esakal | अमेरिकन डबा

बोलून बातमी शोधा

अमेरिकन डबा
अमेरिकन डबा
sakal_logo
By
पल्लवी महाजन (अमेरिका)

लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे, तो म्हणजे प्रत्येक स्त्रीला पडलेला रोजचा प्रश्न, उद्या डब्याला काय करू? वयाच्या तीन ते चारपासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत सगळ्यांना कधीतरी डबा न्यावाच लागतो.

अमेरिकेतही जरी राहावं लागलं, तरी डबा हा कामाला अथवा शाळेत न्यावा लागतो. अमेरिकेत साधारण २०-३५ वयोगटातील भारतीय व्यक्ती कामानिमित्त आलेल्या असतात. काही इकडेच स्थायिक होतात, तर काही थोड्या वर्षांसाठी इकडे राहतात. काही शिक्षणासाठी आलेले असतात, तर काही नोकरीनिमित्त. सगळ्याच स्त्रियांना इकडे काम करता येत नाही. काहींना मुलांमुळे तर बऱ्याच आयटी क्षेत्रातील लोकांच्या पत्नी या व्हिसाच्या मर्यादेमुळे काम करत नाहीत. त्यामुळे बऱ्याच स्त्रिया या घरी असतात. ज्या स्त्रिया घरी असतात त्यांना रोज डबा देणं शक्‍य होतं. इकडे आलेल्या भारतीयांमध्ये बरेच दक्षिण भारतीय लोक आढळतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या खाण्याच्या सवयींप्रमाणे डबा घेऊन जातात. इकडे विशेष म्हणजे भारताप्रमाणे घरकामाला मदत करायला कोणी बाई मिळणं अवघड असतं. त्यामुळे सगळं काम स्वतःच करावं लागतं. चिरलेल्या अथवा साफ केलेल्या भाज्या अथवा फ्रोझन भाज्या इकडे मिळतात. पीठसुद्धा तयार मिळतं, त्यामुळे अशी कामं वाचतात. डब्यात पोळीभाजी अथवा भात अथवा डोसा-इडली, सॅंडविच असे पदार्थ आपल्या संस्कृतीप्रमाणे भारतीयांच्या डब्यात दिसतात. जे नवरा-बायको दोघंही काम करतात त्यांना रात्रीचा डबा बनवून ठेवावा लागतो; अथवा बरेच काम करणारे लोक कामाच्या ठिकाणी कॅंटीनमध्ये खातात. अगदीच जिकडे खूप सारे भारतीय लोक आहेत, अशा ठिकाणी बऱ्याच गुजराती बायका घरी स्वयंपाकासाठी मिळतात. अलीकडेच माझ्या ओळखीच्या एका जोडप्याला कामानिमित्त रोज एक तास प्रवास करावा लागतो, या कारणामुळे स्वयंपाकासाठी त्यांनी एका गुजराती बाईची मदत घेतली आहे.

जे लोक अविवाहित म्हणून एकटे अथवा मित्रांसोबत राहतात, ते आळीपाळीने रोज रात्री जेवण बनवतात आणि ते रात्रीचं उरलेलं जेवण घेऊन येतात अथवा कामाच्या ठिकाणीच खातात. कामाच्या ठिकाणी भारतीय जेवण सहसाा मिळत नाही आणि शक्‍यतो सगळ्याच भागात पोळ्यांसाठी इकडे बाई मिळत नसल्यामुळे किंवा असेल तर सगळ्यांनाच परवडत नसते, त्यामुळे बऱ्याच वेळा लोक फ्रोझन पोळ्यांचा पर्याय निवडताना दिसतात किंवा त्याच्या बदली सहज मिळणारा ब्रेड अथवा टॉर्टिलाचा पर्याय प्रचलित आहे. फ्रोझन पदार्थ इकडे जास्त उपलब्ध असल्यामुळे त्याचा बराच वापर होताना दिसतो. काही भारतीय अविवाहित व्यक्ती या स्थायिक भारतीयांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहतात. त्यांना घराच्या भाड्यात एकवेळेसच जेवणपण मिळण्याची सोय असते.

जे लोक अमेरिकेत लहान गावात राहतात, त्यांना दुपारी रोज घरी जाणे शक्‍य असते, ते दुपारी जेवणाच्या वेळेस घरी जाऊन येतात. बऱ्याचदा लोक सॅलडला पसंती देतात. हलका फुलका आणि सहज प्रत्येक कामाच्या ठिकाणी उपलब्ध असलेला पौष्टिक आणि शाकाहारी सॅलडचा म्हणून पर्याय असतो. इकडे स्थायिक आणि नोकरीनिमित्त व्यस्त असलेले बरेच भारतीय आठवड्याचं जेवण एकदम बनवून फ्रोझन करतात आणि तेच डब्याला नेतात.

