esakal | देशोदेशीचे टिफिन

बोलून बातमी शोधा

देशोदेशीचे टिफिन
देशोदेशीचे टिफिन
sakal_logo
By
मृणाल तुळपुळे

प्रत्येक देशाची खाद्यसंस्कृती वेगळी असते. साहजिकच तिथल्या खाण्याच्या पद्धतीनुसारच टिफिनचं रंगरूपही ठरतं. एखाद्या देशात अपौष्टिक मानला जाणारा ब्रेडसारखा पदार्थ दुसऱ्या देशातला महत्त्वाचा खाद्यपदार्थ असू शकतो. देश कोणताही असो, जगाच्या पाठीवर बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला घरचं खाणं टिफिनच पुरवतो. तो टिफिन पौष्टिक असावा आणि आकर्षक असावा याचा अट्टाहास प्रत्येक देशात दिसतोच.

का माच्या निमित्तानं, शाळेच्या निमित्तानं किंवा प्रवासाच्या निमित्तानं बाहेर पडलं, की मधल्या वेळी खाण्याची गरज भासतेच. या वेळेत घरंच खाण्यासाठी लागतो टिफिन! टिफिनमधले पदार्थ बहुतेक वेळा घरी बनवलेले असतात. ते प्लॅस्टिक किंवा धातूच्या डब्यात, ॲल्युमिनिअम फॉइलमध्ये, कागदाच्या पिशवीत किंवा सिलोफिन बॅगमध्ये पॅक करून नेले जातात.

आपल्याकडे जशी कामासाठी धावपळ असते, तशीच परिस्थिती अख्ख्या जगाची. जगाच्या पाठीवरील बहुतेक सगळ्याच देशांत लोकांना कामाच्या ठिकाणी बराच वेळ घालवावा लागतो. मुलांचादेखील शाळेत खूप वेळ जातो, त्यामुळं ऑफिसचा आणि शाळेचा टिफिन ही एक अतिशय जरुरीची गोष्ट आहे. सकाळी घराबाहेर पडताना नेलेल्या टिफिनमधल्या जेवणाला घरच्या गरमागरम जेवणाची सर नक्कीच येत नाही; पण त्या पदार्थांत विविधता आणली किंवा ते पदार्थ आकर्षक रीतीने सजवले तर ते खाण्यास नक्कीच मजा येते.

टिफिनसाठी पदार्थ करताना त्यामागं घरच्या गृहिणीचे प्रेम तर असतेच; पण त्याबरोबर ते पदार्थ करताना त्यांचं योग्य नियोजन करून ते आरोग्यकारक, शरीराला ऊर्जा मिळेल, असे पोटभरीचे व खाण्यास सोपे असतील हे बघणं जरुरीचे असतं.

फिनलॅंडमधला टिफिन
आदर्श टिफिनचं उत्तम उदाहरण म्हणजे फिनलॅंडमधला टिफिन. त्यांच्या टिफिनमध्ये मटारचे सूप, मल्टिग्रेन्सचा बन, दोन प्रकारची सॅलड्‌स, पॅनकेक व त्याबरोबर बेरीज असे पदार्थ असतात. या पदार्थांत विविध रंग असल्यामुळे तो टिफिन आकर्षक तर दिसतोच; पण तो सर्व पोषणमूल्यांनी परिपूर्ण असा असतो. हिरव्या मटारच्या सूपमध्ये भाज्या व चिकनचे तुकडे असतात. लाल बीटच्या सॅलडमध्ये व केशरी गाजराच्या सॅलडमध्ये हर्ब्‌ज घातलेली असतात. ब्राउन बनमध्ये व पांढऱ्या पॅनकेकमध्ये तांदूळ, ओट्‌स, बार्ली अशी वेगवेगळी धान्यं असतात आणि तर त्याबरोबर खाण्यासाठी रंगीबेरंगी बेरीजही असतात.

