पुन्हा एकदा 'गर्जा महाराष्ट्र माझा!'

SPM
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016

जगभर विखुरलेल्या मराठी माणसांचं मराठी भाषेवरचं, संस्कृतीवरचं प्रेम आता पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे आणि यावेळी निमित्त आहे लंडनमध्ये होणारा ‘गर्जा महाराष्ट्र माझा!‘ या भव्य कार्यक्रमाचं. इंग्लंडमध्ये, विशेषत: लंडनमध्ये मराठी कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आयटी किंवा वैद्यक क्षेत्राशी संबंधित अनेक तरुण या देशात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे लंडनमध्ये होणाऱ्या दर्जेदार मराठी कार्यक्रमांची समस्त मराठीजन अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. 

जगभर विखुरलेल्या मराठी माणसांचं मराठी भाषेवरचं, संस्कृतीवरचं प्रेम आता पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे आणि यावेळी निमित्त आहे लंडनमध्ये होणारा ‘गर्जा महाराष्ट्र माझा!‘ या भव्य कार्यक्रमाचं. इंग्लंडमध्ये, विशेषत: लंडनमध्ये मराठी कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आयटी किंवा वैद्यक क्षेत्राशी संबंधित अनेक तरुण या देशात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे लंडनमध्ये होणाऱ्या दर्जेदार मराठी कार्यक्रमांची समस्त मराठीजन अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. 

येत्या 22 मे रोजी 2 इंडिगो, ग्रीनिच येथे लंडननिवासी मराठीजन एकत्र जमणार आहेत.. निमित्त आहे ‘गर्जा महाराष्ट्र 2016!‘. लंडनस्थित हरहुन्नरी कलाकार डॉ. महेश पटवर्धन यांनी 2010 पासून ‘गर्जा महाराष्ट्र‘चा एक दर्जेदार ‘ब्रॅंड‘ बनविला आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, महेश मांजरेकर, अवधूत गुप्ते, अजय-अतुल, हरीहरन, सुरेश वाडकर, सचिन खेडेकर, स्वप्नील बांदोडकर, सोनाली कुलकर्णी यांसारख्या दिग्गजांनी ‘गर्जा महाराष्ट्र‘मध्ये उपस्थिती लावून रसिकांची मने जिंकली आहेत. 2012 चा ‘गर्जा महाराष्ट्र‘ हा कार्यक्रम अनूज बिडवे या पुण्याच्या विद्यार्थ्याच्या स्मरणार्थ बिडवे कुटुंबीयांनी आणि इतर आपत्तींमधील विद्यार्थ्यांसाठी केलेला कार्यक्रम लंडनवासियांच्याच नव्हे, तर भारतातील व जगभरातील सर्व मराठी माणसांच्या सदैव स्मरणात राहील, असाच होता. 

यंदा डॉ. महेश पटवर्धन यांनी नव्या जोमाने हा कार्यक्रम पुन्हा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये साथ मिळाली आहे ती ‘इंडियन्स मूव्ही फ्रेंड्‌स‘च्या प्रतिक शेलार आणि स्वप्नील कुलकर्णी या दोन उत्साही तरुणांची. प्रतिक आणि स्वप्नील हे दोघेही डॉ. पटवर्धन यांना या प्रकल्पात सर्वतोपरी मदत करत आहेत. या दिमाखदार सोहळ्याच्या आयोजनाची तयारी धडाक्‍यात सुरू आहे. ब्रिटनमधील सर्वांत भव्य मनोरंजनाचा हा कार्यक्रम 22 मे रोजी संपन्न होणार आहे. यंदाच्या कार्यक्रमाची दोन मुख्य वैशिष्ट्‌ये म्हणजे द्रष्टे राजकीय नेते शरद पवार यांची खास मुलाखत आणि क्रिकेट जगतातील एक बहारदार व्यक्तिमत्व दिलीप वेंगसरकर उर्फ ‘कर्नल‘ यांच्याशी दिलखुलास गप्पा..! 

साहित्य, संगीत आणि नृत्याची मेजवानी म्हणजे ‘गर्जा महाराष्ट्र माझा‘ असे समीकरणच आहे. उभ्या महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेल्या काही लाजवाब व्यक्तिरेखा आपल्यापुढे सादर होणार आहेत ‘व्यक्ती आणि वल्ली‘ या कार्यक्रमातून. महेश मांजरेकर, आनंद इंगळे, सुनील बर्वे, संदीप पाठक, भाऊ कदम अशा अनेक उत्तम कलाकारांचा सहभाग असलेलं हे नाटक ‘गर्जा..‘चे अजून एक वैशिष्ट्य! 

अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, महेश पटवर्धन आणि अजित परब आपल्या गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील, तर अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग आणि प्रार्थना बेहेरे आपल्या बहारदार नृत्याने तरुणाईला आकर्षित करतील. 

‘गर्जा महाराष्ट्र माझा‘मध्ये यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या झालेल्या प्रदीर्घ मुलाखती कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या. यावेळी ‘कर्नल दिलीप वेंगसरकर अनप्लग्ड‘ हा कार्यक्रमही विशेष उत्सुकता वाढविणारा ठरत आहे. 1970-80 चा काळ आपल्या बहारदार खेळाने संस्मरणीय करणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही क्रिकेटशी संबंधित राहिलेल्या पद्मश्री दिलीप वेंगसरकर यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा हे या सोहळ्याचे खास आकर्षण ठरेल. 

लंडनस्थित मराठीजनांच्या अत्यंत कुतुहलाचा भाग म्हणजे ‘शरद पवार : एक न कळलेलं व्यक्तिमत्व‘ हा कार्यक्रम. भारतात आणि भारताबाहेरही ज्या राष्ट्रीय मराठी नेत्याच्या प्रत्येक वक्तव्याबद्दल आणि कृतीबद्दल अपार कुतूहल असते, असे बुलंद राजकीय व्यक्तिमत्व शरद पवार यांची आगळीवेगळी मुलाखत ही कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू ठरेल, यात शंकाच नाही. 

मराठी मनाची, मराठी संस्कृतीची स्पंदने जपण्याचे काम महाराष्ट्राप्रमाणेच जगभर विखुरलेली मराठी माणसं अत्यंत मन:पूर्वक करत असतात. इंग्लंडमधील मराठीजनांची नाळ महाराष्ट्राशी जोडण्याचे काम ‘गर्जा महाराष्ट्र माझा‘ या कार्यक्रमाने सतत चालू ठेवले आहे. यंदा 22 मे रोजी ओ2, इंडिगो इथे दुपारी 1.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत हा सोहळा रंगणार असून त्यात सहभागी होण्यासाठी लंडनवासी मराठी अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Once again ' Maharashtra majha'

व्हिडीओ गॅलरी