esakal | ‘ब्रेक्‍झिट’नंतर जर्मनीचं होणार काय?
sakal

बोलून बातमी शोधा

‘ब्रेक्‍झिट’नंतर जर्मनीचं होणार काय?

‘ब्रेक्‍झिट’नंतर जर्मनीचं होणार काय?

sakal_logo
By
अजित रानडे, फ्रॅंकफर्ट, जर्मनी

फ्रॅंकफर्टमधील जागेचे भाव गगनाला भिडणार’, ‘युरोपची आर्थिक राजधानी’ हे लंडनचं बिरुद आता फ्रॅंकफर्ट किंवा पॅरिस हिसकावून घेणार’.... जर्मनीतील मराठीजनांच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर २४ जूनपासून अशा संदेशांची देवाणघेवाण जोरात सुरू झाली. आर्थिक क्षेत्रात लंडनची दादागिरी असल्याने तिथून काम करणाऱ्या अनेक जर्मन बॅंका आणि इतर गुंतवणूकदार आर्थिक संस्था आता जर्मनीत येतील आणि या क्षेत्रात अजून बऱ्याच संधी उपलब्ध होतील, असे आर्थिक सल्ला देणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या श्रीधर धरणे या मराठमोळ्या तज्ज्ञाचं ठाम मत आहे; तर ‘हा मान आता पॅरिसला मिळणार’ म्हणून सिव्हरिन लॅमोती ही जर्मनीत काम करणारी फ्रेंच युवती अतिशय आशावादी होती. ‘युरोपचं स्टार्ट अपचं केंद्र आता बर्लिनच होणार’ याविषयी ‘बर्लिन स्टार्ट अप’मधील फ्लोरियान नोलला शंका नसली, तरीही कोणताही व्यवसाय चालवताना संपूर्ण जगाची बाजारपेठ आपल्याला कशी उपलब्ध होईल आणि त्यासाठी जगात आर्थिक स्थैर्य असणे किती आवश्‍यक आहे, याची पुरेपूर जाणीवही आहे. पण या झाल्या जर्मनीमध्ये माझ्यासारख्याच नोकरी-धंदा करणाऱ्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया. त्यांना ‘जर्मन जनतेची प्रातिनिधिक प्रतिक्रिया’ असे लेबल लावणे धाडसाचे ठरेल.

सध्या युरोपमध्ये फुटबॉलचा हंगाम आहे. म्युनिकच्या ‘आयरिश केनेडिज बार’पासून कुलम्बाखसारख्या छोट्या गावातील बिस्रोमध्ये रोज संध्याकाळी बिअरचे मग उंचावत मोठ्या स्क्रीनवर फुटबॉलचा आनंद घेण्यात तरुणाई धुंद आहे. येथील आबालवृद्ध आपापल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणीही फुटबॉलचा सामना सहसा चुकवत नाहीत. अशा स्थितीत ‘ब्रेक्‍झिट’चे जर्मनीवरील दूरगामी परिणाम आणि सध्याचे बदल यावर बोलण्याचा मक्ता केवळ वृत्तपत्र, सोशल मीडिया आणि राजकीय नेत्यांनीच घेतला आहे का, असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे.

जर्मनी आणि ब्रिटन या दोन्ही देशांचे संबंध जुने आहेत. ब्रिटन आणि जर्मनीच्या राजघराण्यांत वेगवेगळ्या कारणांसाठी या सोयरिकी जोडल्या जात. इतकंच काय, ब्रिटनचं राजघराणं १९१७ पर्यंत आपले आडनाव Von Sachsen Coburg Gotha असं जर्मन पद्धतीने लावत असे. पहिल्या महायुद्धानंतर जनमताच्या रेट्यामुळे त्यांनी आपले आडनाव बदलून ‘विंडसर’ असे केले. इंग्लिश आणि फ्रेंच सत्तांनी जगभर वसाहती निर्माण केल्या; तर संशोधनाने वाहिलेल्या जर्मनीने वेगवेगळी उत्पादने तयार करून आर्थिक दबदबा निर्माण केला. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेल्या जर्मनीची आर्थिक आणि लष्करी कोंडी करण्यात ब्रिटन आघाडीवर होता. 

