याचा हा खेळ होता. यात मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व मुलांना शिवरायांची प्रतिमा भेट देण्यात आली. 

परिवारासह सहभागी महाराष्ट्रीयन 
तानाजी दबडे (सांगली), प्रशांत घाडगे (मुंबई), अभिजित पाटील (सांगली), अभिजित पाटील (कोल्हापूर), राकेश दुसाने, शिवराज गाडेकर (औरंगाबाद), गोरख पाटील, गजानन गायकवाड, राहुल घाग, जयवंत आवटे, शौरी बनई, सचिन शिंदे, विनायक तुपारे, मिहीर शिंदे, पराग मूर्तीकीकर, अमोल गिड्डे, विठ्ठल कविटके, प्रशांत, रवी, सनी जैन हे पत्नी आणि मुलांसह शिवजयंती कार्यक्रमासाठी उपस्थित होते.