esakal | मी आणि युनिव्हर्सल मधली आजी

बोलून बातमी शोधा

मी आणि युनिव्हर्सल मधली आजी
मी आणि युनिव्हर्सल मधली आजी
sakal_logo
By
शंतनु जोशी, सिनसिनाटी, ओहायो, अमेरिका

युनिव्हर्सल मध्ये साधारण ऑक्टोबर 2011 पासून जायला लागलो.. त्याच्या आधी सोडेक्सओ कॅन्टीन मध्ये सँडविचेस करायचो.. टेबलं पुसायचो.. डेली (सँडविच स्टेशन) मद्धे मदत करायचो .. बरोबर अभ्यासाचे 4 विषय होते.. शिवाय पीटर (प्राध्यापक) साठी कामं करायचो..धावपळ चालू होती..

कंपनी मध्ये जायला सकाळची 7.15 ची बस.. त्या आधी उठून आवरून डबा भरून स्टॉपवर जावं लागे.. बस स्टॉप तसा 7-8 मिनिटावर... बस दररोज वेळेवर... बर्फात हाल होईचे.. थंडीत एकतर उठायला त्रास मग आवरून (कधी कधी अंघोळीची गोळी) थर्मल वेअर घालून पळापळ.... 7.15 ची बस डाउनटाउन ला जात असे.. पुढे 15-20 मिनिटं थंडीत कुडकुडत.. 7.55 ला कंपनीसाठी बस.. मोफत सेवा होती.. 8.30 ला कंपनीत... दुसऱ्या वर्षी हेच सगळं एक तास adhi म्हणजे 6.15 ची घरून बस, 7.30 ला ऑफीसात रुजू..

मला वाटतं एप्रिल महिना असेल 2012.. परीक्षा संपली होती.. आणि आता पूर्ण उन्हाळा जोरदार रिसर्च करायचा होता.. कॉलेजला सुट्टी.. रोज ऑफिसात... 7.30 ते 6.00.. दुपारी कधी कधी कंटाळा येत असे.. तेंव्हाच कळून चुकलं की ये अपने बस कि बात नही.. युनिव्हर्सलला तेंव्हा एक 65 ते 70 वर्षांची आजी जॉईन झाली.. तिचं नाव ऍन्टोनेट.. चेक रिपब्लिकची.. नावाचं स्पेलिंग विचाराल तर.. Antoinette.. आडनाव तर भारी एकदम 'चवताल'.. Chvatal... सोज्वळ चेहरा, हसतमुख, तिचं मन शांत असल्याचं चेहऱ्यावरून कळत असे..चेरुकी जीप चालवत असे..

महागप्पिष्ट.. मला आवडतंच बोलायला.. मग कसा वेळ जायचा कळायचं नाही.. एकटीच होती.. लग्न वगैरे भानगडीत पडली नाही.. 2 कुत्री आणि 2 मांजरांबरोबर राहायची.. सायमन आणि एफी (कुत्री), मॉली आणि किशा (मांजरी).. आमच्या घरी लहानपणापासूनच मांजरीआणि बोके! मीना आत्याकडून आणलेला पांढरा शुभ्र विठ्ठल  (बोका) आणि त्याची आई कोश्का अजून मनात घर करून  राहतात! मग माझ्याआणि आजीच्या गप्पा रंगायच्या.. एकीकडे कामही चालू होतं.. कधी कधी शेवटची बस चुकत असे..मग आजी जीप मधून घरी सोडायची... आजी सकाळी 6.15 ला ऑफीसात येत असे.. अर्धा जीव घरी.. सायमन जेवला असेल का, एफी सायमन वर दादागिरी करत नसेल ना, किशा दंगा तर करत नसेल..  

मॉली आजारी असायची तापाने... आजीचा मॉलीवर खूप जीव.... आजी खूप करायची मॉलीचा.. दर आठवड्यात 100 मैल गाडी चालवून कॉर्नेल विद्यापीठातील डॉक्टरांकडे घेऊन जाई.. सगळे प्रयत्न करत होई..  डॉक्टरांनी सांगितलं होतं की अजून जेमतेम 4-6 महिने.. नकळत डोळ्यातून पाणी येई.. माझ्यासाठीसुद्धा त्या कुत्री मांजरी नसून घरातील एक सदस्य झाल्या होत्या...

