esakal | कौटिल्यासारखा महान तत्ववेत्ता पाकिस्तानच्या ऐतिहासिक जाणीवेत का नसावा?

बोलून बातमी शोधा

कौटिल्यासारखा महान तत्ववेत्ता पाकिस्तानच्या ऐतिहासिक जाणीवेत का नसावा?
कौटिल्यासारखा महान तत्ववेत्ता पाकिस्तानच्या ऐतिहासिक जाणीवेत का नसावा?
sakal_logo
By
सुधीर काळे

मूळ लेखक: श्री. सैफ ताहीर, अनुवाद: सुधीर काळे

हा लेख २ ऑगस्ट २०१७ रोजी ’डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात प्रकाशित झाला व ’डॉन’ व श्री. सैफ ताहीर यांच्या अनुमतीने त्याचे भाषांतर मी इथे सादर करीत आहे.

जेंव्हां आसपासच्या रहिवाशांना रोजच्या व त्याच-त्याच गोष्टींचा कंटाळा येतो आणि जेंव्हां उन्हाळ्यात तपमानाचा पारा वर-वर सरकू लागतो तेंव्हां एक बदल म्हणून हे रहिवासी खैबर पख्तूनख्वा राज्याच्या हरिपूर जिल्ह्यातील खानपूर तलावाकडे विसाव्यासाठी जातात.

खानपूरच्या रस्त्याला लागल्यावर तक्षिलाचा कडा मागे टाकून थोडेसे पुढे गेल्यावर “मोहरा मुराडू अवशेष” असे लिहिलेली एक जुनाट गंजलेली पाटी आपल्याला दिसते व तिथे वळल्यावर आपल्याला एका अरुंद व नागमोडी रस्ता लागतो. तो रस्ता आपल्याला एकाद्या निसर्गाबद्दलच्या वार्तापटात शोभेल अशा हिरव्यागार व दाट हिरवळीकडे नेतो.

या रस्त्यावरून जाताना समोर टेकडीवर वसलेले एक छोटेसे खेडे व छोटासा, खळखळून वहाणारा एक झरा आपल्याला दिसतो. 

या झर्यायच्या पूर्वेला एका पौराणिक वसाहतीचे बर्यातपैकी जतन करून ठेवलेले अवशेष दिसतील. हे अवशेष ख्रिस्तपूर्व सुमारे २०० वर्षांपूर्वीचे “मोहरा मुराडू” नांवाच्या बौद्धविहाराचे आहेत व व तिथेच काळ्या दगडांच्या कारागिरीतून बनलेला एक मोठा हे स्तूपही उभा आहे!

जगातल्या परिचित विश्वविद्यालयांपैकी पहिले विश्वविद्यालय मानल्या जाणार्याू व शैक्षणिक विद्वत्तेचे  माहेरघर मानल्या जाणार्याच ’तक्षशिला’ विश्वविद्यालयाच्या घडणीत इथल्या १८ बौद्धविहारांचे महत्वाचे स्थान होते. मोहरा मुराडू हा बौद्धविहार त्या १८ पैकीच एक होता. जोलियन, धर्मराजिका, सिरकाप व पिप्पलान अशी इतर महत्वाच्या विहारांची नांवे होती.
कदाचित् त्या काळी ’विश्वविद्यालय’ हा शब्दही अद्याप वापरात आलेला नसेल हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. पण ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात स्थापिली गेलेली तक्षशिला ही संस्था विश्वविद्यालयासारखी चालविली जाणारी संस्थाच होती.
’जातक’सारख्या पवित्र बौद्ध धर्मग्रंथांत तक्षशिलाचा उल्लेख अनेक शतकापूर्वीचे एक ज्ञानसंपादनाचे केंद्र असाच केला गेलेला आहे. इथेच महाभारत या ग्रंथाचे पहिल्या वेळचे कथन करण्यात आले असेही मानले जाते. 
तक्षशिला या संस्थेच्या जलद गतीने झालेल्या वृद्धीवर पाकिस्तानच्या वायव्य भागात उदयास आलेल्या ’गंधार’[१] या राज्याची मोठीच भूमिका होती. या विश्वविद्यालयात ६३ विषयांच्या अभ्यासक्रमाची सोय होती. त्यात वेद, खगोलशास्त्र, तत्वज्ञान, शल्यविद्या, राज्यशास्त्र, युद्धशास्त्र, वाणिज्यशास्त्र, संगीत, धनुर्विद्या आणि अशाच इतर अभ्यासक्रमांचा समावेश होता.

