'सौदी अरेबियातून पुण्यात येणं नव्हतं सोपं,धीर खचत चालला होता'.....

चाकरमानाच्या मनात नोकरी करणे, सकाळी जाऊन पाट्या टाकून संध्याकाळी परत येणे ह्या शिवाय शक्यतो वेगळे काही मनात येणे अवघड.
'सौदी अरेबियातून पुण्यात येणं नव्हतं सोपं,धीर खचत चालला होता'.....

किरण आठवले :

चाकरमानाच्या मनात नोकरी करणे, सकाळी जाऊन पाट्या टाकून संध्याकाळी परत येणे ह्या शिवाय शक्यतो वेगळे काही मनात येणे अवघड. त्यातून सौदी अरेबिया.... निर्बंधात अडकलेला देश आणि त्यावर कोरोना, म्हणजे दुष्काळात तेरावा. मार्च २०२० पासून जगातल्या अनेक देशांचे चक्र उलटे सुलटे झाले. निर्बंध तर लागलेच पण बऱ्याच देशांचे आर्थिकी व्यवहार घसरणीच्या दिशेला वाटचाल करू लागले. देशात लॉकडाउन आणि बऱ्याच अटीतटीवर कामकाज चालू होते. सौदीमध्ये वातावरण वेगाने बदलत होते. लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंद्यावर गदा येत होती. सौदी अरेबियाच्या नाड्या सगळया ब्लॅक गोल्ड म्हणजेच OIL वर अवलंबून आहेत. सौदी मधली आणि इतर देशातली ऑइलची मागणी कमी होत गेली. पण रशिया आणि सौदीमध्ये शीत युद्धात OIL PRODUCTION कोणी कमी करण्यास तयार नव्हते. याचा परिणाम उत्पादन भरपूर आणि मागणी कमी असा झाला. (the journery during pandemic condition dubai to pune travel experience yst88)

प्रत्येक देशाची ऑइल साठवण्याची क्षमता आहे, त्याच्यावर कोणी खरेदी करायला नव्हते. या सर्व कालखंडात प्रमुख फटका बसला तो विमान कंपनी, पर्यटन आणि प्रवासी क्षेत्राला. प्रत्येक देशांनी आपली विमाने बंद केली. जणू काही प्रत्येक देश आयसोलेशनमध्ये गेला. काही कार्गो आणि मेडिकल सप्लाय विमाने चालू होती. भारतात तर असे ऐकायला येत होते की, पासपोर्टवाल्यांच्या चुकीमुळे रेशनकार्डवाल्यांना का भुर्दंड? चुकी कोणाचीही असू देत परिस्थिती अशी होती की, सर्वांना याचे मोल चुकवावे लागणार होते.

मे महिन्याच्या मध्यावर भारत सरकारनं "वंदे भारत" अभियानाची घोषणा केली. परदेशात अडकलेल्या भारतीय लोकांसाठी ही योजना आखली. प्रायोगिक तत्वावर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, यूरोप देशामधील काही प्रमुख शहरानं मधून ही विमाने दिल्ली, मुंबई अशा प्रमुख शहरात येत होती. इंडियन एम्बस्सीने एक फॉर्म दिला होता, त्यावर आपले डिटेल्स भरून रजिस्टर करायचे अशी नियमावली आखली. मग तुमच्या फॉर्मवरच्या क्रमानं आणि प्रायोरिटीनं एम्बसीची माणसे तुम्हांला फोन करून विमानाची माहिती देऊन तुमचे तिकीट काढण्याची प्रोसेस तुम्हाला सांगणार. तिकीट काढून मग तुम्ही भारतात येऊ शकणार.

सरकारची "वंदे भारत" योजना ही सौदी अरेबियात चालू झाली. सौदीमध्ये visit visa वर अडकलेली, नोकरी गेलेल्या माणसांना एक मार्ग मिळाला, त्याचा फायदा पण बरेच जणांनी घेतला आणि ही माणसे भारतात परतू लागली. सौदीमध्ये केरळा राज्यातील माणसे खूप आहेत. पण ह्याचा अर्थ असा नाही की बाकीच्या राज्यातील माणसे जी सौदी मध्ये आहेत त्यांना अडचणी नाहीत किंवा त्यांना भारतात जायचे नाही. सरकार जर दिवसातून जर ४ विमाने केरळासाठी लावत असेल तर निदान आठवड्यातून १ विमान इतर राज्यांसाठी लावावे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली साठी सौदी मधून पहिले विमान लागले. आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की, मुंबईसाठी पण एक विमान लावावे. पण पूर्ण जून महिना गेला तरी महाराष्ट्र राज्यासाठी एक सुद्धा विमान "वंदे भारत" अभियानात लावण्यात आले नाही.

सौदी अरेबिया महाराष्ट्र मित्र मंडळ खोबर दम्माम (SAMMMKD) दोन दशकांपासून काही लोकं एकत्र येऊन तयार झालेले मंडळ. वर्षभरातून ४-५ कार्यक्रम करायचे, मराठी लोकांच्या संपर्कात राहायचे आणि जमेल तशी त्यांना मदत करायची. सौदी मधल्या कायद्यामुळे सरकार दरबारी याची कुठेही नोंद करता येत नव्हती. पण ई-मेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जितक्या लोकांपर्यंत पोहोचता येत होते तेवढे आम्ही करायचा प्रयत्न करायचो. मंडळाच्या नियमित सभा, नवीन नाव नोंदणी, कार्यकारिणी नेमण्यासाठीचे मतदान, सभांमधल्या निर्णयाच्या नोंदी अशा घडामोडी होत असायच्या.

