santosh dhaybar
santosh dhaybar

लंडनची वारी

अनेकांसाठी परदेशप्रवास कदाचित अप्रुपाचा नसेलही. कामानिमित्त किंवा पर्यटनाच्यानिमित्त परदेशात जाणे-येणे होत असेल. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असला, तरी प्रथमच प्रदेशात जाणाऱ्यांच्या मनात हुरहूर, कुतूहल असतेच. लंडन दौऱ्यादरम्यान आलेले अनुभव...

लंडनला जाण्याचे नक्की झाल्यानंतर इंटरनेटवरून तेथील माहिती गोळा करण्यास सुरवात केली. लंडन महाराष्ट्र मंडळाचे आमंत्रण असणारे पत्र व हॉटेलचे बुकिंग केल्याचे पत्र ईमेलवरून आले होते. खरे तर या दोन गोष्टी हातात आल्यानंतर आपण व्हिसासाठी अर्ज करू शकतो. मला तर या विषयी काहीच माहिती नव्हती. परंतु, इंटरनेटवरून माहिती गोळा करत गेलो आणि एका-एका गोष्टीचा उलगडा होत गेला.

व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर (युके व्हिसासाठी एजंट क्षमस्व) आणि पैसे दिल्यानंतर आपल्याला मुलाखतीची वेळ मिळते. कोणकोणती कागदपत्रे सोबत आणावीत याबद्दलची सर्व माहिती युके व्हिसाच्या संकेतस्थळावर आहे. मुलाखतीदरम्यान पासपोर्टसह सर्व कागदपत्रे आपल्याकडून जमा करून घेतली जातात. युके राजदूत अधिकाऱ्याच्या नावाने तयार केलेल्या विनंती अर्जामध्ये आपण कशासाठी व किती दिवसांसाठी दौरा करणार आहोत याविषयीचा स्पष्ट उल्लेख करावा. व्हिसा मुलाखतीनंतर पंधरा दिवसांमध्ये (कामकाजाचे दिवस) व्हिसा आपण दिलेल्या पत्त्यावर कुरिअरने येतो. व्हिसा हाती आल्यानंतर ऑनलाइन तिकीट बुकिंग करू शकतो. तिकीट मिळाल्यानंतर आपल्या दौऱ्याचा मार्ग मोकळा होतो.

पुणे ते लंडन असा माझा प्रवास होणार होता. पुण्यातून मोटारीने मुंबई विमानतळावर दाखल झालो. तिकिटावर कोणत्या गेटवरून प्रवेश करायचा याबद्दलचा उल्लेख होता. त्या गेटमधून आतमध्ये प्रवेश केला. कडक बंदोबस्त... संपूर्ण वातानुकूलित परिसर... प्रवाशांची लगबग... एक-एक काऊंटर पार करत गेलो. सर्व सोपस्कार पार केल्यानंतर विमान उड्डाणाच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोचलो. ठरलेल्या वेळात विमानाने भरारी घेतली आणि एक मोठी लढाई जिंकल्याचा आनंद झाला.

मुंबई ते लंडन प्रवास साडेनऊ तासांचा. लंडनच्या भूमीविषयी मनात अतिशय कुतूहल होते. लंडनमधील हिथ्रो विमानतळ जवळ आल्याची माहिती वैमानिकांनी दिल्यानंतर खिडकीतून बाहेरचा परिसर न्याहाळायला सुरवात केली. लंडनमध्ये विमान उतरणार तेव्हा वेळ होती सकाळी सातची. त्यामुळे विमानातून बाहेरचे सौंदर्य लक्ष वेधून घेत होते. डोळ्यांमध्ये जेवढे साठवून घेता येईल तेवढे साठवण्याचा प्रयत्न करत होतो. विमान उतरल्यानंतर परत एक-एक प्रक्रिया पार केल्यानंतर विमानतळाबाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला.

लंडनमधील गुलाबी थंडीने स्वागत केले होते. विमानतळावर मित्र केदार लेले व त्याची पत्नी नीलम आवर्जून उपस्थित होते. विमानतळावर वाय-फायची सुविधा उपलब्ध असल्यामुळे संपर्क साधणे अथवा माहिती मिळविणे सोपे जात होते. लंडनमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वांत प्रथम लक्ष वेधले ते स्वच्छता, हवामान, निसर्ग व शिस्तप्रिय वाहतुकीकडे. मोटारीमध्ये बसून बाहेरचा परिसर न्याहाळताना विशेष आनंद होत होता.

लंडनमधील हवामान
लंडनमध्ये सध्या उन्हाळा सुरू असला तर थंड वातावरण अनुभवायला मिळते. उन्हाळा असल्याने रात्री दहा वाजताही दिवस असल्याचे अनुभवता येते होते. लंडनमधील हवामान कधीही बदलू शकते ते तंतोतंत खरे आहे. उन्हाळ्यात थंडीबरोबरच पावसाचाही अनुभव येत होता. सर्वत्र हिरवळ, रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागांमध्ये असलेले मोठ-मोठे वृक्ष लक्ष वेधून घेत होते. शहराच्या विविध भागांमध्ये मोठ-मोठी उद्याने पाहायला मिळत होती. उद्यानांचा परिसर शेकडो एकर असल्याने नजर स्थिरावते तोपर्यंत हिरवागार गालिचा दिसतो.

