बर्लिन येथील भारतीय खाद्य महोत्सवात महाराष्ट्राचा ठसा

अभिजित अवसरीकर
Saturday, 7 September 2019

जर्मनीची राजधानी बर्लिन येथे नुकताच 1 सप्टेंबर 209 रोजी भारतीय खाद्य महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. "खाद्य महोत्सव" अशी जाहिरात कुठेही दिसली की माझ्यासारख्या अस्सल खवय्याची पावले आपसूकच तिकडे वळतात.

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळी आहे आणि त्याचा सर्वांना सार्थ अभिमान पण आहे. कोणताही माणूस जेंव्हा आपली मायभूमी सोडून परदेशात जातो तेंव्हा त्याला प्रामुख्याने दोन गोष्टींची उणीव जाणवते. पहिली म्हणजे आपले प्रिय कुटुंब आणि दुसरी अर्थातच आपले खाद्यपदार्थ.

जर्मनीची राजधानी बर्लिन येथे नुकताच 1 सप्टेंबर 209 रोजी भारतीय खाद्य महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. "खाद्य महोत्सव" अशी जाहिरात कुठेही दिसली की माझ्यासारख्या अस्सल खवय्याची पावले आपसूकच तिकडे वळतात.

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळी आहे आणि त्याचा सर्वांना सार्थ अभिमान पण आहे. कोणताही माणूस जेंव्हा आपली मायभूमी सोडून परदेशात जातो तेंव्हा त्याला प्रामुख्याने दोन गोष्टींची उणीव जाणवते. पहिली म्हणजे आपले प्रिय कुटुंब आणि दुसरी अर्थातच आपले खाद्यपदार्थ.

आपल्या प्रत्येक राज्यातील चमचमीत खाद्यपदार्थ तेही जर्मनीत खायला मिळणार असतील तर अस्सल खवय्यांसाठी ती मोठी पर्वणीच असते. अशीच एक संधी भारतीय दुतावासातर्फे बर्लिन मध्ये आयोजित खाद्य महोत्सवात आम्हा सर्वांना मिळाली. बर्लिन मध्ये हजारो भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. परदेशात असूनही त्यांची आपल्या देशाशी असलेली नाळ तुटलेली नाही. बर्लिन मराठी मित्र मंडळातर्फे रोहीत प्रभू, अन्वीता प्रभू, दीपक पाटील, शैलजा पाटील, अमोल सैनिस, केतकी सैनिस, ओंकार कलावडे, सुवर्णा कलावडे, शिरीष पंडित आणि स्वयंसेवकांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. हे सर्वजण येणाऱ्या पाहुण्यांचे आपुलकीने स्वागत करत होते. मराठमोळा फेटा तर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. ढोल ताशांच्या गजरात प्रमुख पाहुण्या, भारताच्या जर्मनीतील राजदूत मुक्ता दत्ता तोमर यांचे आगमन झाले. त्यांनीही कुतूहलाने महाराष्ट्रीयन पदार्थांची माहिती जाणून घेतली.

आपल्या महाराष्ट्रीयन स्टॉल वर लोकांची एकच झुंबड उडाली होती. मेनू तर तोंडाला पाणी सुटणारा होता. चमचमीत वडापाव, गरमागरम पावभाजी, कोल्हापुरी मिसळ, थंडगार कोकम सरबत. आहाहा.. खवय्यांची तर ऐशच होती !!! नुसते भारतीयच नाहीत तर जर्मन लोकं पण याचा पुरेपूर आस्वाद घेत होते. विविधतेने नटलेल्या भारताच्या राज्यांची सांस्कृतिक माहिती, खाद्य पदार्थांची विविधता पाहून ते अचंबित होत होते. विविध राज्यांतील खाद्य पदार्थांचे वेगवेगळे स्टॉल्स, त्यावरची गर्दी पाहून कार्यक्रमाला एखाद्या लग्नसोहळ्याचेच रूप आले होते. कोणी महाराष्ट्रीयन पदार्थांचा आनंद घेत होते तर कोणी गुजराथी पात्रा, गाजर हलवा, भेळपुरी चाट, दिल्लीचा दहीभल्ला तसेच दक्षिण भारतातील पदार्थांचा आस्वाद घेत होते. कार्यक्रमाची वेळ दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत होती. बर्लिनच्या जवळपास असलेल्या शहरांमधून काहीजण तर पूर्ण दिवसच खाद्यमहोत्सवासाठी राखून आले होते. विशेष म्हणजे कोणताही पदार्थ हॉटेल मधून मागवण्यात आलेला नव्हता. सर्व पदार्थ घरगुती पद्धतीने बनवले होते. त्यासाठी अर्थातच सर्वांनी खूप कष्ट घेतले होते.

जर्मनीत भारतीय हॉटेल्स भरपूर आहेत. बऱ्याचदा त्यांचे पदार्थ हे जर्मन लोकांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन बनवले जातात. हे खाद्यपदार्थ मात्र अस्सल भारतीय पद्धतीने बनवण्यात आले होते. जर्मनी मध्ये खूप भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येतात. त्यांना तर हे सर्व पदार्थ घरची आठवण करून देणारे होते. कित्येक भारतीय लोकांनी आपल्या ऑफिस मधील जर्मन सहकाऱ्यांना, विद्यार्थ्यांनी कॉलेज मधील मित्र मैत्रिणींना निमंत्रित केले होते. सर्वांच्याच नवीन ओळखी होत होत्या. शेवटी जशी भाषा लोकांना एकत्र आणते तसेच खाद्यपदार्थ पण लोकांना एकत्र आणतातच.. किसीने खूब कहा है...दिल का रास्ता पेट से होकर गुजरता है...!!!

भारतीय दुतावासातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कथक, भरतनाट्यम, फोल्क, भांगडा, गुजराथी गरबा असे नृत्याचे विविध प्रकार सादर करण्यात आले. मराठी मित्र बर्लिनतर्फे सौ. सायली वळसंगिकर यांनी श्री गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सौ. अंकिता दामले यांनी शास्त्रीय संगीत सादर करून रसिकांची मने जिंकली. लहान मुलांनी विविध गुणदर्शन सादर केले. मराठी मित्र बर्लिनच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थांच्या विक्रीतून जमा झालेला निधी महाराष्ट्रातील पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे.

भारताच्या जर्मनीतील राजदूत सौ. मुक्ता दत्ता तोमर यांनी भाषणात भारत आणि जर्मनी यांचे संबंध कसे वृद्धिंगत झाले आहेत याची माहिती दिली. आशा प्रकारच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून दोन्ही देशांचे लोक अजून जवळ येतात याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. लोकांमधील 'संवाद' हाच लोकांना एकत्र आणण्याचे महत्वाचे माध्यम असते. बर्लिन मध्ये होणाऱ्या आशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे लोकांचा एकमेकांशी अधिकाधिक संपर्क होऊन मराठी लोकांचे एक सुंदर कुटुंबच तयार झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra celebrates at the Indian Food Festival in Berlin

फोटो गॅलरी