रघुवीरांची जादू बँकॉकवरही!

अर्पिता कुलकर्णी
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

बँकॉकमध्ये एक आगळंवेगळं मनोरंजन घेऊन, आबालवृद्ध सगळ्यांना जादूईनगरीत घेऊन जाण्यासाठी खास पुण्याहून जादुगार आले. एक नव्हे, दोन नव्हे तर संपूर्ण जादुगार कुटुंब!

1989मध्ये सुरू झालेलं महाराष्ट्र मंडळ 28 वर्षे बँकॉकमध्ये कार्यरत आहे. घरापासून लांब असलेली कित्येक कुटुंब या मंडळामुळे आपल्या मराठी मुळांशी अजूनही जोडलेली आहेत. महाराष्ट्र मंडळातर्फे दरवर्षी चार मुख्य कार्यक्रम साजरे केले जातात. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात सहल, मे महिन्यात महाराष्ट्र दिन, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास दिवाळी!         

यावर्षीचा दिवाळीचा कार्यक्रम 5 नोव्हेंबर 2017 रोजी अवनी एट्रीयमच्या बॉलरूममध्ये साजरा झाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा कुठला कार्यक्रम निवडावा असा विचार करत असतानाच 10 वर्षांपूर्वी झालेल्या जादुच्या कार्यक्रमाची आठवण आली. मग या दिवाळीला जादूच्या प्रयोगांचा कार्यक्रम करायचं ठरलं. जादु म्हणली, की गेली 60-70 वर्ष मराठी माणसाच्या मनात एकच नाव येतं, ते म्हणजे....जादुगार रघुवीर!    

बँकॉकमध्ये एक आगळंवेगळं मनोरंजन घेऊन, आबालवृद्ध सगळ्यांना जादूईनगरीत घेऊन जाण्यासाठी खास पुण्याहून जादुगार आले. एक नव्हे, दोन नव्हे तर संपूर्ण जादुगार कुटुंब! रघुवीर कुटुंबीयांनी अत्यंत सुसंचालित टिमवर्कचं एक उत्तम उदाहरण दिलं. भारताबाहेर कित्येक दौरे करणारं हे कुटुंब जादूचे संच जोडण्यापासून ते प्रत्यक्ष कार्यक्रमात जादू दाखवण्यापर्यंत सगळी कामं वाटून करतात. बँकॉकमध्ये जादुगार विजय रघुवीर, जादुगार जितेंद्र रघुवीर यांना कार्यक्रमात अत्यंत कार्यक्षमतेने साथ दिली ती, ज्योती रघुवीर, ईशान रघुवीर, तेजा आणि इरा यांनी. 

सायंकाळी 5 ते 8 यावेळात सादर झालेल्या जादूच्या प्रयोगात सुरूवातीला साधारण एक तास जादुगार विजय रघुवीर यांनी मुलांसाठी जादूची कार्यशाळा घेतली. त्यांनी पत्त्यांच्या जादूपासून रंग बदलणारी पिसं, क्षणात काठीसारखी कडक होणारी दोरी, गायब होणाऱ्या सोंगट्या अशा कित्येक जादू मुलांना शिकवल्या आणि मुलांनी त्या स्वतः करूनही दाखवल्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीच्या पाच मिनिटातच रघुवीरांनी लहान मुलांचे मन जिंकले, त्यामुळे पुढचा सगळा कार्यक्रम मुलांनी मनापासून एंजॉय केला. 

जितेंद्र रघुवीर यांनी सलमान खानच्या पोस्टरमधून त्याचा शर्ट गायब करून दाखवला आणि कार्यक्रमाची सुरूवात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात केली. सुरूवातीला एका  सिलींडरमधून विविध वस्तू काढणे, मासिकात पाणी ओतून ते परत ग्लासमध्ये काढून दाखवणे असे हातचलाखीचे नमुने सादर केले. मग आफ्रिकन वुड, डॉल हाऊस, नेत्रशक्ती, सुपर लेविटेश, हॉन्टेड हाऊस, स्वोर्ड इन द नेक अशा अनेक जादू सादर केल्या. कित्येक प्रयोगांमध्ये प्रेक्षकांना सहभागी करून घेत हिऱ्याची अंगठी, 100 बाटची नोट गायब करून पुन्हा वेगळ्याच जागी शोधून दाखवली. पण, विशेष लक्षात राहिलेले दोन प्रयोग म्हणजे आर्म इल्युजन आणि जॉमेट्रीकली इम्पॉसिबल ट्युबझॅक!

पहिल्या प्रयोगात दोघा पिता-पुत्रांनी मिळून जितेंद्र रघुवीरांच्या हाताचा मधला एक भाग गायब केला. विशेष म्हणजे हाताचा मधला तुकडा गायब झाला तरी हाताचा पंजा मात्र हालत होता. तसेच जॉमेट्रीकली इम्पॉसिबल ट्युबझॅक या जादूमध्ये सौ. ज्योती रघुवीर एका छोट्या कपाटात बसल्या आणि मग जादूगार जोडीने त्या कपाटाचे वेगवेगळे भाग बाहेर काढून अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यासमोर ज्योती रघुवीरांना गायब केलं आणि परतही आणलं. अशाप्रकारे लहान-मोठ्या अशा वीस अतर्क्य करामती दाखवून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. 

रघुवीर कुटुंबीय गेली कित्येक दशकं जादूचे प्रयोग सादर करत असले तरी प्रत्येक पिढीत त्यांनी काळानुसार नवनवे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रयोग सामील केले आहेत हे प्रकर्षाने जाणवलं. प्रेक्षकात बसलेल्या कित्येकांनी आपापल्या लहानपणी विजय रघुवीर किंवा प्रत्यक्ष जादूगार रघुवीरांचे कार्यक्रम पाहिले होते. त्यामुळे आमच्यासाठी या कार्यक्रमाला एक 'नॉस्टेल्जिक व्हॅल्यू' होती. यु-ट्यूबवर वाढलेल्या आजच्या लहान मुलांना आजकाल कशाचंच नावीन्य राहिलेलं नाही. आंतरराष्ट्रीय जादूगारांच्या कित्येक करामती त्यांनी ऑनलाईन पाहिलेल्या आहेत. पण जेव्हा आजच्या पिढीची ही 'वेल इन्फोर्मड्' मुलं जेव्हा दोन तास एका जागी बसून हे प्रयोग प्रत्यक्ष स्टेजवर पहात होती, तेव्हाच खरेतर यशाची पावती मिळाली. पुढे जाऊन विजय रघुवीरांच्या कार्यशाळेत शिकलेल्या ट्रिक्स जेव्हा हे छोटे जादूगार 'हॅरी पॉटर'च्या जोशात आजही घरी करून दाखवतात तेव्हा जाणवतं की जादूगारांच्या जादूचा अंमल अजून उतरलेला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news Raghuveer's Magic show in Bangkok