esakal | ह्युस्टनवासीयांनी रंगविला 'जाणता राजा'चा अविस्मरणीय सोहळा 
sakal

बोलून बातमी शोधा

Janata-Raja

अमेरिकेतील टेक्‍सास राज्यात 'ह्युस्टन महाराष्ट्र मंडळा'च्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित 'जाणता राजा' या महानाट्याचे सातासमुद्रापलीकडे सादरीकरण झाले. सादरीकरण नव्हे, हा तर अविस्मरणीय सोहळाच! 

ह्युस्टनवासीयांनी रंगविला 'जाणता राजा'चा अविस्मरणीय सोहळा 

sakal_logo
By
नितु तारणेकर

आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जतन करावा असा गोड आणि आपण त्याचा भाग होतो असा हा एक अभिमानास्पद अनुभव! अमेरिकेतील टेक्‍सास राज्यात 'ह्युस्टन महाराष्ट्र मंडळा'च्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित 'जाणता राजा' या महानाट्याचे सातासमुद्रापलीकडे सादरीकरण झाले. सादरीकरण नव्हे, हा तर अविस्मरणीय सोहळाच! 

या महानाट्याच्या सादरीकरणाचा मुख्य उद्देश होता तो मराठी वास्तू निर्मितीसाठी निधी जमविण्याचा. त्याचे बीज सात-आठ महिन्यांपूर्वीच रोवण्यात आले. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या पूर्वानुभवावरून हा कार्यक्रम करणे अगदी अशक्‍य नसले, तरीही आव्हानात्मक नक्कीच होते. सादरीकरणाचे हक्क, दिग्दर्शकांची निवड, त्यांचा अमेरिकेचा व्हिसा आणि वास्तव्य अशा एक ना दोन अनेक अडथळ्यांना सामोरे जात अखेर 9 मार्च, 2019 ही सादरीकरणाची तारीख ठरली. 

या सर्व कार्यास लागणाऱ्या अनुभवाचा पाठिंबा आणि संमती संचालक मंडळाने दिली. महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा ज्योत्स्ना फडके या 24 जणांच्या कार्यकारिणीसह तयारीस लागल्या. नजरेत भरतील असे कार्यक्रमाचे सुंदर ग्राफिक्‍स आणि लोगो तयार करण्यापासून उत्तर अमेरिका बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांपर्यंत आमंत्रणे, नेपथ्यास मदत, कलाकारांचे खानपान, अगदी प्रत्यक्ष अभिनयापर्यंत 'कमी तिथे आम्ही' या न्यायाने या चमूने हातभार लावला. पण खरे आव्हान होते ते या महानाट्याच्या नियोजनाची धुरा सांभाळण्याची! राहुल देशमुख, अभिषेक भट व चैत्राली गोखले-थोटे या अनुभवी व्यक्तींनी हे आव्हान स्वीकारले आणि सोबतीला धावून आले ते शंभराहून अधिक कलाप्रेमी ह्युस्टनवासी.. 

अभिषेक जाधव आणि आनंदराव जावडेकर या भारतातून आलेल्या दोन कुशल दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सरावाचा प्रवास सुरू झाला. कधी रागवत तर कधी समजावत ते अभिनयाचे धडे देत होते. आपल्या दैनंदिन जीवनातून सवड काढत सुमारे दोन महिने दर शनिवार-रविवार तब्बल 12-12 तास, तर कधी कामावरून परतल्यानंतर कलाकारांनी सराव केला. काम, घर आणि सराव अशी तारेवरची कसरत करत, कधी आपल्या पिल्लांना सोबत घेत तर कधी घरी सोडत त्यांचा सराव चाले. 

कलाकारांचा सराव सुरू असतानाच समित गोखले यांनी रंगमंचावर सेट उभारण्याची जबाबदारी घेतली आणि त्याचे नियोजन केले. आशिष, अल्पेश, अतुल आणि इतरांच्या मदतीने 52 फूट बाय 21 फूट असा भव्य सेट त्यांनी अवघ्या पाच-सहा आठवड्यांमध्ये उभारला. कलाकारांचा सराव आणि सेटची तयारी सुरू असतानाच आनंददादा आणि अभिषेक यांनी महाराजांचे अतिशय सुंदर आणि कोरीव सिंहासन, पेटारे इत्यादी गोष्टी तयार केल्या. शिस्त आणि कामाचा दर्जा, ज्याला आपण 'क्वालिटी ऑफ वर्क' म्हणतो हे त्यांचे दैवत असावे. 

मोहनरावांनी सुंदर अशा तलवारी तयार केल्या. महाराष्ट्र मंडळाच्या फूड कमिटीने सदैव तत्पर राहून कार्य करण्याची शक्ती अगदी वक्तशीरपणे पुरविली. हे सगळे सुरू असतानाच माझे हात गुंतले होते ते घागरी, मशाली आणि भाते तयार करण्यात; तर राहुल देशमुख यांच्या डोक्‍यात जमा-खर्चाचा मेळ बसवत आकडेवारी झिम्मा-फुगडी घालत होती. सगळे कलाप्रेमी आपापल्या कामात व्यग्र होते. 

