esakal |  महाराष्ट्र मंडळ फ्रान्सचा दशकपूर्ती सोहळा 

बोलून बातमी शोधा

Maharashtra Mandal France's celebrating 10th Ceremony
 महाराष्ट्र मंडळ फ्रान्सचा दशकपूर्ती सोहळा 
sakal_logo
By
आशा राजगुरू

पॅरिस : पुण्याचे उद्योगपती "डीएसके'यांच्या हस्ते पॅरिसमध्ये 13 मे 2007 मध्ये महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या दशकपूर्तीचा कार्यक्रम इतक्‍या दणक्‍यात साजरा होईल अशी कल्पनासुद्धा तेव्हा कोणाच्या मनांत येणं शक्‍य नव्हतं! 

या महाराष्ट्र मंडळाची सुरवात आठ-दहा सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केली,आज ही संख्या पाच-सहा पटीने वाढली असून ही बाब अभिमानास्पद आहे. माहिती तंत्रज्ञान व इतर उद्योग क्षेत्रांतील तरुण पिढीच्या सभासदांच्या मदतीने आणि उत्साहाने मंडळाचा दशकपूर्तीचा कार्यक्रम मोठया आनंदात, जोमांत व दणक्‍यांत साजरा झाला. बरोबर दहा वर्षाने 13 मे2017 दिवशी! मान मिळाला भारतीय दूतावासाचे मानिष प्रभात यांच्या हस्ते उदघाटनाचा. 
कार्यक्रमाला सुरुवात झाली, गेल्या दहा वर्षांत ज्यांनी या मंडळाला नेहमी मदतीचा हात पुढे केला त्यांनी पाठविलेल्या शुभेच्छांनी भारतातून पाठविलेल्या या शुभेच्छा प्रत्यक्ष पडद्यावर पाहतांना आनंद झाला. आणि अत्यंत समाधान वाटले. 

जुन्या आठवणी जपण्याचं व पुढे मार्गदर्शन उरतील अश्‍या आजच्या आठवणींना स्थान देण्याचं कार्य निभावलं "दशकपूर्ती स्मरणिके"ने. स्मरणिकेचं उदघाटन मानिष प्रभात व मंडळाचे अध्यक्ष शशी धर्माधिकारी यांच्या हस्ते झालं. ही स्मरणिका लवकरच इंटरनेटवर उपलब्ध होईल. (www.mmfr.org) 
गाजलेल्या व अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविलेल्या "फॅन्ड्री" चित्रपटाचे निर्माते विवेक कजारिया आणि आज गाजत असलेल्या "हाफ तिकिट" चित्रपटाचे दिग्दर्शक समित कक्कड यांच्याशी सांधलेल्या संवादावरून मराठी चित्रपटाच्या उज्वल भविष्याची खात्री पटली. 

विवेक कजारिया यांचा लघु चित्रपट "दुर्गा" मनाला चटका लागून गेला. नंतर कार्यक्रमाचा दुसरा भाग त्यागराज खाडिलकर व दीपक देशपांडे यांच्या "हसरी संध्यायाकाळ'ने गाजवला. "महाराष्ट्र दिन' व महाराष्ट्र मंडळाचा दहावा वाढदिवस त्यागराजांच्या दमदार आवाजाने गाजला. त्यागराजांच्या गाण्यांना सर्व बालक आणि तरुण मंडळींनी चांगली साथ दिली, तर हास्यसम्राट दीपक देशपांडे यांच्या विनोदी कार्यक्रमाने खळखळून हसवले. 

या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण ठरलं "जेट एअरवेज'ने सढळ हाताने बहाल केलेलं "भारतभेटी'चे तिकीट ! जेट एअरवेज कंपनीचे पॅरिसस्थित डायरेक्‍टर अशुतोष शुक्‍ला यांच्या हस्ते हे "Tombola"चं बक्षिस वितरण झाले. "आयफेल टॉवर" व "महाराष्ट्राचा फेटा' यांचा सुंदर मिलाफ असलेला केक कापून अध्यक्षांनी महाराष्ट्र मंडळाची दशकपूर्ती साजरी केली आणि या आनंदात भर पडली चविष्ट पोटभर फराळाने!