ऍन्टोनेटचा बॉस वेन.. खूप हुशार.. रसायन शात्रज्ञ होता.. कॉर्नेल मधून पदवी..आजी तंत्रज्ञ म्हणून काम करायची... वेन इतक्या सोप्प्या शब्दात आणि सहज गोष्टी समजवत असे की कधी अवघड वाटलंच नाही.. मला वाटतं मोठया माणसांचं असंच असतं , इतकं सोपं करून सांगतात की वाटतं आपल्याही जमेल .. मी आणि ऍन्टोनेट खूप शिकलो वेन कडून.. फेल्युअर कसा शोधायचं तिथपासून कशामुळे घडलं.. मुळापर्यंत जाऊन कसं शोधायचं... वेन तसा एकदम शिस्तबद्ध... पद्धतशीर रिपोर्ट.. वेळच्या वेळी कामं हातावेगळी...

माझा प्रोफेसर पण तसाच..पीटर... आधी डेन्मार्कच्या अणूऊर्जा कार्यक्रमात मग अमेरिकेच्या लेड-फ्री कार्यक्रमाचा जनक..(इलेक्ट्रॉनिक्स मधून लेड (शिसं) हद्दपार करण्याचा कार्यक्रम) मॅनहॅटन प्रोजेक्ट..आज जे काही काम करायला मिळतंय त्याचं संपूर्ण श्रेय प्रोफेसरला... (पुढच्या गोष्टीत तुमची यथायोग्य पीटरशी भेट घडवेन ...)

आजीचे वडील सुद्धा एकटे राहायचे... वय वर्ष 95.. सगळं आपलं आपण करायचे... आजी आठवड्यात एकदा चक्कर मारत असे.. तिनी बऱ्याच वेळा त्यांना घरी राहायला यायला सांगितलं पण ते कधी आले नाहीत... त्यांना स्वतंत्रच राहायचं होतं.. आजी च्या आजी - आजोबांनी तिला वाढवलं वयाच्या 11 वर्षांपासून... मला तिनी सांगितलेलं आठवतं.. तिची आई लवकर गेली.. वडील सावरलेच नाहीत अगदी मागच्या 10-15 वर्षांपर्यंत... स्वतःला तिनी  सायमन, एफी, मॉली आणि किशा मध्ये गुंतवून घेतलं होतं..

माझं युनिव्हर्सल मधलं काम संपायच्या साधारण दीड एक महिना आधी मॉली गेली.. खूप त्रास झाला.. आजीकडे तर बघवत नसे..आजी सुट्टी घेऊन मेन (Maine) राज्यात तिच्या मावशीकडे दोन आठवडे  गेली.. आल्यावर सुद्धा मलूल असायची.. महिना गेला ह्यात..

आजी दाखवत असे की ती बरी आहे.. सावरली आहे पण मला माहित होतं की तसं अजिबात नाहीये.. मॉली (अमेरिकन बॉबकॅट) साधारण 14 वर्ष आजी बरोबर.. आजीनं सांगितलेलं आठवतं, मॉली तिला रस्त्याच्या कडेला बेशुद्ध सापडली होती.. तेंव्हा 5-6 महिन्याची असेल.. तेंव्हापासून शेवटच्या दिवसापर्यंत आजीबरोबर.. ऍन्टोनेट ऑफिसला यायला निघाली की मॉली तिला पकडून ठेवत असे.. आजी रडत होती सांगताना... घर खायला उठलं होतं.. आजीनं नाव नोंदवलं होतं एक संस्थेत (प्राण्यांचं अनाथालय).. जर त्यांच्याकडे मांजर असेल तर ते आजीला फोन करणार होते..

मी युनिव्हर्सल सोडल्यावर साधारण दोन महिन्यात तिला फोन आला.. तिनी माझ्या मांजराचा म्हणून 'कोश्का' नाव ठेवलं.. मधून मधून गप्पा होतात फोन वर पण आई बाबा येऊन गेल्यापासून भेट नाही...  तिनं मला ग्रॅड्युएशनला  एक ग्रीटिंग कार्ड, 'थिंक लाईक अ फ्रिक' पुस्तक आणि खिडकीवर लावायला काचेचं पेंडन्ट दिलं.. म्हणाली त्याच्यातून सूर्यप्रकाश पडला की मी तुझा विचार करतीय असं समज...

प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी वेगळं द्यायची... एकदा आंब्याची चटणी, एकदा भटक्या कुत्र्यांना आपलंस करणाऱ्या संस्थेचा टीशर्ट, आयुर्वेदीक साबण अशा गोष्टी देत असे...कधी कधी डब्यात सफरचंद, पेर, पीच असं आणायची माझ्यासाठी... आजीमुळे असं कधी वाटलं नाही की खूप लांब जाऊन काम करतोय.. ती मला नेहमी 'आपलं माणूस' वाटे..