इंग्रजांच्या भूमीत मराठीचा दरवळ

santosh dhaybar
santosh dhaybar

‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ या प्रख्यात संस्थेला ८५ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त लंडनमध्ये नुकतंच मराठी भाषकांचं संमेलन (एलएमएस) झालं. ब्रिटनच्या भूमीवर मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचं, जपण्याचं आणि वाढवण्याचं काम तिथलं महाराष्ट्र मंडळ अखंडपणानं करत आहे. या कार्याचा, संमेलनाचा प्रत्यक्ष भेटीवर आधारित वृत्तान्त.

‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ ही भारताबाहेरची नावाजलेली संस्था. या संस्थेची लंडनमध्ये स्वतःची इमारत आहे. जगभर पसरलेल्या महाराष्ट्र मंडळांपैकी स्वतःची इमारत असलेलं हे पहिलंच मंडळ. ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’नं यंदा ८५व्या वर्षात पदार्पण केलं. वर्धापन सोहळ्यानिमित्त अनेक कार्यक्रम मंडळानं घेतले. लंडन मराठी संमेलन (एलएमएस) हा त्याचाच भाग. ढोल-ताशांचा गजर, मराठी गाणी, ‘जय महाराष्ट्र’चा जयघोष, गणेशवंदना आणि पोवाड्यांमुळं ब्रिटनमधल्या वॉटफर्ड इथला ‘वॉटफर्ड कलोझियम थिएटर’चा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. लंडनच्या आसमंताला अस्सल ‘मऱ्हाटी रंग’ चढला.

पूर्व ब्रिटनच्या नौदलाचे प्रादेशिक कमांडर कमोडर डेव्हिड एलफोर्ड संमेलनाच्या उद्‌घाटन समारंभासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. एलफोर्ड यांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचा आदरानं उल्लेख करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गडगडाटासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. परदेशी भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामाचा होणारा गजर छाती अभिमानानं फुलवणारा होता. कार्यक्रमासाठी ‘पीएनजी ज्वेलर्स’चे सौरभ गाडगीळ, भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) अध्यक्ष हणमंत गायकवाड, अभिनेते मोहन आगाशे, सयाजी शिंदे, लेखिका मीना प्रभू, विजय कोलते, लेखक आणि मंडळाचे कार्यकर्ते केदार लेले यांच्यासह विविध क्षेत्रांतले मान्यवर उपस्थित होते. भाषणांना आणि मुलाखतींना लंडनमधल्या मराठीजनांनी मोठा प्रतिसाद दिला. त्याआधी ‘१ कॅनडा स्क्वेअर, कॅनरी वॉर्फ’ इथं ’एलएमएस’ची सुरवात ‘ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदे’नं झाली. परिषदेत दीडशेहून अधिक उद्योजक उपस्थित होते. दिलीप आमडेकर, मनोज कारखानीस आणि सुशील रापतवार यांनी या परिषदेचं सूत्रसंचालन केलं.

सांस्कृतिक कार्यक्रम
मुख्य कार्यक्रमातल्या सांस्कृतिक सत्रात अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिनं आपल्या नृत्यावर उपस्थितांना ठेका धरायला लावला. स्मिता साळुंके आणि मानसी महाजन यांनी ‘बाई वाड्यावर या...’ या लावणीवर बहारदार नृत्य सादर केलं. हृषिकेश रानडे, आर्या आंबेकर, नंदेश उमप यांनी एकाहून एक अशी दर्जदार गाणी सादर केली. योगेश जोशी यांनी पोवाडा सादर केला. लंडनवासीयांनी या कार्यक्रमांना मनापासून दाद देत थिएटरच्या मोकळ्या जागेत कार्यक्रमाचा आनंद लुटला. विशेष म्हणजे शब्द कळत नसूनही परदेशी महिलांनी सुरांवर उत्तम ठेका धरला होता. समीर चौघुले यांच्या ‘बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमानं उपस्थितांना पोट धरून हसवलं. अच्युत गोडबोले यांनी सादर केलेल्या ‘नादवेध’ कार्यक्रमानं उपस्थितांची मनं जिंकली. गाण्यांचा आनंद लुटताना रसिक ‘वन्स मोअर’चीही दाद देत होते.

