esakal | साता समुद्रापार मराठी

बोलून बातमी शोधा

manisha-gokhale
साता समुद्रापार मराठी
sakal_logo
By
मनीषा गोखले

आम्ही दोघी बहिणी जन्मानं अमेरिकन, पण अंतःकरणानं पक्‍क्‍या पुणेकर. इथं अमेरिकेतल्या फळांना चव नाही की फुलांना गंध नाही. अमेरिकेतल्या कोरड्या बेचव वातावरणापेक्षा पुण्यातलं चवदार वातावरण आम्हाला भावतं.

माझा जन्म अमेरिकेत सेंटरव्हील, व्हर्जिनिया इथे झाला. माझे आजोबा तेव्हा त्याच भागात नोकरी करत होते. माझी आई पुण्याची. पुण्यातून एसएससी झाल्यावर ती अमेरिकेत आली. आई-वडील दोघेही मराठी असल्यामुळे आमच्या घरात मराठीच बोलले जाते. आम्हाला सक्त ताकीदच होती, की ते "यास फ्यास' बाहेर, घरात नाही. अगदी साधी गोष्ट घ्याना, अमेरिकन मुले घरातसुद्धा कॅनवास शूज घालतात. आमच्या छायाचित्रात आम्हाला अनवाणी पाहून आमचे अमेरिकन मित्रमैत्रिणी म्हणतात, ""शेम ऑन यू,'' पण आम्ही त्यांना ठासून सांगतो, ""ही आमची पद्धत आहे.'' माझे संगोपन माझ्या आजी- आजोबानीही केले. आजोबांचे (आईचे वडील) मराठी भाषेवर नितांत प्रेम. मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला अगदी बालवयापासून त्यांनी मराठी लिहायला, वाचायला शिकविले. आम्हा दोघी बहिणींना प्रथम मराठी बाराखड्या आवडत नव्हत्या. आजोबांनी चंमतग केली. ग, गा, गि, गी बाराखडी म्हणायला सुरवात केली. विशिष्ट अक्षरावर आम्हाला हसू आलं. मग आम्ही मराठी शिकायला आवडीनं तयार झालो. दर खेपेला "ग'ची बाराखडी व्हायलाच हवी असे.

आजीने (आईची आई) रामरक्षा, स्तोत्रे, आरत्या पाठ करून घेतल्या. त्यामुळे उच्चार शुद्ध झाले. सुरवातीला "जय देव जय देव'चं आम्ही "जेजेवं जेजेवं' करायचो. एकदा पुणे- मुंबई एअर पोर्ट बसमध्ये वेळ जाईना म्हणून आम्ही स्तोत्रे म्हणायला सुरवात केली, बेल्जियमकडे निघालेले एक मराठी सहप्रवासी आश्‍चर्याने ऐकतच राहिले. पंधरा मिनिटे ते ऐकत होते. आम्ही अमेरिकेत जन्मलो आहोत हे ऐकून त्यांना नवलच वाटलं.

आजी- आजोबा निवृत्तीनंतर पुण्याला कायमचे परतले. तेव्हा मी नऊ वर्षांची होते. आणि शिल्पा सात. घरात "मानापमान,' "सौभद्र' इत्यादी संगीत नाटकांच्या व्हिडिओ कॅसेट्‌स असल्यामुळे उत्तम मराठी गद्य आणि पद्य कानावर पडू लागले. आम्ही जवळ जवळ दर सुटीला पुण्यात आजीआजोबा, मामामामींकडे यायचो. टिळक रस्त्यावर दारात बस पकडून आजोबांबरोबर गावभर भटकायचो. शनिपाराजवळ उतरून समोरच्या गल्लीत पेटीच्या शिकवणीला जायचो. तिथल्या अमृततुल्य हॉटेलमध्ये चहा प्यायचो. हॉटेल मालक आम्हाला फुकट नानकटाई द्यायचा मला जात्याच सूर आणि ताल यांची जाण आहे. तेव्हा मी चौदा- पंधरा वर्षांची असेन, माझ्या मामीनं (मीनल भागवत) डॉ. पौर्णिमा धुमाळे या तिच्या संगीत गुरूंना विनंती केली. त्या संगीत न शिकलेल्यांना शिकवत नाहीत. मी तर गाण्यात अडाणी! पण त्यांनी माझ्याकडून चार नाट्यगीते ताला-सुरात बसवून घेतली. "मला मदन भासे हा मोही मना,' "नभ मेघांनी आक्रमिले', "नारायणा रमा रमणा', "दिव्य स्वातंत्र्य रवि' ही ती चार गीतं. मला "मदन भासे'च्यावेळी नेहेमी हसू आवरता येत नाही. "मला मटण ताजे आणा कुणी' हे विडंबन आठवतं. मी तबला, पेटी विकत घेऊन अमेरिकेला नेली. तरीपण त्या गीतांशिवाय मला गाण्यातलं इतर काहीही येत नाही. अमेरिकेत ती गाणी म्हटली, की लोकांना वाटतं, मला शास्त्रीय गाणं चांगलं येतं.
दुसरी मामी (स्मिता भागवत) आम्हाला रविवार पेठेत नेऊन छान छान खरेदी करून द्यायची. तो सारा नॉस्टॅलजियाच.

इथं तसं सर्व रुक्ष आहे. शरीरानं इथं पण मन पुण्यातच घुटमळतं. अमेरिकन लोक तुटक असतात. इथल्या फुलांना गंध नाही, फळांना चव नाही, आणि माणसांना प्रेम नाही. या सगळ्या कोरडेपणात आम्हाला आमचं मराठीपण हे ओऍसिससारखं वाटतं. आपल्या मराठी पदार्थांची सवय इतकी लागली आहे, की त्यापुढे अमेरिकन पदार्थ बेचव लागतात. पण कॉलेजच्या होस्टेलवर ते तयार करता येत नाहीत, पार्टनर गोरी असते, तिला वास आवडत नाही आणि कित्येकदा पदार्थ बनवायला वेळ मिळत नाही. इथं अचानक एक दिवस व्हर्जिनिया राज्याचे गव्हर्नर (मुख्य मंत्री) सहज कॉलेजात आले. त्यांच्याबरोबर लवाजमा, स्टेनगनवाला वगैरे कोणी नव्हतं. मला सहज त्यांच्याबरोबर छायाचित्र काढायची संधी मिळाली.

लहान असताना मुंबईहून पुण्याला येत असताना चहाला थांबलो होतो. मी विचारलं, "कुठाय तुमचा तो पुण्या?' ज्ञानेश्वरचे डायनोसॉर, नागपूरचे नापूर, मोरारजी भाईंचे मोराजीबाई, अमृततुल्यचे अमृतुल्य असले चुकीचे उच्चार ऐकून लोक हसायचे. असल्या गमती आम्ही करायचो. मध्यंतरी "मालमत्ता' हा शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडल्यावर अमेरिकेत भेटलेले एक मराठी गृहस्थ अचंबितच झाले. माझं मन इतकं भारतीय झालं आहे, की मी "हाफ तिकीट'सारखा किशोरकुमारचा हिंदी सिनेमा यू ट्यूबवर पाहते. आशा, लता यांची गाणी ऐकते. असे "दिल है हिंदुस्तानी' झाले आहे आमचे! मोठे झाल्यामुळे भारताला भेट देणं फार अवघड होऊ लागले आहे. पण जीव भारतात आणि विशेषतः पुण्यात अडकलेला असतो.