esakal | अबुधाबीत रंगला मराठी बांधवांचा एकपात्री नाट्यप्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

Solo drama performance in Abudhabi

नाटकावर प्रेम करणाऱ्या मराठी कलाकारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुबई, अबुधाबी, शारजा सारख्या शहरातून स्पर्धक मुस्साफ्फाला दाखल झाले आणि 22 नोव्हेंबरला शुक्रवारी संध्याकाळी ही स्पर्धा रंगली.

अबुधाबीत रंगला मराठी बांधवांचा एकपात्री नाट्यप्रयोग

sakal_logo
By
प्रशांत कुलकर्णी

अबुधाबी : मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याच्या मनातील नाटकाबद्दलचे प्रेम हे लपून राहत नाही. याच नाटकाच्या आवडीतून जेव्हा अबुधाबीतील मुस्साफ्फा स्थित "मृदगन्ध" या संस्थेतील काही नाट्यवेड्या मंडळींनी युएईतील पहिली-वहिली एक पात्री नाट्यस्पर्धा जाहीर केली तेव्हा त्याला नाटकावर प्रेम करणाऱ्या मराठी कलाकारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुबई, अबुधाबी, शारजा सारख्या शहरातून स्पर्धक मुस्साफ्फाला दाखल झाले आणि 22 नोव्हेंबरला शुक्रवारी संध्याकाळी ही स्पर्धा रंगली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या स्पर्धेत सायली पाटीलची ती फुलराणी पासून ते गजानन पाटील यांच्या तो मी नव्हेच, गौरी कुलकर्णीच्या ध्यानीमनी पासून ते पल्लवी कबाडे यांच्या वऱ्हाड निघालय लंडनला यातील विविध प्रकारचे प्रवेश सादर करण्यात तर आलेच पण रोहन गुप्ते यांचा पुलंचा नारायण, चिनार पाटील यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मधील शिवाजीराजांचे स्वगत, संतोष राक्षे यांनी सादर केलेला आधुनिक तळीराम, मृण्मयी गुप्तेची वैतागलेली पारू, गणेश उभे यांचा नटसम्राट आणि लहानग्या सानिया परांगे हिचा परीक्षा आणि विद्यार्थी वरील प्रवेश यांनी स्पर्धेत रंगत आणली. पल्लवी कबाडेनी पहिला क्रमांक, गौरी कुलकर्णी यांना दुसरे तर मृण्मयी गुप्ते यांना तिसरे पारितोषिक नटराजाची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. लहानग्या सानिया परांगे चा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रशांत कुलकर्णी आणि संजय चौलकर यांनी काम पाहिले.

रंगमंचावर दोन्ही बाजूंना महाराष्ट्रातील नामवंत एकपात्री कलाकारांची छायाचित्रे लावून एक प्रकारे त्यांच्या प्रति मानवंदना रुपी आदरांजली च व्यक्त करण्यात आली  होती.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे  संजय-मनीषा चौलकर, देवेंद्र-प्रेरणा भागवत,जयंत-मेघना पवार,प्रफुल सोमण यांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय होते.

आखाती वाळवंटात मराठी नाट्यकला जोपासण्याचे,तिचे संवर्धन करण्याचे, ती पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवण्याचे अथक प्रयत्न ही नाट्यवेडी  मंडळी  नियमीतपणे करीत आहेत. गरज आहे ती यांच्या प्रयत्नांना दाद देण्याची,त्यांना प्रतिसाद देण्याची आणि भरभक्कम पणे त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची. तरच या वाळवंटातील मृदगन्ध इथे येणाऱ्या पुढच्या पिढीला प्रेरणा देत राहील.