नॉर्डिक देश
फिनलॅंडप्रमाणं नॉर्वे, स्वीडन, डेनमार्क या नॉर्डिक देशांत साधारणपणे याच धर्तीवर टिफिन भरला जातो. नैसर्गिक रंगांची फळे व भाज्या डोळ्याला तर आनंद देतातच; पण ती अतिशय आरोग्यदायीदेखील असतात. त्यामुळं या सगळ्या देशांत पदार्थांच्या सजावटीला व त्यांच्या रंगसंगतीला खूप महत्त्व दिलं जातं. तिथं बेरीजना ‘सुपर फूड’ म्हटलं जातं, त्यामुळं त्यांच्या टिफिनमध्ये या ना त्या प्रकारे बेरीज असतातच. या टिफिनमध्ये भाज्या व मीटचे बारीक तुकडे केलेले असतात. ते कापण्यास सुरीची गरज भासत नाही, त्यामुळे खाण्यास सोपं ठरतं.

डॅनिश ओपन सॅंडविच
याच नॉर्डिक देशांपैकी डेन्मार्कमधल्या जगप्रसिद्ध ‘डॅनिश ओपन सॅंडविच’ या पदार्थाचा उगम टिफिनमधून झाला, असं मानलं जातं. त्याबद्दल असं सांगतात, की पूर्वी शेतकऱ्यांना पहाटे उठून शेतावर जावं लागत असे. त्या वेळी ताजे पदार्थ करणं शक्‍य नसे. त्यामुळं ते आपल्या टिफिनमध्ये रायचा ब्रेड आणि त्याला लावायला एखादे स्प्रेड आणि जोडीला रात्रीच्या जेवणातले उरलेले सॅलड, मीट, बटाटे असे पदार्थ नेत असत. एकदा सगळे शेतकरी एकत्र जेवायला बसले असता त्यांच्यापैकी एकानं गप्पागोष्टी करताकरता आपल्या डब्यातले पदार्थ ब्रेडच्या स्लाइसवर नीट मांडून ठेवले. रात्रीच्या जेवणातल्या उरलेल्या पदार्थांनी नटवलेला तो ब्रेडचा स्लाइस खूपच छान दिसू लागला. ते छान सॅंडविच खाण्यासही चविष्ट लागत होतं. ते बघून इतर शेतकऱ्यांनी त्याचं अनुकरण केलं. अशा तऱ्हेनं शेतकऱ्याच्या ‘टिफिन ओपन सॅंडविच’ या कल्पनेनं मूळ धरलं व आज ती डेन्मार्कची खासियत झाली आहे.

कोरिया, जपान
टिफिनमधील पदार्थांच्या आकर्षक रंगसंगतीची कल्पना कोरिया, जपान या आशियाई देशांतदेखील अवलंबली जाते. असे रंगीबेरंगी पदार्थ नुसते बघूनच तोंडाला पाणी सुटतं. जपानमध्ये बेंटो संस्कृती हजारो वर्षं जुनी आहे. त्यापैकी जपानी मुलांचे शाळेत नेण्याचे ‘बेंटो टिफिन बॉक्‍स’ तर प्रसिद्धच आहे. पूर्वी जपानी लोक बांबूच्या डब्यात जेवण घेऊन जात असत. तो डबा व चॉपस्टिक्‍स एका कापडामध्ये बांधलेले असे. जेवणाच्या वेळी ते कापड डब्याखाली ठेवायला मॅट म्हणून व जेवण झाल्यावर हात पुसायला नॅपकिन म्हणून वापरलं जात होतं, असे संदर्भ आहेत. पारंपरिक बेंटो बॉक्‍समध्ये भात, मासे किंवा मीट, भाज्या व सॉस असे पदार्थ असतात.
कोरियन भाषेत टिफिन ज्याला ‘दोसिराक’ म्हटलं जाते, ते बेंटोच्या धर्तीवरच बनवलेले असतात. त्यातला मुख्य पदार्थ भात असतो व त्याच्याबरोबर खाण्यासाठी अनेक तोंडीलावणी असतात. कोरियन भाषेत बाप म्हणजे भात आणि बांचन म्हणजे तोंडीलावणी. टिफिन भरताना त्यात तळाशी भात पसरला जातो. त्यावर भाज्या व मीटपासून बनवलेली तोंडीलावणी, उकडलेले अंडे, तळलेले मासे असे पदार्थ रंगसंगती साधून अतिशय कलात्मकरीत्या ठेवले जातात. खाताना ही तोंडीलावणी भातात मिसळून खाल्ली जातात.

