देणाऱयाचे हात हजारो...

Marathi article Non Resident Marathi community UK Marathi writer Vikram Vhanmane
Marathi article Non Resident Marathi community UK Marathi writer Vikram Vhanmane

२०१२ सालच्या दिवाळी दरम्यानची गोष्ट आहे. मी दरवर्षी शाळा सुरु होण्याच्या वेळी एका अनाथाश्रमाला भेट द्यायचो. पण त्यावर्षी काही कारणांनी मला ते शक्य झाले नाही. नंतर दिवाळीच्या आधी एका रविवारी सकाळी थोडा निवांत होतो म्हणून सहज अनाथाश्रमाला भेट द्यायला गेलो. जाताना डोक्यामध्ये २-४ हजाराची रक्कम द्यायचा विचार होता. मी पैसे देण्यापेक्षा वस्तू देण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर आपण दिलेल्या पैशाचा सदुपयोग होईल की नाही याची शंका मनामध्ये राहते.

पुण्यामध्ये दापोडी रेल्वेस्टेशनजवळ एक अनाथाश्रम आहे. साधारण ४५-५० मुले या अनाथाश्रमात राहतात. तिथल्याच नगरपालिकेच्या शाळेत शिकतात. दिवसभर घरातली बरीच कामे स्वतः करतात. आणि शाळेचा अभ्यासही करतात. आश्रमात गेल्यावर तिथल्या सुरवसे सरांची भेट घेतली. सरांना विचारले, ''मुलांना शाळेसाठी वह्या-पुस्तके किंवा इतर कोणते शालेय साहित्य हवे आहे का ?''. सर म्हणाले,  ''शाळा सुरु होऊन बरेच दिवस झालेत, त्यामुळे शाळेच्या वस्तू आहेत सगळ्या. पण...दिवाळी एक आठवड्यावर आली तरीही पैशांअभावी या महिन्याचा किराणामाल भरता आलेला नाही.''

येताना डोक्यात २-४ हजाराची रक्कम देण्याच्या विचाराने आलो होतो. अगदीच जास्त झाले तर ५ हजारांपर्यंत रक्कम देता आली असती. पण पन्नासेक लोकांचा किराणा म्हणजे किमान २०-२२ हजार रुपये लागणार होते. थोडा विचार केला आणि सरांना म्हणालो तुम्ही मला किराणामालाची यादी द्या मी बघतो काय करायचे ते.

सरांचा निरोप घेऊन मी निघालो आणि  गाडीला किक मारली. घराकडे परत येताना एक महिन्याचा किराणामाल कसा मॅनेज करायचा हाच विचार करत होतो. घरी येताना जवळच राहणारा माझा बालमित्र भेटला. त्याच्या घरासमोर आम्ही दोघे चर्चा करत उभे होतो. अनाथाश्रमात घडलेली गोष्ट सांगितल्यावर तो म्हणाला काही काळजी करू नकोस, आपण करू काहीतरी. आमचा ७-८ बालमित्रांचा एक ग्रुप आहे. सगळ्यांना ओळीने फोन केले. ४-५ जण लगेच तयार झाले हजार-हजार रुपये द्यायला. दोघे म्हणाले जरा गडबडीत आहे नंतर फोन करतो. दोन्ही मित्रांचा तासाभराने फोन आला आणि त्यांनीही प्रत्येकी हजार रुपये द्यायचे कबूल केले. माझ्या कंपनीमधल्या जवळच्या २-३ मित्रांना फोन केला आणि त्यांनीही होकार दिला. माझ्या कंपनीमधील काही मित्र कंपनीच्या कामासाठी युनाइटेड किंग्डममध्ये होते. त्यातील एकाला फोन केला. फोन केला म्हणजे नुसता मिस कॉल दिला. नंतर लक्षात आले की आपल्याकडे सकाळचे ११ वाजलेत पण अजून तिकडे सकाळ झालेली नाही. युकेमधले मित्र रविवार सकाळच्या साखरझोपेत असतील. १-२ तासांनी युकेच्या मित्राचा फोन आला. त्याला अनाथाश्रमातील घटना सांगितल्यावर तो म्हणाला मी इथल्या बाकी मित्रांशी चर्चा करून तुला फोन करतो. थोड्यावेळाने त्याने फोन केला आणि पाच मित्र मिळून पाच हजार रुपये देतील असे सांगितले.

