कौतुकास्पद ! पुण्याच्या जय ठाकूरचा अमेरिकेत डंका

jai Thakur
jai Thakur

गोखलेनगर (पुणे) : दृश्य माध्यमातील, The Aporia या  एका विशेष  कलाकृतीद्वारे, पुण्याच्या जय ठाकूर यांनी अतिशय लहान वयात, स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. पुष्कळशी लहान मुले केवळ एक वेळ घालवण्याचे साधन म्हणून कॉमिक्स आणि चित्रकथा वाचतात. पण, जय ठाकूर यांना त्या कॉमिक्स आणि चित्रकथांनी एका निराळ्या प्रकारे, लहान वयातच भुरळ घातली. एखादी गोष्ट प्रभावीपणे सांगण्यासाठी, दृश्य माध्यमाच्या ताकदीची  त्यांना जाण येऊ लागली. लवकरच, स्वतःच्या गोष्टी सांगण्याकरीता दृध्यमाध्यमाचा वापर ते करू लागले. 

पुण्याच्या MIT School of Design, आणि DSK International School of Design या संस्थांमधून Product Design मध्ये शिक्षण घेतल्यानंतर जय यांना, दृश्य माध्यमात विशेष प्राविण्य मिळवण्याचे वेध लागले. अमेरिकेतील लॉस अँजेल्सजवळ, पासाडीना येथील ArtCenter College of Design या संस्थेत त्यांनी चार वर्षांचा विशेष अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. पदवी परीक्षेसाठीचा प्रकल्प म्हणून त्यांनी The Aporia ही कलाकृती बनविली. ती कलाकृती पाहून, दृश्य माध्यम वापरण्याच्या त्यांच्या हातोटीची दखल घेत, Sony Pictures या जगप्रसिद्ध संस्थेने त्यांना तात्काळ आपल्या कंपनीत कामासाठी आमंत्रित केले यातच त्यांच्या कलेची पावती आहे. नुसते आमंत्रित केले इतकेच नव्हे तर, प्रसिद्ध चित्रपट 'Spiderman' च्या पुढच्या भागात, म्हणजे "Spiderman : Into the Spider-Verse" या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सहभागीही करून घेतले !   

The Aporia या कलाकृतीसाठी त्यांनी निवडलेला विषय जरासा 'हटके' असाच म्हणावा लागेल. ते सांगतात, "आज ज्या प्रकारे कैद्यांचे पुनर्वसन केले जाते त्यापेक्षा अधिक प्रभावीपणे ते करता आले पाहिजे या संकल्पनेवर आधारित ही कलाकृती आहे. एका वेगळ्या प्रकारच्या पुनर्वसन कार्यक्रमासाठी एका कैद्याची निवड होते. त्या नव्या उपचार पद्धतीची चाचणी स्वतःवर करून घेण्यासाठी तो संमतीही देतो. त्याला अभिप्रेत असलेल्या वास्तव जगाचा आभास निर्माण करून, त्या जगात राहण्यासाठी त्याची मानसिक तयारी करण्याचा हा कार्यक्रम असतो. त्याकरिता, त्याच्या मेंदूवर विशेष प्रक्रिया केल्या जातात. कोणत्याही घटनेचे कार्यकारण हेच मुळात आभासी असते. त्या घटनेचे परिणाम कोणावर कसे व्हावेत हे सर्वस्वी, त्या-त्या व्यक्तीच्या अपेक्षेवर अवलंबून असते, हाच या पुनर्वसन पद्धतीच्या संकल्पनेचा पाया आहे." 

गुन्हेगाराला कैदेत डांबण्याची प्रचलित पद्धत जय यांना अमानवी वाटते. आणि हीच त्यांच्या कलाकृतीमागची मुख्य प्रेरणा होती. त्याचप्रमाणे सहसंवेदनेलाही ते खूप महत्व देतात. त्यांच्या मते, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचे अनेक वेगवेगळे दृष्टीकोन असू शकतात. मोकळ्या मनाने, विविध दृष्टीकोनांमधून पाहण्याची तयारी मानवाने ठेवायला हवी. मिळून-मिसळून, एकोप्याने जगू इच्छिणाऱ्या मानवजातीसाठी हे अतिशय महत्वाचे आहे.

"Aporia  हे फुलपाखरांच्या एका प्रजातीचे नाव आहे. पण, 'अंतर्मनातील संघर्ष' असाही Aporia या शब्दाचा अर्थ आहे. मेंदूमधील रक्तवाहिन्यांच्या गुंतागुंतीचा फुलपाखरी आकार हे, या कैद्याच्या पुनर्वसनासाठी एक सुयोग्य प्रतीक ठरेल असे मला वाटले. पुनर्वसनानंतर कैद्याच्या स्वच्छंद फुलपाखरी अवस्थेचेही ते द्योतक आहे अशी त्या नावामागची माझी कल्पना होती."  जय ठाकूर आपल्या कलाकृतीबद्दल बोलताना म्हणतात.

जय ठाकूर यांनी अलीकडेच, पुण्याच्या MIT School of  Design मधील विद्यार्थ्यांना "The Aporia" या आपल्या कलाकृतीचा प्रवास उलगडून दाखवला, आणि त्यायोगे त्यांच्यासोबत संवाद साधला. दृश्य माध्यमाचा प्रभावी वापर, त्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी आणि कोणत्याही कलाकृतीसाठी कथावस्तूचे अनन्यसाधारण महत्व, यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

अमेरिकेतील Art Center College of Design या संस्थेत त्यांनी केलेले "The Aporia" चे सादरीकरण पाहिल्यानंतर अतिशय प्रभावित होऊन एका महिलेला अश्रू आवरता आले नव्हते. त्यांच्या कलाकृतीमधील मुख्य चित्र, आणि त्यामागचा उद्देश व मूळ संकल्पना जय यांनी समजावून सांगितल्यामुळेच, आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून आपल्याला सावरता आले अशी कृतज्ञतापूर्वक दाद त्या महिलेने जय यांना दिली. त्याप्रसंगी, Sony Pictures चे कला दिग्दर्शक  डीन गॉर्डन म्हणाले होते, "सशक्त कथावस्तू, त्यामागचा युक्तिवाद,व सर्जनशीलता या सर्वाची जोड असल्याने, जय ठाकूर कोणत्याही कलाकृतीच्या आराखड्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध करण्यास समर्थ आहेत. आपल्या जगाच्या मूलभूत संकल्पना व त्याची ऐतिहासिक बैठक, त्या जगात वावरणाऱ्या पात्रांच्या भाव-भावना आणि त्यांची जगण्यामागची प्रेरणा, यांच्याशी प्रत्येक कलाकृतीचा थेट संबंध असतो. हे सत्य जय यांना चांगले उमगलेले आहे.

एखादी गोष्ट प्रभावीपणे सांगण्याची प्रचंड ताकद दृश्य माध्यमात असते हे लहानपणापासून पाहिले-ऐकले होते. परंतु, स्वतःच्या कलाकृतीद्वारेच त्याचा प्रत्यय आल्यामुळे, आपल्या कलेवरची श्रद्धा आणि स्वतःचा आत्मविश्वास, दोन्हीही द्विगुणित झाल्याची भावना  जय ठाकूर यांनी व्यक्त केली. आपली कलाकृती लवकरच चित्रपटाच्या रूपात सादर करण्याचा आपला मानसही जय ठाकूर यांनी बोलून दाखवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com