’पाली कॅनन’सारख्या इतर बौद्ध धर्म साहित्यानुसार ब्राह्मण राजपुत्र व विद्यार्थी खूप दूरदूरच्या भागांतून तक्षशिला विश्वविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी येत असत आणि या  विश्वविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये उल्लेखनीय व विस्तृत यादीत अशा खूप लोकांची नांवे असायची. उदा. जतोपिल हा बनारसचा मुख्य सेनापती, जीविका हा एक वैद्यकशास्त्रातील विद्यार्थी (यानेच बुद्धाला आजारातून बरे केले होते), कोसला राज्याचा अधिपती परसासेनाजित, व्याकरणावर प्रभुत्व असलेला पाणिनी आणि चरक हा सुप्रसिद्ध वैद्य यांचा या यादीत समावेश होता! 

पण तक्षशिला विश्वविद्यालयाचा सर्वात लक्षणीय माजी विद्यार्थ्याचा मान अलौकिक राजकीय तत्वज्ञ व विचारवंत मानल्या जाणार्या  चाणक्यालाच द्यायला हवा. (त्याचे कौटिल्य हे नांवही खूप प्रचलित आहे.) त्याची व त्याने लिहिलेल्या ’अर्थशास्त्र’ या ग्रंथाची बरोबरी कुशाग्र बुद्धीमत्ता असलेल्या निकोलो माक्यावेली या विद्वानाशी व त्याच्या ’द प्रिन्स’ (The Prince) या पुस्तकाबरोबरच केली जाते.

दक्षिण आशियातील एक लोकप्रिय म्हण आहे: “जो गूळ खाऊन मरू शकतो, त्याला विष कशाला पाजायचे?” या म्हणीचा उगम मौर्य या राजपुत्राच्या व चाणक्याच्या ख्रिस्तपूर्व ३३० सालच्या कोड्यात पाडणार्याह संभाषणातूनच झाला होता. 

एक दिवशी राजपुत्र मौर्य फिरायला बाहेर पडलेले असताना त्यांना एक विचित्र दृश्य दिसले: चाणक्य आपल्या गुडघ्यावर बसून गवताच्या मुळांशी मध ओतत होता. मौर्य त्याच्याजवळ गेले व त्यांनी चाणक्याच्या कृतीमागील उद्देश विचारला. चाणक्याने उत्तर दिले कीं तो गवताच्या मुळांना गोड करायचा प्रयत्न करत होता.

चाणक्य गवतावरून चालताना ठेच लागून खाली पडला होता असे दिसते. मग त्याने विचार केला कीं आणखी कुणी ठेच लागून पडू नये म्हणून गवताला तात्पुरते उपटून टाकण्यापेक्षा त्याला समूळ नष्ट करणेच जास्त श्रेयस्कर आहे.

जमीनीखालील मुंग्यांचे थवे मधाच्या वासाने मध शोधत गवताच्या मुळांशी जातील, त्यांना मध सापडेल मग ते मधाबरोबर गवताची मुळेसुद्धा कुरतडून खातील व गवताला कायमचे नष्ट करतील म्हणून तो गवताच्या मुळांवर मध ओतत होता!

चाणक्याच्या चतुरपणाने प्रभावित झालेल्या मौर्य राजाने त्याला तेंव्हांपासून राज्यातील परिस्थितीसाठीचा मुख्य सल्लागार म्हणून नेमले. यातूनच चाणक्य व राजा चंद्रगुप्त यांच्यातील प्रदीर्घ व टिकाऊ परस्परसंबंधांचा पाया रचला गेला. संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेल्या व १५० वर्षे टिकलेल्या अतीशय शक्तिशाली व विस्तृत साम्राज्याच्या स्थापनेला या संबंधांचा खूपच उपयोग झाला. या दोघांच्या परस्परसंबंधांतूनच भौगोलिक विस्ताराच्या दृष्टीने सर्वात विस्तृत व भारतीय इतिहासातील सुवर्णयुग मानले जाणार्याा साम्राज्याची स्थापना झाली. हे साम्राज्य मोंगल साम्राज्यापेक्षासुद्धा जास्त मोठे होते. 

अशा चाणक्याच्या आजच्या पाकिस्तानबरोबरच्या अभेद्य संबंधांचे रहस्य फारच थोड्या लोकाना माहीत असेल. आजच्या तक्षिलाच्या (तक्षशिलाचा अपभ्रंश) उपनगरात जन्मलेल्या चाणक्याच्या कुशाग्र व झपाट्याने वाढत जाणार्याल बुद्धिमत्तेमुळे तो सर्वांच्या लगेच नजरेत भरला व अध्ययनासाठी विद्यार्थी म्हणून त्याला तक्षशिला विश्वविद्यालयात प्रवेश देण्यात आला. तिथेही तो उच्च श्रेणीचे गुण मिळवून चमकला व त्याला त्याच्या विशीतच तिथे प्राध्यापक म्हणून नेमण्यात आले. 

