esakal | भारतीय स्वातंत्र्यदिनाचा स्वीडनमध्ये जल्लोष
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा स्वीडनमध्ये जल्लोष

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा स्वीडनमध्ये जल्लोष

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

15 ऑगस्ट 2017 ची सकाळ.. भारतीय राष्ट्रध्वजाचे थाटात रोहण, ध्वजसलामी, राष्ट्रगान आणि त्यानंतर विविध कला व गुणदर्शनाचा रेखीव कार्यक्रम.. आणि हो.. हे सगळे स्टॉकहोमच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी.. रॉयल पॅलेसच्या समोर उभारलेल्या सुबक शामियान्यात 250 ते 300 भारतीय आणि स्वीडिश लोकांच्या उपस्थितीत पार पडला. 

भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वर्षपूर्तीचे औचित्य साधत दरवर्षी ऑगस्टमध्ये (इकडच्या उन्हाळी सुट्टीच्या अखेरीस) होणाऱ्या 'कल्चरल फेस्ट स्टॉकहोम' या स्टॉकहोमच्या सांस्कृतिक सप्ताहाचा यंदाचा मुख्य विषय होता 'भारत'! 

भव्य रंगमंचावर सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यांगना पद्मश्री गीता चंद्रन यांच्या बहारदार 'वंदे मातरम' नृत्याने झाली. भिन्न भाषा, भिन्न विभूषा, राज्यापरत्वे बदलणाऱ्या विविधरंगी कला, रंगभूषा आणि इतक्‍या सगळ्या विविधतेतही नटलेली भारतीय 'एकता'! या सगळ्याचं ओघवतं दर्शनच त्या सलग चार तास चाललेल्या कार्यक्रमात दिसून आले. 

यात गोव्याच्या 'गळ्यान साखळी'पासून ते राजस्थानच्या 'ढोलनाऽऽ', काश्‍मिरी 'बुमरोऽऽ', बंगालचे 'एकला चालो' तर राजस्थानचे 'मारे हिवडा मे' अशा सगळ्याच लोककला-गीतांचा आणि नृत्याचा सुंदर मेळ घातला होता. लोकप्रिय फॅशन डिझायनर मानव गंगवानी, निपूण कथ्थक नृत्यांगना शिवानी सेठीया यांच्यासह स्टॉकहोमच्या स्थानिक कलाकारांचा यात सहभाग होता. 

छोट्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी म्हणून वेगळा मंच उपलब्ध करून दिला गेला होता. उषा बालसुंदरम यांच्या मार्गदर्शनाखाली बालकलाकारांच्या चमूनेही सुंदर नृत्याविष्कार सादर केले. 

भारतीय वेशभूषेत सजलेल्या या बालचमुंनी 'वंदे मातरम', 'भारत माता की जय' असे नारे देत आणि भारतीय ध्वज दिमाखात उंच मिरवित छोटी प्रभातफेरीदेखील काढली. या सगळ्याला स्टॉकहोमकरांनी दिलखुलास दाद दिली. 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट हा सांस्कृतिक सप्ताह सुरू होता. 

यात कुशल कारागिरांनी थाटलेले हातमाग व कलाकुसरीचे दालनही होते. 'सर्च इंडी' ही भारतीय चित्रकला, वाद्य संगीत यांची सुंदर प्रदर्शनीदेखील होती. यात मेंदी आर्ट, इंडियन क्‍लासिक नृत्याचे वर्कशॉप, आकृती आर्टचे 'लाईव्ह पेंटिंग' वर्कशॉप वाखाणण्याजोगे होते. जोडीला भारतीय खाद्य पदार्थांचे विविध स्टॉलदेखील होतेच. इथल्या भारतीयांसाठी तर ही मेजवानी होतीच; पण स्वीडिश लोकांसाठीही 'न पाहिलेला भारत' अनुभवण्याची ही संधी होती. याच सप्ताहामध्ये दिल्ली ते स्टॉकहोम या थेट विमानसेवेचेही उद्‌घाटन झाले. 

या सप्ताहातील एकेदिवशी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आयोजित योगाथॉनलाही स्टॉकहोमकारांनी उत्तम प्रतिसाद दिला. रिमझिम पावसात स्वामी ज्योतिर्मयांनी करवून घेतलेला 'रेन योगा', हलके फुलके सांघिक खेळ, योगमुद्रा, सूर्यनमस्कार सगळ्यांनाच आनंद देऊन गेले. शेवटी ध्यान साधनेतून आलेली प्रसन्न अनुभूती विलक्षण सुखावणारी होती. 

या आठवड्यात 'रि-इमेजिंग इंडिया' असा विषय घेऊन बिझनेस डेचेही आयोजन करण्यात आले होते. 'भावी औद्योगिक केंद्र' म्हणून उभा राहणारा भारत, तेथील होऊ घातलेल्या विकासाच्या वेगवेगळ्या वाटा, येत्या 30 वर्षांत शक्‍य असणारे गुंतवणुकीचे पर्याय, वाहतूक, दळणवळण, पर्यावरण आणि इतर अनेक सेवांमधील संधीच्या शक्‍यता या विषयांवर चर्चा, विश्‍लेषण आणि चिंतन झाले. 

स्टॉकहोममधील युवा चमूला भारतीय विकासाच्या भावी संकल्पनांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आयोजित स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज हॅकेथॉन या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही या सांस्कृतिक सप्ताहात पार पडला. 'इंडिया अनलिमिटेड'च्या प्रयत्नांतून यशस्वी झालेल्या स्पर्धेचे उद्‌घाटन खुद्द नितीन गडकरी यांनी आपल्या स्टॉकहोम भेटीत केले होते. 

या सप्ताहात स्टॉकहोमच्या काही चित्रपटगृहांमध्ये भारतीय सिनेमे झळकले. बार्बी बॉईज, बॉलिवूड म्युझिकल आणि टायगर स्टाईल भांगडावर स्टॉकहोमकरही थिरकले. पापा सिजेच्या कॉमेडीवर तेही खळखळून हसले. 

या सगळ्या सप्ताहाचा कळस म्हणजे त्यातल्या एका संध्याकाळी सबीर खान आणि अनंत कृष्णन यांच्या मृदंग व डोलाच्या साथीने तबल्यावर आपली जादुई बोटे फिरवित उस्ताद झाकीर हुसेन यांनी उभं केलेलं स्वर्गीय नादब्रह्म! अवघं वातावरण भारून टाकत झाकीर साहेबांनी ज्या तल्लीनतेने तबलावादन केले, ते केवळ लाजवाब! त्यांच्या त्या अद्भूत ठेक्‍यावर स्टॉकहोमकरही डोलले.. मंत्रमुग्ध झाले.. 

या सप्ताहातून लोकांपासून लोकांपर्यंत पोचण्याचा दोन राष्ट्रांमधील हेतू सहज साध्य झाला. स्वीडिश सरकार आणि स्टॉकहोम शहराने भारतीयांप्रति दाखवलेले हे भारतासाठी खरंच अभिमानास्पद होते. 

यानिमित्ताने दोन्ही राष्ट्रांमधील बंधदेखील दृढ झाले, हे निश्‍चित! 

स्थानिक भारतीय मंडळींचा उदंड उत्साह, त्याला भारतीय राजदूतांकडून मिळालेलं भरपूर उत्तेजन आणि स्वीडिश मंडळींचा प्रचंड प्रतिसाद यातून या सांस्कृतिक सप्ताह यशस्वी झाला.