esakal | आपण सारे आलो कोठून?
sakal

बोलून बातमी शोधा

Pailateer story non resident marathi community milind sathye article

मानवाची उत्क्रांती झाली कशी? मानव जन्माला आला कोठे आणि विस्तारला कसा? विज्ञानाची प्रगती होईल, तस तशी काही प्रश्नांची उत्तरे मिळताहेत. ऑस्ट्रेलियातील अबोरिजिनल (आदिमानव) समाजाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील 'ई सकाळ'चे वाचक कॅनबेरा विश्वविद्यालयातील प्रा. मिलिंद साठ्ये यांनी मानवी उत्क्रांती शोध घेण्याचा प्रयत्न केला...

आपण सारे आलो कोठून?

sakal_logo
By
मिलिंद साठ्ये

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील चार्ल्स डार्विन विद्यापीठाची एक प्राध्यापिका ऑस्ट्रेलियन आदिमानव [अबोरिजिनल] समाजातील एका काळ्याकभिन्न व्यक्ती सोबत मला भेटली. भ्रमणध्वनीचा वापर करून वित्तीय व्यवहार करणे या समाजाला शक्य होईल का या विषयाबाबत आमची चर्चा होती. सुमारे साठ हजार वर्षांपूर्वी हे लोक सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात आले, असे तिने बोलण्याच्या ओघात सांगितले. ब्रिटिश ऑस्ट्रेलियात सुमारे २५० वर्षापूर्वी आले. हजारो वर्षे अबोरिजिनल समाजाचा जगाशी संपर्कच नव्हता. ते येथे ६०,००० वर्षांपूर्वी आले हे ऐकून भारतीय भारतात, युरोपियन यूरोपात वगैरे कधी व कोठून आले या विषयी कुतूहल जागृत झाले आणि मानवी स्थलांतराबाबतचे संदर्भ मी धुंडाळले. पण त्याआधी या समाजाचा पूर्वकाळ आणि सद्यस्थिती थोडक्यात बघूया.

मॅकइंटिअर यांच्या ऑस्ट्रेलियाचा संक्षिप्त इतिहास या पुस्तकानुसार ब्रिटिश लोकांनी या समाजाला फार वाईट वागणूक दिली. बहुतेकांना ठार मारण्यात आले. अबोरिजिनल हेरिटेज कार्यालयाच्या इतिहासानुसार हे मानव नसून कांगारू, किंवा डिंगो (कुत्र्यासारखे प्राणी) आहेत, त्यांची हत्या करणे गैर नाही, अशी मल्लिनाथी गेली केली. मिशनरी लोकांनी त्यांची मुले पळवली. आई-वडीलापासून ताटातूट झालेल्या (stolen generation) लेकरांची ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी २००८ मध्ये संसदेत माफी मागितली. ख्रिस्ती मिशनऱ्याबद्दल व एकूणच गोऱ्या लोकांबद्दल हा समाज चांगले बोलत नाही. गोऱ्या लोकांतही अबोरिजिनल समाजाबद्दल अढी दिसून येते.

ब्रिटिशांनी अवघ्या शंभर दोनशे वर्षांत ऑस्ट्रेलिया जगातील अतिश्रीमंत राष्ट्र केले खरे, पण सुमारे नऊ लाख (सुमारे ३ टक्के) लोकसंख्येचा हा समाज बव्हंशी दुर्लक्षित राहिला आणि सामाजिक सुरक्षा भत्त्यामध्ये गुजराण करतो आहे.

Human Genome प्रकल्प व इतर काही संदर्भानुसार मानवी स्थलांतराबाबत जे आडाखे वैज्ञानिक बांधत आले होते त्यात डीएनए पद्धत अवगत झाल्याने १९८० च्या सुमारास आमूलाग्र बदल झाला. निअँडर्थल नावाचे आदिमानव आणि आधुनिक मानवाचे पूर्वज युरोप आणि पश्चिम आशियात एकाच काळी अस्तित्वात होते. त्यांचा पूर्वजही सात लाख वर्षांपूर्वी एकच होता. या डीएनए तर्काला अजून बळ मिळते ते इथिओपियात अलीकडेच सापडलेल्या दीड लाख वर्षांपूर्वीच्या मानवी कवट्यांमुळे. त्यामुळे मानववंशाची सुरुवात इथिओपियात झाली असावी, असे वैज्ञानिकांना वाटते. 

