esakal | हौन्स्लो, कोलचेस्टर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

बोलून बातमी शोधा

maharashtra din celebrate in london
हौन्स्लो, कोलचेस्टर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
sakal_logo
By
केदार लेले (लंडन)

महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनानिमित्त हौन्स्लो आणि कोलचेस्टर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हौन्स्लो मध्ये भव्य रॅली तर कोलचेस्टर येथे विवध सांस्कृतिक कार्यक्रमांनी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला!

गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर सुचली महाराष्ट्र दिन साजरा करायची संकल्पना
डॉ. प्रविण देसाई यांनी इप्स्वीच येथे गुढीपाडव्याचा कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या आयोजित केला होता. हा कार्यक्रम संपन्न होत असताना असे निदर्शनास आले की कोलचेस्टर हेचेल्म्सफर्ड, इप्स्वीच आणि साऊथ-एंड-ऑन-सी शहरांच्या केंद्र स्थानी आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर श्री. राजीव शिनकर आणि डॉ. माधुरी शिनकर यांनी कोलचेस्टर येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57वा वर्धापनदिन समारंभ साजरा करण्याची संकल्पना मांडली.

महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी उत्साही कुटुंबे पुढे सरसावली
ही संकल्पना यशस्वीपणे तडीस नेणे हे तसे जिकिरीचे काम होते. संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी प्रथम दिर्घ चर्चा आणि त्या नंतर कामांची अचूक विभागणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कोलचेस्टर, चेल्म्सफर्ड, इप्स्वीच आणि साऊथ-एंड-ऑन-सी येथील मराठी बांधवांना वैयक्तिकरीत्या आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले.

डॉ. माधुरी आणि राजीव शिनकर या दाम्पत्यासह सौ. वृषाली आणि श्री. दीपक विधाते, सौ. आरती आणि श्री. अमित खोपकर, सौ. भारती आणि श्री. ललित कोल्हे, सौ. प्रतिमा आणि श्री. अमित पाटील तसेच सौ. अस्मिता आणि श्री. अमित लोणकर ही उत्साही कुटुंबे पुढे सरसावली.

विवध सांस्कृतिक कार्यक्रमांनी महाराष्ट्र दिन साजरा
शीतल खानोलकर आणि आमला मटकर यांनी त्यांच्या सुमधुर आवाजातील गणेश स्तवनाने कार्यक्रमास सुरूवात केली. गणेश स्तवनाने सुरु झालेल्या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली.

मराठी अभिमान गीत - कॉलचेस्टर मधील मराठी कुटुंबीय  

  • नृत्य - सानिका आणि अदिती खोपकर
  • गणपती स्तोत्र - सची खानोलकरगणपती अथर्वशीर्ष - आरती मटकर
  • श्लोक - हर्षवर्धन पेशकर
  • महाराष्ट्र दिन सादरीकरण - आयुष देसाई
  • गीतमाला - श्री. अमित लोणकर आणि सौ. वृषाली विधाते
  • गायनाचा कार्यक्रम - विनीत खानोलकर

अस्सल मराठी मनाचे बहारदार कार्यक्रम सादर झाल्यानंतर, परिचय मेळाव्यात उपस्थित परदेशस्थ महाराष्ट्रीय परिवारांनी आपला परिचय करून दिला!

महाराष्ट्रीयन भोजनाचा आस्वाद
एकंदरीत कुठल्याही यशस्वी समारंभाची गुरुकिल्ली म्हणजे 'सुग्रास भोजन'. सौ. वृषाली विधाते यांनी कुशलतेने बनवलेल्या अस्सल महाराष्ट्रीयन सुग्रास पदार्थांचा सुवास दरवळ्यानंतर सर्वांचेच मन त्याकडे आकृष्ट झाले. उपस्थित महाराष्ट्रीय परिवारांनी श्रीखंड पुरी, मटकीची उसळ, मसाले भातावर अक्षरशः ताव मारला! जेवणाची चव जिभेवर रेंगाळत असताना; आता पुन्हा एकदा लवकरच भेटायचे आणि प्रत्येक वर्षी महाराष्ट्र दिन साजरा करायचा, असे ठरवूनच या कार्यक्रमाची सांगता झाली!