अनुभव सातासमुद्रापारचे... : छोट्या गावातील अस्वस्थ शांतता...

शशांक चिटणीस
Friday, 10 April 2020

कोरोनाबरोबरच आणखी एक संकट घोंघावते आहे.. आर्थिक मंदीचे. अमेरिकेतील चिक्टोवागा या छोट्या गावातील परिस्थिती टिपली आहे तेथील मदतकार्यात सक्रिय असलेले शशांक चिटणीस यांनी. 

न्यूयॉर्क शहरापासून जवळच पश्‍चिमेला असलेले चिक्टोवागा हे छोटेसे गाव. जगप्रसिद्ध नायगारा धबधब्यापासून केवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर... अतिशय समृद्ध निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शांतताप्रिय गावाची लोकसंख्या न्यूयॉर्कच्या लोकसंख्येच्या फक्त 1 टक्का आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर गावात एक अस्वस्थ शांतता पसरलेली आहे. सरकारने संशयित रुग्णांचे विलगीकरण सुरू केले आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. क्वारंटाइन झाल्यानंतर जीवनावश्‍यक वस्तू मिळतील की नाही, या भीतीने दुकानांमध्ये झुंबड उडाली. टॉयलेट टिश्‍यू पेपर, हॅंड सॅनिटायझर, थर्मामीटर, स्वच्छतेसाठीच्या वस्तूंचा साठा करून ठेवण्यासाठी धडपड सुरू झाली. दुकानांमध्ये या वस्तूंचा साठा कमी होऊ लागला, तशा दररोज काही तरी नवीन अटी लागू होऊ लागल्या. प्रतिव्यक्ती अमूक एवढ्याच वस्तू मिळणार, एका वेळी अमूक एवढ्याच ग्राहकांना दुकानात प्रवेश वगैरे... 

मी ज्या गावात राहतो, तेथे तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. आजूबाजूला वृद्धाश्रमही आहेत. तेथे कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांचे काटकोर पालन होताना दिसते. एक गोष्ट चांगली आहे की, आजारी किंवा वयोवृद्ध लोक रस्त्यावर किंवा दुकानांमध्ये दिसत नाहीत. स्वयंशिस्त आहे, सामाजिक अंतरही राखले जाते आहे. 
या आजारावर ना उपचार, ना लस... चाचणी किट्‌सची संख्याही मर्यादित. जर एखादा आजारी असेल तर त्याने प्रथम त्याच्या नेहमीच्या डॉक्‍टरांकडे जायचे, त्याने शिफारस केली तरच कोरोना चाचणी करून घ्यायची. सुरुवातीला फक्त 40 चाचणी किट होती. आमचे गाव छोटे आहे आणि त्यामुळे निधी, उपकरणे या गोष्टी येथे थोड्या उशिराच पोचतात... प्राधान्य असते मोठे शहर असलेल्या न्यूयॉर्कला... 

आणखी एक भीतीचे वादळ घोंघावतेय... ज्याचा सगळ्यांच्याच आयुष्यावर गंभीर परिणाम होणार आहे. ते म्हणजे लॉकडाउननंतर येऊ घातलेले आर्थिक संकट, मंदीचे सावट... त्यातून अनेकांना आताच नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. काही जणांकडे जेमतेम दोन महिने पोट भरेल, एवढेच पैसे आहेत. माझ्या एका मित्राची नोकरी गेली. त्याची पत्नी नोकरी करते, पण तिचा पगार जेमतेम आहे. पुढच्या महिन्याचे भाडे तरी भरता येईल की नाही, अशी त्यांना शंका आहे. दुसरी एक मैत्रीण या कोरोनाच्या भीतीने कामावर जायला घाबरत आहे. जवळ असलेल्या पैशात ती महिनाभर कशीतरी तग धरू शकेल. अशी अनेक प्रकरणे मला आजूबाजूला दिसत आहेत. अर्थात या काळ्याकुट्ट.. नकारात्मक वातावरणातही एक आशेचा किरण डोकावतो आहे.

गरीब, गरजूंसाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. मी गेली दहा वर्ष मील्स ऑन व्हिल्स या गरीब, गरजू तसेच ज्येष्ठांसाठी काम करणाऱया स्वयंसेवी संस्थेसाठी काम करतो. कोरोनाच्या प्रसारानंतरही या संस्थेचे काम थांबलेले नाही. सध्या आम्ही गरजू ज्येष्ठ नागरिकांना जेवण देत आहोत. शक्‍य असेल तोपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचा आमचा संकल्प आहे. मी वर उल्लेख केला, त्याप्रमाणे ज्या लोकांना घरभाडे भरणे शक्‍य नाही, तेथे घरमालकही त्यांच्या मागे तगादा लावताना दिसत नाहीत. अनेक जण गरजेच्या वस्तू स्थानिक उत्पादकांकडून खरेदी करत आहेत, जेणे करून त्या छोट्या व्यावसायिकांना हातभार लागेल. 

परिस्थिती बदलेल, या संकटातून आपण बाहेर पडू. या आपत्तीवर मात करत पुन्हा भरारी घेऊ. माणसातील चांगुलपणा, श्रद्धा आणि विश्‍वासच त्याला सर्व संकटांमध्ये तारून नेईल. 
(शब्दांकन - नयना निर्गुण) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shashank Chitnis write on condition cheektowaga village america