डीएनएचा अभ्यास करताना मिटोकाँड्रिअल (आईकडून येणाऱ्या) डीएनएचे विश्लेषण केले जाते. याच्या पाऊलखुणा कधीच पुसल्या जात नाहीत. म्हणजे या डीएनएची शिडी करून आपल्याला आपली मूळ आई कोण हे शोधता येईल. वैज्ञानिकांनी असा शोध घेतला तेव्हा सर्व मनुष्य प्राण्यांची एकच आई आढळून आली. आफ्रिकेत राहणाऱ्या या आदिमातेची मुले/नातवंडे बहुधा दुष्काळ पडल्याने अन्नाच्या शोधात इतरत्र मार्गस्थ झाली असावीत, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.

आम्ही म्हणतो ती 'ईव्ह' म्हणजे हीच आदिमाता असा एकच गलका ख्रिस्ती धर्मियांनी केला. परंतु त्यात काही तथ्य नाही. बायबलमधील अॅडम आणि ईव्ह ही ख्रिस्तपूर्व चार हजार वर्षांपूर्वी होती तर आदिमाता सात लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, असे प्रा. स्पेंसर वेल्स म्हणतात.

हे आदिमानव जत्थे आफ्रिकेतील घर सोडून निघाले. ते भारत, इंडोनेशिया, पापुआ नूगिनी मार्गे ऑस्ट्रेलियात पोहोचले. हे जत्थे ओळखता यावेत म्हणून संशोधकांनी त्यांना लेबले लावली आहेत. अबोरिजिनल जत्था 'म (एम)१६८' नावाने ओळखला जातो. 'म१३०' जत्था ५० हजार वर्षांपूर्वी भारत, इंडोनेशिया व नंतर ऑस्ट्रेलियात आला. ४५ हजार वर्षांपूर्वी म८९ मध्यपूर्वेत, ४० हजार वर्षांपूर्वी म९ मध्य आशियात, ३५ हजार वर्षांपूर्वी म४५ उत्तर आशियात, त्याच सुमारास म१७५ म्यानमार व चीनमध्ये, तीसहजारवर्षांपूर्वी म२० भारतात त्याच सुमारास म१७३ यूरोपात तर म१७२ दहा हजार वर्षपूर्वी मध्ययूरोपात पोहोचला.

दक्षिण भारतातील पिरमलाई कल्लर समाजाच्या लोकांचा डीएनए ऑस्ट्रेलियातील अबोरिजिनल लोकांशी मिळताजुळता आहे. या समाजातील लोक इतर भारतीयांपेक्षा अधिक काळे असतात. इकॉनॉमिस्ट, लंडनमध्ये २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, ख्रिस्तपूर्व २२१७ मध्ये, काही धाडसी दक्षिण भारतीय ऑस्ट्रेलियात आले आणि येथील अबोरिजिनलशी मिसळून गेले याचा सज्जड पुरावा मिळाला आहे. अलीकडेच तमिळनाडूमधील उत्खननात ७४,००० वर्षांपूर्वीची हत्यारे मिळाली. मजेची गोष्ट म्हणजे सगळे विश्व किंवा विश्व निर्माता म्हणजे 'ब्रह्म' आहे, असे आपण म्हणतो तर अबोरिजिनल लोकांमधेही याला 'बारामा' असे संबोधले जाते, असे मला एका अबोरिजिनल प्राध्यापकाने सांगितले. हे उच्चार आणि अर्थ साधर्म्य ऐकून मला आश्चर्य वाटले.