पूर्वीच्या काळी कोरियामध्ये धातूचे डबे वापरत असत. त्यात भातावर, अंडे, भाज्या, मीट व किमची असे मोजकेच पदार्थ ठेवले जात व तो डबा कापडात बांधला जाई. हा टिफिन खाण्याची अतिशय मजेदार पद्धत होती. कापडात बांधलेला टिफिन खूप हलवला जाई. हलवल्यामुळे आतले सगळे पदार्थ भातात छानपैकी मिसळले जात. नंतर टिफिन उघडून तो भात खाल्ला जाई. असे करण्यात मुलांना खूप मजा येते, त्यामुळं ते आपला टिफिन संपवतात.

फ्रान्स
फ्रान्समध्ये मुलांना टिफिन खाताना मजा यावी, यासाठी सॅंडविचबरोबर मटार, गाजर, टोमॅटो अशा रंगीत भाज्या व प्राण्याचे आकार दिलेली चीजची बिस्किटे दिली जातात. प्रत्येक देशाची खाद्यसंस्कृती वेगवेगळी असते. त्यानुसार तेथील टिफिनमधले पदार्थ बनवले जातात. देश कोणताही असला, टिफिनमधील पदार्थ कोणतेही असले तरी ते चविष्ट, पौष्टिक आणि मुलांच्या आवडीचे असेच असतात.

ब्राझील
आशियाई देशांप्रमाणेच ब्राझीलमध्येदेखील भात खूप प्रमाणात खाल्ला जातो. त्यांच्याकडे भात व बीन्स हा जेवणातला एक मुख्य पदार्थ आहे. त्याचे तिथं अनेक प्रकार बनवले जातात. त्यामुळं टिफिनमध्ये बीन्स घालून केलेला भात, सालसा (जरासा ओलसर असा भाज्या व मीटचा पदार्थ) व ब्रेड रोल असे पदार्थ असतात. हा टिफिन पोटभरीचा तर होतोच; पण बीन्स व मीटमधील प्रथिने, भाज्या व सॅलडमधील खनिजे आणि जीवनसत्त्वे, वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेला ब्रेड हे शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्‍त असतात.

इटली
इटलीच्या खाद्यसंस्कृतीमधला पास्ता हा मुख्य पदार्थ असल्यामुळं त्यांच्या टिफिनमध्ये पास्त्याचा एखादा पदार्थ असतोच. त्याबरोबर ऑलिव्हज व टोमॅटो घातलेले सॅलड, रोस्ट केलेले मीट अथवा फिश, ब्रेड व द्राक्षे, चेरीज, अंजीर अशी फळे असतात. बहुतेक सगळ्या इटालियन पदार्थांत चीज घातलेलं असतंच, त्याशिवाय टिफिनमध्येदेखील चीजचा एखादा स्लाइस दिला जातो. बहुतेक पाश्‍चात्त्य देशांत टिफिनमध्ये ब्रेडचे रोल, सॅंडविच, चीज, फळे, सूप असे पदार्थ दिले जातात. त्याच्याबरोबर चॉकलेट, मिंट अशा स्वादाच्या दुधाचे अथवा वेगवेगळ्या फळांच्या रसाचे टेट्रापॅक असतात. सॅंडविचमध्ये चीज, मीट, भाज्या असे पदार्थ घालून ते हेल्दी बनवले जातात.