अनेकदा अमेरिकेत बरेच भारतीय असल्यामुळे ज्या स्त्रिया घरी आहेत आणि ज्यांना पाककलेची आवड आहे अथवा कुटुंबाला हातभार म्हणून अशा स्त्रिया भारतीयांना डबे पुरवतात. हा त्यांच्या घरगुती व्यवसायाचा एक मार्ग आहे. जसा भारतात डबा मिळतो, तसाच डबा इकडे मिळतो. या सर्वांसाठी थोडी शोधाशोध करावी लागते आणि डॉलर्स मोजावे लागतात एवढेच. काही स्त्रिया तर घरपोच डबे पुरवतात. इकडे गुजराती डबा, पंजाबी डबा आणि दक्षिण भारतीय डबे, मराठी जेवण व यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी डब्यांचे पर्याय पण उपलब्ध आहेत. ज्या लोकांना वेळ नाही किंवा स्वयंपाकाची आवड नाही, अशा लोकांसाठी हा डब्याचा पर्याय अगदी पूरक आहे. कारण, बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी मिळणारे पदार्थ हे एक आठवडा ठीक वाटतात; पण आपल्या लोकांना आपलं साधं जेवण हे कधीही आवडीचं असतं.

बऱ्याचदा ज्यांची मुलं जरा मोठी आहेत, अशा लोकांच्या डब्याला मुलांना जे डब्यात दिलं जाते तेच आणावं लागतं. भारतीय मुलांना इकडे विशेषतः सॅंडविच, पराठा, पास्ता, जॅम रोल, भात, नूडल्स असे पदार्थ दिले जातात. स्नॅक्‍सच्या वेळेस खाण्यासाठी एखादं फळ, बिस्किट्‌स, ड्रायफ्रूट्‌स इत्यादी पदार्थ असतात.
अमेरिकेत बहुतेक इतर देशांतील स्थलांतरित लोक आढळतात. मेक्‍सिको, चीन इत्यादी लोक आपल्या सवयीप्रमाणे डबा घेऊन येतात. मेक्‍सिकन लोकांच्या जेवणामध्ये भाताचा समावेश असतोच, त्यामुळे भारतीयांनाही हे जेवण रुचकर लागतं. बऱ्याचदा अमेरिकन लोक आपल्यासारखं जेवण आणत नाहीत. ते लोक न्याहारी व्यवस्थित प्रमाणात करतात. त्यामुळे जेवणासाठी एखादं फळ अथवा सॅलड हेच खातात. डबा सगळेच आणत नाहीत. अमेरिकेत काही लोक पौष्टिक खाण्याकडे भर देतात, तर काही लोक हे इतर काहीही खाणे पसंत करतात आणि बऱ्याचदा त्यांचं जेवण हे आधीच रात्री बनवलेलं असतं आणि बरेच अमेरिकन लोक हे दुपारी बर्गर, पिझ्झा, पास्ता, नूडल्स यामध्येही मांसाहारी जेवणाला पसंती देतात. कामाच्या आजूबाजूला बरेच खाण्याचे पर्याय असतात. त्यामुळे लोक बाहेर जाऊन खातात. इकडे लोक बऱ्याच जास्त प्रमाणात कॉफी पिताना दिसतात.

आणि एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये काही काही समारंभ असेल, तर पिझ्झा हा पर्याय सगळ्यात सोप्पा आणि आपण भारतीयांनीही त्याला अतिशय जवळच केलेलं असल्यामुळे सगळ्यांसाठी सोयीस्कर म्हणून दुपारच्या जेवणासाठी मागवला जातो.
थोडक्‍यात जसे भारतातही घरातील दोघेही कामावर जाणारे असतील, तर बाईची मदत घेऊन दुपारचा डबा बनवला जातो किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याइकडे बरेच पर्याय उपलब्ध असतात. घरी स्वतः बनवलेल्या डब्याचं प्रमाण भारतात जसं कमी झालंय तसं इकडे पण दिसत आहे. शेवटी भारतात काय अथवा परदेशात धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपण सोपे मार्ग शोधू पाहत आहोत. त्यामुळे यापुढे डबा संस्कृतीही संपुष्टात येईल काय? हाच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.