दुसऱ्या महायुद्धाचा जर्मनीतील सर्वसामान्यांच्या मानसिकतेवर प्रचंड परिणाम झाला. येथील एक संपूर्ण पिढी पराभूत मानसिकतेत जगली. पण प्रचंड चिकाटी, परिश्रम या बळावर जर्मनीने जागतिक पातळीवरील स्थान अधिकच पक्के केले. ब्रिटन हा जर्मनीचा अमेरिका-फ्रान्सनंतर तिसऱ्या क्रमांकाचा भागीदार आहे. ग्रीसचे संकट, युक्रेनवरील आपत्ती आणि स्थलांतरितांच्या प्रश्‍नामध्ये जर्मनीच्या अध्यक्षा अँजेला मर्केल यांना ब्रिटनने साथ दिली. अंतर्गत राजकारण आणि विविध विरोधी दबाव गटांमुळे चिंतेत असलेल्या मर्केल यांच्यासाठी ‘ब्रेक्‍झिट’ ही आणखी एक डोकेदुखी ठरू शकते. ‘सर्वांत जुनी लोकशाही असलेला एक साथीदार आपल्याला सोडून गेला’ हे सत्य पचविणे युरोपीय महासंघाच्या देशांना, विशेषत: जर्मनीला थोडं अवघड जाणार, हे निश्‍चित..

‘जर्मनी नेहमीच दादागिरी करते’ असा आरोप करणाऱ्या लहान-मोठ्या युरोपीय राष्ट्रांना, फ्रान्ससारख्या शेजाऱ्याला एकत्र घेऊन पुढे जाण्याची आणि महासंघाची मोट टिकवून ठेवण्याची जबाबदारी जर्मनीवर आहे. जगाच्या व्यापारातील एकचतुर्थांश वाटा असणाऱ्या युरोपीय समुदायाला जागतिक शांततेसाठी मोठे योगदान द्यावे लागणार, हे दिसतच आहे. त्यासाठी एकमेकांमधील संशयाचे धुके दूर करून समस्या हाताळण्याचा अनुभव असलेल्या जर्मनीला तारेवरची कसरत करावी लागेल. अभियांत्रिकी आणि उत्पादन, औषध निर्माण करणारे पारंपरिक मध्यम-मोठे कौटुंबिक उद्योग हा जर्मन अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ‘ब्रेक्‍झिट’मुळे त्याला हादरे बसले, तरीही तो कोलमडणार नाही, हे निश्‍चित.

या पार्श्‍वभूमीवर एक जुनी गोष्ट आठवली. २०१२ मध्ये रिझर्व्ह बॅंकेचे तत्कालीन गव्हर्नर डी. सुब्बाराव यांना जर्मनीत भेटण्याचा योग आला होता. ‘भारतातही ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोकशाही नांदत आहे. तरीही तुमच्या देशातील दारिद्य्र, बेकारी पाहिली, तर तुमचा भविष्यकाळ अतिशय अवघड दिसतो,’ अशी खोचक टिप्पणी येथील एका पत्रकाराने केली. सुब्बाराव या ज्ञानी आणि चतुरस्र विद्वानाने त्या पत्रकाराला उत्तर दिलं, ‘आपल्या युरोपीय समुदायात २८ देश आहेत. आमच्या देशात ३६ राज्ये (केंद्रशासित प्रदेश मिळून) आहेत. युरोपीय समुदायाचा विचार करता भारत हादेखील खंडप्राय देश आहे. आमची लोकसंख्या दुप्पट आहे आणि समस्या कदाचित चौपट! काश्‍मीरच्या माणसाला तमिळनाडूची भाषा समजत नाही, पण आमच्या देशाची ३६ शकले होऊन युरोपीय समुदायाप्रमाणे ३६ देश झालेले नाहीत. आम्ही एकसंध आहोत.. Gentleman, I am worried about your future than mine..
तो कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांत जास्त कॉलर ताठ झालेला माणूस मी होतो..