‘बाराखडी’चं महत्त्व
नव्या पिढीला मराठी शिकवण्याचं महत्त्व एका छोट्या नाटिकेद्वारे दाखवण्यात आलं. भारतीय भाषा संघाचे दिलीप पेडणेकर, संतोष पारकर आणि पंकज अंधारे यांनी ही नाटिका सादर केली. या नाटिकेत लहान मुलांनी अगदी सहजपणे क, ख, ग, घ, न अशी सर्व बाराखडी व्यवस्थितपणे म्हणून दाखवली. लंडनस्थित उद्याची पिढी मराठी सफाईदारपणे बोलताना दिसत होती. इथं २०१२पासून मराठीचे धडे गिरवले जात असल्यानं ते चांगल्या प्रकारे मराठी बोलत असल्याचं जाणवलं. महाराष्ट्राशी त्यांची नाळ जोडण्याचं काम सध्याची पिढी करत आहे. मराठी, हिंदी मालिकाही इथं आवर्जू पाहत असल्याचं उपस्थित मुलांनी सांगितलं.

मराठी पदार्थांची मेजवानी
‘एलएमएस-२०१७’मध्ये ’फॅशन-शो’चंही आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये वीस स्थानिक मॉडेल्सनी भाग घेतला होता. डॉ. महादेव भिडे यांच्या प्रेरणेनं आणि प्रियांका कानविंदे, साईश शेटे, सौरभ वळसंकर यांच्या परिश्रमानं हा फॅशन शो पार पडला. महाराष्ट्र मंडळ लंडनच्या वर्धापनदिनानिमित्त तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर मराठी पदार्थांची मेजवानी होती. जेवणामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता.

एकी हेच बळ
मुलाखतीदरम्यान हणमंत गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेचे फायदे सांगितल्यानंतर लंडनवासीय मराठीजनांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचं आश्वासन दिलं. परदेशात राहून देशसेवा करण्याचं भाग्य लाभणार असल्याचं अनेकांनी सांगितलं. ‘‘भारतीयांनी एकत्र येऊन मोटारी, घर खरेदी करण्याबरोबरच विमा एकत्रितपणे उतरवल्यास सर्वांनाच मोठा फायदा होऊ शकेल. या फायद्यामधली काही रक्कम महाराष्ट्र मंडळाला दिल्यास मंडळही आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल,’’ अशी सूचना गायकवाड यांनी केली. ‘एकी हेच बळ’ या म्हणीचा अर्थ गायकवाड यांनी अशा पद्धतीनं समजावून सांगताच टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभिनेते मोहन आगाशे आणि सयाजी शिंदे यांच्याही मुलाखतींना उपस्थितांनी दाद दिली.

तीन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमांत मराठी भाषक मोठ्या उत्साहानं सहभागी झाल्याचं दिसलं. शिवाय प्रत्येक जण आपुलकीनं खारीचा वाटा उचलताना दिसला. महाराष्ट्र आणि मराठीसाठी जे काही शक्‍य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न जाणवत होता. कार्यक्रमादरम्यान ‘एलएमएस’च्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. यामध्ये विविध मान्यवरांचे लेख आहेत. ‘एलएमएस’चे संमेलन यशस्वी करण्यामागं अनेकांचं सहकार्य आणि हातभार लागल्याचं अध्यक्ष सुशील रापतवार यांनी सांगितलं. वैशाली मंत्री, अनिल नेने व गोविंद काणेगावकर यांनी सूत्रसंचालन केलं.