शेवटी तो दिवस उजाडला. सकाळी दहाच्या ठोक्‍याला कलाकार मंडळी स्टॅफर्ड सेंटरला जमू लागली. सगळ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे उधाण आले होते. रंगमंच सजवणे, ध्वज लावणे, फुलांच्या माळा करणे, अबदागिरी लावणे, कलाकारांची वेशभूषा, त्यांची रंगभूषा अशी एक ना दोन, अनेक कामे करण्यात शेकडो हात गुंतले होते. सगळीकडे लगीनघाई सुरू होती. कमी होती ती फक्त सनई चौघड्यांची.. 

रंगमंचावर पडद्यामागे मंदारदादा आणि वरदने नाटकाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचे दुकान मांडले होते. हो..हो.. दुकानच! अगदी आचमन पळी, तुळशी वृंदावन, झेंडे, तलवारी, पगड्या ते महाराजांच्या सिंहासनापर्यंत अंदाजे दोनशेहून अधिक वस्तू त्यांनी क्रमवार लावल्या होत्या. उद्देश एकच.. नाटकाला लागणारी प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळावी. 

नाटकाला अवघे दोन तास राहिले होते. कलाकार मंडळी तयारी करण्यात गुंतली होती. कुणी नऊवारी नेसत होते, तर कुणी अंगरखे, पगड्या चढवित होते. रंगभूषाकार सुंदर काम करत एक एक पात्र अक्षरश: जिवंत करत होते. तयार झालेला प्रत्येक जण स्वत:ला आरशात निहाळण्यात किंवा स्वत:चे फोटो काढण्यात मग्न होता. महिला मंडळाच्या नटण्याला तर उधाणच आले होते. किती दागिने घालू आणि किती नाही, याची जणू चढाओढच लागली होती. दुसरीकडे नाट्यगृहही प्रेक्षकांनी भरू लागले होते. मराठी, अमराठी इतकेच काय परप्रांतीय, परदेशी नागरिकांनीही नाटक बघायला हजेरी लावली होती. नाटकाच्या दहा मिनिटे आधी आई जगदंबेचे नामस्मरण करून आरती केली आणि ठीक चारच्या ठोक्‍याला पडदा उघडला. 

तुतारीचा नाद झाला आणि शाहीर फड रंगमंचावर आले. कलाकार मंडळी सुंदर अभिनय करत आपले कसब पणाला लावू लागली. अनेक पात्री अभिनय करणाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच! प्रत्येक पात्रासाठी लागणारी वेशभूषा आणि रंगभूषा करताना पडद्यामागे त्यांची पळापळ होत होती. पण रंगमंचावर येताच ते अगदी सफाईदारपणे आपापला अभिनय सादर करत होते. मराठी रयतेवर होणारा अन्याय काळीज पिळवटून टाकणारा होता. 

रयतेची दारूण अवस्था पाहिल्यावर शिवजन्म होताच प्रेक्षकवर्गाने टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. तसेच 'दार उघड, बये दार उघड'ला सेटवरील दार उघडताच शाबासकीची एक थाप सेटवाल्यांना देऊन गेली. मेघनाने यशस्वीपणे खंबीर आणि स्वाभिमानी जिजाऊ साकारल्या, तर निमिषनेही शिवाजी महाराज यांच्या भूमिकेला सार्थ अभिनय केला. महाराजांची करारी आणि बाणेदार वृत्ती त्याने रंगविली. दिंडी, लावणी, वासुदेव, गोंधळ, डोहाळे गाण, घागरी फुंकणे, कोळी नृत्य, कव्वाली असे पारंपरिक उत्सव रंगमंचावर सादर होत राहिले. रोहन, अवनीश, शौनक हे बालकलाकारही प्रेक्षकांच्या टाळ्या घेत होते. अनुकूल आणि त्याचे साथीदार रंगमंचावरील प्रकाश व्यवस्था चोखपणे सांभाळत एकएक दृष्य जिवंत करत होते. 

जिजाऊंची शिकवण, अफजलखानाचा वध, सिंहगडाची मोहीम, शाहिस्तेखानाचा पराभव अशा दृष्यांना शाहीर फडाने बांधून ठेवले. अतिशय तालबद्ध आणि लकबीच्या हालचालींनी ही मंडळी मनाला मोह घालत होती. संपूर्ण नाटकात कमीत कमी दोन तास रंगमंचावर राहून सतत कला सादर करणाऱ्या शाहीर फडाच्या एनर्जीला सलाम! 

नाटक बघण्यात मंत्रमुग्ध झाले असतानाच राज्याभिषेकाचा सोहळा कधी येऊन ठेपला, तेदेखील कळाले नाही. राज्याभिषेकाच्या सोहळ्यात पुन्हा एकदा भव्यतेची जाणीव झाली. शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातील राज्याभिषेकाचे 'जैसे थे' चित्र उभे करण्यात आले. नृत्यांगना नाचल्या, गागाभट्टांनी राज्याभिषेकाचे विधी केले, कवी भूषण यांनी स्तुतीसुमने अर्पिली, मोगल सरदारांनी महाराजांना मानाचे मुजरे घातले, तर ब्रिटिश सरकारनेही सलाम ठोकला.. भव्य-दिव्य राज्याभिषेकाचा सोहळा बघून प्रेक्षकांचे डोळे दिपले. सरते शेवटी जिजाऊंनी राजांची काढलेली दृष्ट पाहून डोळे पाणावले. सारे जड अंत:करणाने आणि आनंदाने भारावून गेले होते. शेवटी 'श्री शिव छत्रपती झाले हो..' हे मनात गुणगुणत टाळ्यांच्या कडकडाटात पडदा पडला.