त्याचे सर्वोत्कृष्ठ लिखाण मानले जाणार्याप त्याच्या ’अर्थशास्त्र’ या ग्रंथात सत्ता आणि सत्तेच्या वापराशी संबंधित विषयावरील वेगवेगळ्या पैलूंबद्दल सविस्तर चर्चा आहे. त्यात राज्यकर्त्याची, त्याच्या सहकार्यांयची व त्याच्या सल्लगारांची कर्तव्ये यांचा अंतर्भाव आहे, ’कूटनीती’ची कला यासारख्या गुंतागुंतीच्या विषायांवर, युद्ध लादणे व शत्रूने लादलेल्या युद्धाला तोंड देणे यातील नियमांवर, शांततेच्या काळात सत्तधार्यांाच्या कर्तव्यांबद्दल, कर व करवसूली, वाणिज्य, कायदा, नगरपालिकेशी संबधित प्रश्न, सामाजिक नियम व चालीरीती, कारागीरांचे काम, शेती, औषधोपचार व जनगणना अशा देशांतर्गत मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा आहे. 

एका बाजूला हा ग्रंथ चंद्रगुप्ताच्या सेनेबद्दलची सत्य परिस्थिती, संख्याबल, उपलब्ध हत्यारे वगैरेची माहिती पुरवतो. तर दुसर्याय बाजूला “केवळ सैन्याच्या संख्येला फारसे महत्व नसते, सैन्यात शिस्त व योग्य नेतृत्व असले पाहिजे. अन्यथा असे मोठे सैन्य एक ओझेच बनते” असाही सल्ला देतो!
 

कवी व तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अल्लामा इक्बाल यांच्याबद्दल लाहोर[२] शहराला खूप अभिमान आहे व हे शहर त्यांच्याबद्दल खूप गौरवोद्गार काढते, पण तक्षशिला विश्वविद्यालय लाहोरहून अधिक जुने व आपल्या काळात नावाजलेले असले तरी तिच्या या सुपुत्राबद्दल, चाणक्याबद्दल, ते विश्वविद्यालय एक चकार शब्दही काढत नाहीं. कांहीं काळापूर्वी त्याच्या नांवाने एक विश्वविद्यालय स्थापण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता पण राजकीय मतभेदांची दरी व नोकरशाहीच्या लाल फितीच्या अडथळ्यात अडकून तो प्रस्ताव आता अदृश्य झाला आहे. 

आज विच्छिन्न झालेले बौद्धविहार व एके काळच्या जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यालयाचे उद्ध्वस्त झालेले अवशेष हेच फक्त चाणक्याच्या अस्तित्वाबद्दलचे संदर्भ पाकिस्तानात उरले आहेत.

या बौद्धविहारांपैकी मोहरा मुराडू हे अद्याप एक जोमदार गांवाच्या रूपात शिल्लक आहे. पर्वतांनी व शेतांनी वेढलेल्या दोनशे कुटुंबांच्या या गांवात फळबागा व ऑलिव्ह शेतीही जोरात आहे. हे गांव कधी वसले याची कुणालाच नेमकी माहिती नसली तरी ते तिथल्या बौद्धविहारांइतकेच जुने अस्सावे असा इथल्या रहिवाशांचा समज आहे.

या गांवातील एकुलते एक खासगी विद्यालय (शाळा) अनीस उर् रहमान हा एक तरुण पदवीधर चालवितो. त्याला विद्यार्जनाचे जगातले सर्वात जुने व सर्वप्रथम केंद्र असलेल्या आपल्या गांवाचा अभिमान आहे. तो म्हणतो “मोहरा मुराडू हे एक ऐतिहासिक गांव आहे. ते नेहमीच विद्यार्जनाचे केंद्र होते व आजही एक सुशिक्षित लोकांचे गांव आहे. इथे कित्येक पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले (डॉक्टरेट) लोक आहेत व त्यातले कित्येक बाहेर देशात जाऊन त्यापुढील पातळीचे विद्यार्जन करीत आहेत.”

अनीस जी शाळा चालवितो-नांव आहे सर सईद आयडियल स्कूल-त्यातील एका भागाला त्याने आपल्या आजोबांचे-मास्टर अब्दुल रहमान यांचे-नांव दिले आहे. ते भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील अलिगड विश्वविद्यालयाच्या पहिल्या पदवीधारांपैकी एक होते.

चाणक्याचे नांव ठेवलेले ग्रंथालय दाखविताना अनीस पुढे म्हणाला, “मी चाणक्याबद्दल वाचले आहे आणि सारे जग ज्याचा सन्मान करते असा तत्वज्ञ आम्ही सार्याा जगाला दिलेला आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.”

आपल्या World Order या पुस्तकात हेन्री किसिंजर यांनी माक्यावेलीच्या ’द प्रिन्स’ या पुस्तकाच्या खूप आधी लिहिल्या गेलेल्या व “जबरदस्त ताकत हे राजकारणातील प्रभावी सत्य आहे” हे सांगणार्याग व त्या सत्याला प्रमाणित करणार्यात चाणक्याच्या ’अर्थशास्त्र’ या पुस्तकाचा ’अत्याधुनिक, अग्रगण्य’ या शब्दात गौरव केलेला आहे.