घरांची रचना
लंडनमधील घरांची रचना एकसारखी आहे. एकाला एक जोडून अशी घरे आहेत. अतिशय सुटसुटीत व भव्य बंगलेही आढळले. घरांच्या बाहेरील मोकळ्या जागेतील हिरवळ डोळ्यांना आल्हाददायक वाटते. मोकळी जागा व सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पूर्णपणे काळजी घेतल्याचे दिसते. घरांच्या विटा सरकार पुरवत असल्यामुळे बांधकाम व प्रत्येक गोष्टीची रचना एकसारखी आहे. यामुळेच की काय प्रत्येक घर हे एका घराची कॉपी आहे की काय, असेच वाटते.

भव्य मॉल व दुकाने
शहराच्या विविध भागांमध्ये भव्य-दिव्य मॉल उभे राहिले आहेत. एका मॉलच्या छताखाली सर्वकाही मिळते. सीसीटीव्ही व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला दिसतो. शिवाय, सर्व व्यवहार ऑनलाइन असल्याने रोख रकमेचा वापर कमीत कमी होतो. रस्त्यांवरही ठिकठिकाणी दुकाने असून, दुकानांच्या पाट्या डोळ्यांना आल्हाददायक वाटतात. कोठेही भडकपणा नाही की ओबड-धोबडपणा नाही. कोठेही चित्र-विचित्र पाट्या, बॅनर, फ्लेक्‍स दिसत नाहीत. कोठेही पदपथावर अतिक्रमण झालेले दिसत नाही.

लंडनमधील वाहतूक
लंडनमधील वाहतूक किती शिस्तीची आहे हे जाणवते. ठिकठिकाणी सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेरे, पाट्या व वेगमर्यादेचे दर्शक आहेत. दिवस अथवा रात्रीची वेळ असली तरी सिग्नल कोणी मोडताना दिसत नाही. शिवाय, नियंत्रण रेषेच्या अलीकडेच मोटारी थांबतात व दोन मोटारींमधील अंतर पुरेसे असते. वाहतुकीचे नियम कठोर असल्यामुळे ते सहसा कोणी मोडत नाही. सर्वकाही ऑनलाइन असल्यामुळे नियंत्रित केलेले दिसते. कोणत्याही सिग्नलवर पोलिस दिसत नाहीत. वाहतुकीदरम्यान प्रथम पादचारी, सायकली व मोटारी असे प्राधान्य आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडायचा असल्यास त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेले बटण दाबल्यानंतर सिग्नल मिळतो, वाहने थांबतात व आपला जाण्याचा मार्ग मोकळा होतो. मोठ-मोठे व अतिशय स्वच्छ असे रस्ते अनुभवायला मिळतात. प्रदूषणविरहित व हॉर्नचा आवाजच नसल्यामुळे शहरातील प्रवास आल्हाददायक वाटतो. रस्त्यांवरून डबलडेकर धावताना दिसतात. रस्त्याच्या कडेला बस थांबा व रस्त्यावर बस थांब्यासाठी आखलेल्या पट्ट्यांमध्येच त्या थांबतात. प्रत्येक बस थांब्यावर बसचे वेळापत्रक व मार्गाचा नकाशा असतो.

स्वच्छ, देखणी व चकचकीत रेल्वेस्थानकेही लक्ष वेधून घेतात. वेगवान गाड्यांमधील वातानुकूलित देखणे डबे व डब्यांमधील डिजिटल फलकावरील माहिती उपयुक्त ठरते. शिवाय, डब्यांमध्ये मार्गावरील माहिती असल्यामुळे कोणाला काही विचारण्याची आवश्‍यकता लागत नाही. बस व रेल्वेसाठी दिवसभराचे तिकीट एकदा विकत घेतले, की दिवसभर कोणत्याही बस अथवा रेल्वेतून फिरता येते. रेल्वेतील सर्व डिजिटल व्यवस्था असल्यामुळे कार्ड स्वाईपवरच सर्व काही चालते.

