esakal | सर्वांसाठी संगणक शिक्षणाचा ध्यास

बोलून बातमी शोधा

सर्वांसाठी संगणक शिक्षणाचा ध्यास
सर्वांसाठी संगणक शिक्षणाचा ध्यास
sakal_logo
By
प्रताप रामगोंडा

शिरोळ तालुक्‍यातलं कवठेगुलंद माझं गाव तर टाकळी मामाचा गाव. सातारच्या सैनिकी शाळेत पाचवीपासून शिकायला जाण्याआधी मी गावातल्या प्राथमिक शाळेतच शिकलो. गावाशी संबंध सुटीपुरताच. त्यातही आजोळीच सुटीला दीर्घ मुक्काम असायचा. घरचे शैक्षणिक वातावरण यथातथाच. भाऊ आणि बहीण अशी भावंडं. त्यापैकी भावाने शिक्षण आटोपते घेऊन सैन्याची वाट धरली.

गणितात पदवीनंतर शिवाजी विद्यापीठात एमसीए केलं. आयुष्यात संगणकाशी जवळचा संबंध आला तो तेव्हा. त्यावेळी मला जाणवलं की आपल्यासारख्या पदवीधराचा संगणकाशी एवढाच संबंध असेल तर मग जगात आपला देश जगात किती मागास असेल. त्याचवेळी मनोमन ठरवलं सामान्यांना संगणक ज्ञान साध्या सोप्या पद्धतीने उपलब्ध द्यायला हवे. त्यासाठी काम करायला हवे. त्याच विषयावर मी विद्यापीठातच 'पीएचडी'साठी नोंदणी केली. 

घरचं बरं होतं त्यामुळे मौजमजेपुरता खर्च तेव्हाही मी करू शकत होतो. चवीचं खाणं हा माझा विक पॉईंट म्हटला तरी चालेल. त्यामुळे कुठं काय खायला मिळतं याचा माझा ज्ञानकोश पक्का होता. सांगली-कोल्हापुरातल्या खमंग भज्यापासून पुण्याच्या तुळशी बागेतील मिसळीपर्यंतचे सारे अड्डे मला ठाऊक आहेत. परदेशात जायचा निर्णय घेतला तेव्हा मला सर्वांत त्रासदायक काय वाटले असेल तर जिभेचे चोचले तिकडे कोण पुरवणार? करिअरची सुरवात पुण्यातल्या एका कंपनीत झाली. तीन वर्षांच्या नोकरीनतंर युरोप, इग्लंडमध्ये नोकरीसाठी फिरलो. आता सध्या अमेरिकेतील 'कॅप जेमिनी' या आंतरराष्ट्रीय कंपनीत टेक्‍निकल लिड म्हणून कार्यरत आहे. माझा कुटुंब कबिलाही सोबत आहे. इथे मी भारतीयांची हॉटेल्स शोधून काढली आहेत; मात्र आपल्या खाऊ गल्ल्यांची त्यांना सर नाही. 

युरोपमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मला पदोपदी आपल्याकडच्या आणि तिकडच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल सतत तुलना करायचा नादच लागला. पहिल्याच नोकरीत एक गोष्ट स्पष्ट जाणवली ती म्हणजे शिक्षण, संगणकीय साक्षरतेमुळे तिथे एक स्वंयशिस्त निर्माण झाली आहे. स्वच्छता, कायद्याचे, नियमांचे पालन या त्यांच्या सवयीचा भाग आहेत. त्याचाच अप्रत्यक्ष परिणाम माझ्या संशोधन विषयावरही झाला. सामान्यांसाठी संगणक शिक्षणासाठी मला जगभरातील तौलनिक अभ्यासाच्या संधी आपोआप उपलब्ध झाल्या. प्रत्येक बारा कोसाला बदलणारी भाषा, जात, धर्म, प्रांत अशी विविधता असलेल्या भारतातात संगणक प्रसारामुळे एक सूत्रता येऊ शकते. संगणक प्रशिक्षणाची भारतासाठीची एक शाश्‍वत प्रणाली विकसित करण्याचा माझा हा प्रयत्न अधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.