‘सकाळ’ व ‘ई-सकाळ’ला धन्यवाद
‘एलएमएस’चं वार्तांकन ‘ई-सकाळ’ व ‘सकाळ’च्या माध्यमातून प्रसिद्ध केल्याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरून ‘सकाळ माध्यम समूहा’चे आभार मानले. लंडनमध्ये राहून आम्हाला महाराष्ट्रासह इथल्या बातम्या सर्वप्रथम ‘ई-सकाळ’वरून वाचायला मिळत असल्याचं अनेकांनी आवर्जून सांगितलं. मोबाईलवर ‘सकाळ’चं ॲप डाउनलोड केल्याचं सांगत ‘ई-सकाळ’, ‘ई-पेपर’ व ॲपमुळं लंडनमध्ये राहूनही अगदी घराजवळच्या बातम्या मिळत असल्याचं अनेक जण सांगत होते. परदेशात स्थिरावलेल्या मराठी भाषकांचं ‘सकाळ’वरचं प्रेम या संमेलनाच्या निमित्तानं अनुभवायला मिळालं.

मराठी आवाज बुलंद करणारं मंडळ
‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ ही भारताबाहेरच्या सर्वांत जुन्या संस्थांपैकी एक सांस्कृतिक संस्था आहे. साहित्यिक न. चिं. केळकर १९३२मध्ये लंडनमध्ये गोलमेज परिषदेस उपस्थित राहिले असताना त्यांनी ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ची स्थापना केली. दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वी ही संस्था बरीच सक्रिय होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हे सर्व कार्यक्रम बंद पडले. १९५२मध्ये लंडनमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून बाळासाहेब खेर यांची नियुक्ती झाली आणि तेव्हापासून संस्था पुन्हा सक्रिय झाली. मराठी कुटुंबीय एकत्र यायला सुरवात झाली. त्यांनी मराठी संगीत मैफली, नाटकं, मराठी पाककृती, दिवाळीचा फराळ असे वेगवेगळे कार्यक्रम इथं आयोजित करायला सुरवात केली. १९८९मध्ये मंडळानं स्वतःची वास्तू घेतली. त्यानंतर संस्थेच्या कामाला आणखी वेग आला.
संस्थेचा सर्वांत महत्त्वाचा वार्षिक उपक्रम म्हणजे दहा दिवस होणारा ‘श्री गणेशोत्सव.’ या गणेशोत्सवादरम्यान अनेक मराठी कुटुंबं संस्थेला भेट देतात. संस्थेत बहुतांश कार्यक्रमांद्वारे मराठी संस्कृती जपण्यावर भर दिला जातो. संस्था खंबीरपणे मराठी परंपरा, मराठी चित्रपट, नाटकं आणि संगीतावरचं प्रेम व्यक्त करते. महाराष्ट्रातले सण-समारंभ इथं मोठ्या उत्साहानं साजरे केले जातात. सांस्कृतिक कार्यक्रमांचंही सतत आयोजन केलं जातं.

‘व्हॅल्युएबल टेक्‍नॉलॉजीज’चे संचालक संजय गायकवाड यांनी अमृतमहोत्सवानिमित्त संस्थेला ‘डिजिटल थिएटर’ भेट म्हणून दिलं. मराठी भाषकांचं असं पाठबळ संस्थेला आहे. मराठीच्या अस्मितेचा अभिमान जागवणाऱ्या या संस्थेनं दरवर्षीप्रमाणंच यंदाही दिवाळीनिमित्त कार्यक्रमांची आखणी केली आहे. सण-समारंभाच्या निमित्ताने संस्कृती टिकवून ठेवण्याची मंडळाची धडपड जागोजागी जाणवत राहते.

मंडळाची स्वतःची वास्तू
मंडळाची स्वतःची वास्तू झाल्यानंतर खास नाटक रंगभूमीला तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि सोयीस्कर असं स्टेज तयार करण्यात आलं. यामुळं नाट्यकलाकारांचा उत्साह द्विगुणित झाला. साधारण तीनशे आसनक्षमतेचं हे सभागृह आहे. व्यवसायानं आर्किटेक्‍ट, इंजिनिअर असलेले कलाकार स्वतः डिझाईन करून, लागणारी साधन-सामग्री आणून, स्वतः बनवून नाटकाचे सेट्‌स उभे करतात. महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं दर वर्षी एक तरी नाटक बसवलं जातंच. महाराष्ट्रात न जाता इथं राहूनही नाटकांची हौस भागवता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com