गुगल मॅपचा वापर
लंडनमध्ये कोणतीही नवखी व्यक्ती प्रवास करू शकते. फक्त आवश्‍यकता आहे ती इंटरनेट व ऍण्ड्रॉईड मोबाईलची. गुगल मॅपचा वापर व शहरातील विविध नकाशे व दिशादर्शक बाणांमुळे कोणाला काही विचारण्याची आवश्‍यकता लागत नाही. यामुळे जगभरातील कोणतीही व्यक्ती एकटेपणाने प्रवास करू शकते. लंडनमध्ये प्रवास कसा करायचा ही भीती प्रवास करताना निघून जाते. शिवाय, "लंडन दर्शन'साठी हॉप-ऑन-हॉप-ऑफ नावाच्या बसेस फिरताना दिसतात. बसमध्ये गाइडच्या माध्यमातून माहिती मिळत असते. खुर्चीला हेडफोन लावल्यानंतर आपल्या भाषेत ही माहिती मिळते. एकूण 12 भाषांमध्ये ही माहिती मिळते, फक्त आपल्याला हवी असलेली भाषा निवडली की झाले. पासेसचे वेगवेगळे प्रकार आहेत. पास काढल्यानंतर कोठूनही कोठेही प्रवास करू शकतो. प्रवासादरम्यान उतरून एखादे ठिकाण पाहून आल्यानंतर दुसऱ्या बसमधून प्रवास करू शकतो. प्रत्येक 20 मिनिटाला ठरलेल्या मार्गावरून बस धावताना दिसतात. ठिकठिकाणी मोफत वाय-फाय उपलब्ध आहे. थोडक्‍यात, येथील प्रत्येकजण इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतो.

लंडनच्या भेटीत...
विंबल्डनच्या संग्रहालयात आंतरराष्ट्रीय लेखकांच्या पंक्तीत विराजमान झालेले, केदार लेले यांनी लिहिलेले "विंबल्डनच्या हिरवळीवरून' हे मराठीतील पुस्तक पाहिले. या संग्रहालयातील हे पहिले आणि एकमेव मराठी पुस्तक आहे. 128 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या विंबल्डनच्या संग्रहालयाने या ग्रंथाला मान्यता दिली आहे. आपल्या कामात असामान्य तर बरेच असतात, पण आपल्या देशाबाहेर राहून आपल्या माणसांसाठी आणि आपल्या भाषेसाठी राबणारी कलाप्रिय आणि माणूसप्रिय माणसे भेटणे तसे दुर्मिळच. म्हणूनच केदार लेले यांचे खूप कौतुक वाटले. येथील मराठी कुटुंबांमध्ये घरी असताना मराठी भाषा बोलली जाते. यामुळे नवी पिढीही मराठी चांगल्या प्रकारे बोलताना दिसते. अनेक लंडनस्थित मराठी नागरिकांशी संवाद साधता आला, यामुळे आपण पुण्यातच आहोत की काय, असेच काही काळ वाटत होते.

भिक्षेकऱ्यांची संख्या
सिग्नलच्या कडेला, पदपथावर भिक्षेकऱ्यांची गर्दी कोठेही दिसत नाही. शहरामध्ये बोटांवर मोजण्याएवढेच भिक्षेकरी आढळले. हे भिक्षेकरीसुद्धा आपली कला सादर करताना दिसतात. कोणी गाणे म्हणताना तर कोणी वाद्य वाजविताना दिसतात. आपली कला सादर करून ते पैसे मिळवतात. यामुळे त्यांना भिक्षेकरी म्हणणेही चुकीचे ठरेल. युके सरकार तेथील बेरोजगार युवकांना मानधन देत आहे. बेघर असणाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, अशी पाटीही पाहायला मिळाली. लंडनला जो कंटाळतो तो आयुष्याला कंटाळलेला आहे, असे समजावे. हे वाक्‍य खरेच आहे, हे येथे अनुभवायला मिळाले.

लंडनमधील जीवनशैली
लंडनमधील जीवनशैली ही उच्च दर्जाची समजली जाते. वयाच्या बाराव्या वर्षानंतर प्रत्येकजण स्वावलंबी होतो. बेकरीमधील बर्गर, पिझ्झासारख्या पदार्थांनी अनेकांचा "घेर' बदलला आहे. शिस्तप्रिय, कष्टाळू नागरिकही पाहायला मिळतात. यामुळेच की काय लंडन शहराने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे, असे वाटू लागते. शहरामध्ये मोठी महागाई असली तरी पर्यटकांची मोठी गर्दी दिसते. लंडनला पर्यटनाच्या माध्यमातून मोठा निधी मिळतो.

गड्या आपुला गाव बरा...
लंडनमध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. अनेकजण नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. अनेकांनी आपल्या आई-वडिलांना येथे आणले आहे. परंतु, सर्वांनाच येथे करमेल असेही नाही. खेडेगावात अथवा कट्ट्यावरून गप्पा मारणाऱ्यांची येथे कुचंबणा होताना दिसते. भारतीय संस्कृती सोडून येथे आलेल्यांना बांधून ठेवल्यासारखे होते. युकेने कितीही प्रगती केली असली तरी गड्या आपुला गाव बरा... असे भारतीय ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखविले.

थोडक्‍यात, प्रथम परदेशवारी करताना प्रत्येकाच्या मनात थोडीफारतरी धाकधूक असतेच. परंतु, मोबाईल आणि इंटरनेट सोबतीला असेल तर काहीही घाबरण्याचे कारण नाही. भाषेचा अडसर हा दुय्यम भाग आहे. त्यामुळे मोकळेपणाने आनंद घ्यावा.

(सौजन्यः सकाळ साप्ताहिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com