टोळ्या झाल्या की भांडणे आलीच. या मानवी टोळ्यांमध्येही भांडणे व्हायची. आपली टोळी विशाल व्हावी म्हणून आणि आपला वंश चालू राहण्यासाठी जेते अनेक मुले जन्माला घालायचे. प्रा. वेल्स, दाखला देतात चेंगीझखानचा. त्याच्या मोठ्या मुलाला एकूण ४० मुलगे होते तर त्याचाच नातू कुब्लाई खान हा दरवर्षी त्याच्या जनानखान्यात ३० नवीन कुमारिका दाखल करीत असे. त्याला २२ मुलगे होते. त्यामुळे ८ टक्के मंगोल लोकांचा (सुमारे १६० लाख) 'वाय' क्रोमोझोम एकसारखाच आहे.

वेगळ्याला मार्गाने आफ्रिकेतून बाहेर पडलेले जत्थे जगात सर्वत्र पोहोचले. कालांतराने हवामानानुसार त्यांच्यात शारीरिक बदल झाले असावेत जसे चपटे नाक आणि बारीक डोळे असलेले पुर्व आशियातील लोक किंवा गोरे युरोपियन.

एकदा अमेरिकेतील येल विद्यापीठातील एक बंगाली प्राध्यापक भेटले. त्यांच्या डीएनएचा माग टांझानियात लागला, असे त्यांनी सांगितले. कुतूहल म्हणून मीही विश्लेषण करून घेतले. माझ्या डीएनएचा माग सध्याच्या मॅसिडोनिया (ग्रीसचा शेजारी) मध्ये लागला तर माझ्या पत्नीचा स्कॉटलँडमध्ये सापडला. डीएनए विश्लेषण करणाऱ्या अनेक संस्था आहेत व त्याची किंमतही वाजवी झाली आहे. त्यामुळे आपण आलो कोठून याचा मागोवा घेणे सहज शक्य झाले आहे.

गंमत म्हणजे या आपल्या सर्वांच्या मातेचा म्हणजे आदिमातेचा डीएनए अंशरूपाने आपल्यापैकी प्रत्येक माणसात आजही विराजमान आहे. ही आदिमाता आफ्रिकेत होती आणि आपण सर्व तिचीच मुले आहोत. ती आफ्रिकन असल्याने ढुस्स काळी असावी.

आपण तिला आदि काली माता म्हणू शकतो! कलकत्याच्या काली मंदिरात काली माता सर्व मनुष्य प्राण्यात विराजमान आहे, असा देवी माहात्म्यामधील श्लोक आहे. डीएनएमुळे याला आता शास्त्राधारही मिळाला असे म्हणता येईल का? सर्वांची आदिमाता एकच असल्याने वसुधैव कुटुंबकंलाही पुष्टी मिळते का? भांडारकर संस्थेचे डॉ. रा. ना. दांडेकर यांच्या मते काली उपासना आदिवासींमध्ये वैदिक काळापूर्वी पासून होती. तंत्रविद्येमध्ये कालीपूजा हजारो वर्षांपासून आहे. ऋग्वेदातही कालीचा उल्लेख आहे. दक्षिणेत महाकाली किंवा चामुंडा नावाने ती ओळखली जाते. कालीमातेला बंगालमध्ये जगतजननी असे संबोधतात. तिच्या पूजनाची कल्पना या आदि कालीमातेची आठवण म्हणून तर सुचली नसेल? का मी बादरायणी संबंध जोडण्याची चूक करीत आहे? शिव, गणेश वगैरे देवांबाबत आख्यायिका आहेत तश्याच कालीच्या जन्माबद्दल आहेतच.

आपण पूजत असलेली काली मातेची कल्पना या आदि कालीमातेपासूनच मिळाली असा ठोस पुरावा मिळणे शक्य नाही हे तर उघडच आहे. पण तशी शक्यता नाकारता येईल का? काहीही असो परंतु या आदिमातेच्या शोधाने एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. आपल्यामध्ये काय भेद आहेत यावर लक्ष केंद्रित न करता, काय साम्य आहे यावर ते केंद्रित करायला हवे. यामुळे आपआपसातील हेवेदावे कमी होतील असे वाटते.