जरी सार्याव जगाने “तत्वज्ञ’ म्हणून चाणक्याची उच्च पातळी ओळखली असली तरी आपल्या चांगल्या लोकांची लायकी न ओळखता पाकिस्तानने ज्यांची ’कुचकामी’ म्हणून अवहेलना केली अशा लोकांच्या यादीत चाणक्य यांचेसुद्धा नांव घातले गेले आहे.

चाणक्याची अशी अवहेलना तो ब्राह्मणी मानसिकतेचे व हिंदू संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो या उघड कारणांसाठी करण्यात आलेली आहे. आपल्या (पाकिस्तानी) भूमीत जन्मलेल्या एका विद्याविभूषित तत्वज्ञाच्या उच्च पातळीचा साधा उल्लेखसुद्धा करण्याच्या सन्मानासाठीसुद्धा अपात्र ठरविण्यास केवळ हे कारण पुरेसे झाले आहे! यामुळेच त्याच्या नांवाचा एकही संदर्भ या देशात सापडत नाहीं. तर दुसर्यार बाजूला आपण अनेक इमारतींना व अनेक विश्वविद्यालयांच्या परिसरांना वेगवेगळ्या काळातील व वेगवेगळ्या शहरांतील शास्त्रज्ञांची व तत्वज्ञांची नांवे दिलेली आहेत.

या उपरोधाचे यथार्थ वर्णन ’द इंडस सागा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत श्री. ऐतजाज अहसान यांनी छान केलेले आहे. “आपल्या राष्ट्रीय पातळीवरील अस्मितेबाबत, स्वपरिचयाबद्दल नकारात्मक विचार करणार्या“ राष्ट्राला अतीशय दुर्दैवीच म्हणावे लागेल. पण जेंव्हां हे राष्ट्र आपल्या राष्ट्रीय पातळीवरील परिचयासाठी आपल्या भूमीबाहेरील (परदेशी) परिचय निवडते[३] तेंव्हां मात्र ते स्वत: एका प्रचारकी मनोवृत्तीचा व दंतकथांचा कैदी बनते. असा आहे आजचा पाकिस्तान. तो त्याच्या संस्थापकांच्या मनात होता तसा नाहीं आहे. राष्ट्रीय पातळीवरील परिचयाचा अभाव हाच पाकिस्तानच्या समस्यांच्या मुळाशी आहे.”

पाकिस्तानला जर आपल्या दुष्ट व फसव्या अशा राष्ट्रीय पातळीवरील परिचयाच्या संकटातून बाहेर पडायचे असेल तर त्याला त्याच्या हिंदू-बौद्ध इतिहासाला आपले मानावेच लागेल. चाणक्यासारख्या एकाद्या महत्वाच्या व्यक्तीला मान्यता देणे, आपला मानणे हा त्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग आहे.

[१] धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिचे नांव ती अफगाणिस्तानमधील आजच्या ’कंदाहार’ या शहराची असल्यामुळे पडले असे माझ्या वाचनात आले आहे. पण इथे झालेला ’गंधार’ राज्याचा महाभारताचे पहिल्या वेळचे कथनही इथेच केले गेल्याच्या उल्लेखानंतर कदाचित ती येथील रहिवासी असावी काय याचाही शोध या विषयातील तज्ञांनी करावा!. 
[२] अल्लामा इक्बाल सियालकोटला जन्मले असले व त्यांचे इंटर आर्टसपर्यंतचे शिक्षण जरी  तिथेच झाले असले तरी त्यांचे पुढील शिक्षण लाहोरला झाले व त्यांचे निधनही लाहोरलाच झाले. त्याखेरीज मुस्लिमांसाठी वेगळे राष्ट्र बनविण्ताचा प्रस्तावसुद्धा त्यांनी लाहोरलाच मांडला. मृत्यूनंतर त्यांचे दफनही लाहोरलाच झाले. मी चौकशी केल्यावर या लेखाच्या मूळ लेखकाने मला कळविले कीं त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नांवाचे बरेच रस्ते व बर्‍याच गल्ल्या लाहोर शहरात आहेत! भारतीयांना महत्वाची वाटेल अशी गोष्ट आहे कीं अल्लामा इक्बाल यांनीच "सारे जहाँसे अच्छा" हे गीत लिहिले आहे. 
[३] हे वाक्य बहुदा झिया उल् हक यांच्या कारकीर्दीत स्वत:चे मूळ अरबी असल्याचे प्रचाराबद्दल पाकिस्तानने मानावे या प्रयत्नाबद्दल असावे.