आणि बघता बघता  २-३ तासांच्या फोनाफोनीनंतर माझ्याकडे २५ हजाराची रक्कम उभी राहिली होती. म्हणजे कोणीच मला पैसे दिले नव्हते पण माझ्यासाठी माझ्या मित्रांचा शब्द पुरेसा होता.संध्याकाळी आश्रमातल्या सुरवसे सरांना फोन केला आणि सांगितले मी सगळी व्यवस्था करतो. पिंपरीमध्ये शगुन चौकाकडे जाताना डाव्या बाजूला तिरथदास मंगलदास नावाचे एक मोठे किराणामालाचे  दुकान आहे.  रविवारी खूप गर्दी असते आणि सोमवारी पिंपरीतली सगळी दुकाने बंद. त्यामुळे मंगळवारी संध्याकाळी जायचे ठरले होते. मंगळवारी संध्याकाळी सरांचा मुलगा प्रकाश गाडी घेऊन दुकानाजवळ पोहचला. मीसुद्धा ऑफिसमधून घरी जाऊन दुकानात पोहचलो.

दुकानदाराला सामानाची यादी दिली. दुकानात वेगवेगळ्या प्रतीचा गहू, ज्वारी, तांदूळ होता. आपल्याला त्यातलं फार काही कळत नाही. त्यामुळे दुकानदाराला स्पष्ट सांगितले, मला घरच्यासाठी हे सामान नको आहे, अनाथाश्रमात द्यायचे आहे. एरवी मारवाडी दुकानदार म्हणजे हिशेबात चार अणेसुद्धा कमी करणार नाही. पण अनाथाश्रमासाठी वस्तू हव्या आहेत असे सांगितल्यावर ते स्वतःहून पुढे आले. मुलांसाठी योग्य गहू, ज्वारी, तांदूळ त्यांनीच निवडला. आणि म्हणाले २५ किलो गहू माझ्याकडून. इतर वस्तूंसाठीसुद्धा भाव कमी करून त्यांनी सगळ्या वस्तू दिल्या आणि फक्त १८ हजार रुपयात आमचा सगळा किराणा माल आम्हाला मिळाला. त्या दुकानात मालाच्या पिशव्या भरणारा छोटा मुलगाही मदतीला आला. मला म्हणाला, ''दादा माझ्याकडून पाच किलो तांदूळ घेऊन जा.'' त्याची स्वतःची आर्थिक परिस्थितीसुद्धा कदाचित अनाथाश्रमापेक्षा वेगळी नसेल. पण त्याचे मन मात्र खूप मोठे होते. 

दोन दिवसांपूर्वी २-४ हजार रुपयांची मदत करू पाहणारा मी वीसेक हजारांचा किराणा माल घेऊन चाललो होतो. सरांचा मुलगा प्रकाश सगळ्या वस्तू मिळाल्या म्हणून खुश होता. मनोमन देवाचे, माझ्या मित्रांचे, दुकानदाराचे आणि दुकानातल्या मुलाचे आभार मानून मी समाधानाने घरी निघालो. एक मोठं सत्कार्य हातून घडल्याचे समाधान होते आणि एवढे चांगले मित्र आपल्याला लाभले याचा अभिमान पण वाटत होता. 

नंतर पुढे काही महिन्यांनी कंपनीच्या कामासाठी युनाइटेड किंग्डमला आलो. त्यानंतर गेली पाच वर्षे युनाइटेड किंग्डममध्ये दिवाळी साजरी करतोय. यंदाच्या दिवाळीत २०१२ ची दिवाळी आठवली. ही दिवाळी युनाइटेड किंग्डममधली शेवटची. पुढच्या वर्षीची दिवाळी आणि इतर सगळे सण आपल्या मातृभूमीत साजरे करायचेत. 

(पैलतीरसाठीचे आपले लेख/बातम्या webeditor@esakal.com वर पाठवू शकता. ई मेलच्या subject मध्ये पैलतीर हा उल्लेख आवर्जून करा) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com