मार्च २२ पासून, जून महिन्या अखेरपर्यंत एक सुद्धा महाराष्ट राज्य साठी विमान नाही. अनेक लोकांना मायदेशी जायचे होते पण कसे. जर केरळा किंवा दुसऱ्या राज्यात गेलो तर परत महाराष्ट्र मध्ये कसे यायचे. मग विलगीकरण कुठे आणि किती दिवस होणार. विलगीकरण हे सरकारी असेल का स्व:खर्चानी, कोरोना ची चाचणी करावी लागेल पण ती कुठे, असे अनेक प्रश्न समोर येऊ लागले. तेंव्हाच अशा बातम्या येत होत्या की, काही कॉर्पोरेट्स आणि कंपन्या स्व:ताच्या खर्चाने खाजगी विमान लावत आहेत. जर एकाच कंपनी मधले १५०-२०० जण असतील तर कंपनी खाजगी विमान लावू शकते. आम्हाला २६ जून ला प्रकाशित झालेली महाराष्ट सरकारची नियमावली मिळाली, त्या प्रमाणे SOP फक्त कॉर्पोरेट्स आणि कंपन्या ह्या साठी बनवली आहे असे कळाले.

जुनच्या २९ तारखेला मंडळातील लोकांनी एक मीटिंग घेतली. आता जर सरकार विमान लावत नसेल तर आपण आपलेच विमान लावायचे का? ह्या प्रश्नावर उहापोह करायचा होता. सर्व मतांनी असे ठरवण्यात आले की, आपण महाराष्ट मंडळाचे विमान लावू. विमान कंपनीचे quotation, कुठली तारीख उड्डाण साठी ठरवायची advertising, तिकीट किती लावायचे, पैसे कसे जमा करायचे... असे अनेक प्रश्न समोर येऊन उभे राहिले. पण यातला सर्वात महत्वाचा अडथळा होता ती म्हणजे राज्य सरकारची नियमावली. खरे बघायला गेलो तर आम्ही १२ गावची १२ जणे गाव गोळा करून विमानातल्या खुर्चा भरणार होतो. सरकारच्या नियमात असे कुठेच लिहिले न्हवते. मग आता काय, पुढे जायचे कसे.

काही जाणकार लोकांच्या सल्याने आम्ही ठरवले कि मराठी मंडळाच्या letter हेड वर application करायचे. ५ जुलै पर्यंत इंडिगो एअर लाइन चे quotation आले. आमची त्यांच्या बरोबर मिटिंग झाली, पण त्यांच्या कडून असे लक्षात आले की राज्य सरकारच्या परवानगी साठी ते काही मदत करणार नाहीत. कुठलीही एअर लाइन कंपनी महाराष्ट्र मध्ये विमान लावण्या साठी उत्सुक नव्हती. ज्या प्रकारे राज्या मध्ये कोरोना पसरत होता, त्या प्रमाणे परदेशातून कोणीही येऊन अजून याची वाढ होऊ नये असे राज्य सरकारचे विचार असावेत, म्हणून महाराष्ट्राच्या विरोधात कोणी बोलत नव्हते.

आमची परत मिटिंग झाली आणि मंडळाकडून जाहिरात कशी करायची आणि तिकीटाची किंमत किती लावायची. आम्हाला बघायचे होते खरेच किती लोक जाण्यासाठी या किमती मध्ये उत्सूक आहेत. मग आमच्या रोज मिटिंग चालू झाल्या, कधी zoom वर तर कधी google meet वर. आणि १० जुलै पर्यंत असे लक्षात आले कि भरपूर जण जाण्या साठी तयार आहेत. मग त्या वेळा मध्ये आम्ही इंडिगोकडून विमानाचा स्लॉट बुक केला २१ जुलै दम्माम-पुणे. आता आम्हाला dead लाइन होती १५ जुलै पर्यंत राज्य सरकारचे संमती पत्र घेऊन यायचे. म्हणजे १९ जुलै पर्यंत बाकी ऍथॉरिटी जसे GAKA, इंडियन एम्बसीसी आणि एअरपोर्ट फॉर्मॅलिटीएस ची संमती मिळेल अशी सगळी आखणी झाली.

आता फॉर्म कसा भरायचा Annexure I II III कसे भरायचे ते चर्चां मधून कळले. आम्ही SAMMMKD ला रेप्रेझेन्ट करून हा फॉर्म भरला. पण ही काही आमची कंपनी नव्हती किंवा जे जाणारे लोक होते ते काही आमचे कामगार पण नव्हते. मग ह्या सरकारच्या अटी मध्ये आपण बसणार कसे. आमचे मंडळ हे रजिस्टर पण नव्हते. पण ठीक आहे, जे काय होईल ते बघू म्हणून आम्ही फॉर्म सबमिट केले. एकीकडे रोज ई-मेल आणि विचारपूस ह्याचा ढीग पडायला लागला होता, आमची रेजिस्ट्रेशन ची प्रोसेस चालू होती. काही लोकांनी विश्वासाने पैसे पण भरण्यास सुरवात केली. अनेक लोक कामाला लागली, जणू काही मंडळाचा एखादा कार्यक्रम आहे. सगळ्यांचा एक प्रमुख प्रश्न आपली २१ जुलैला पुण्यात विमान जाईल ना?

१७ जुलै शुक्रवार आम्ही सगळ्यांनी अशा सोडून दिल्या आता दुसरा काही मार्ग निवडायला पाहिजे असे सगळ्यांचे मत पडले. पण चमत्कार झाला रात्री अकरा च्या सुमारास राज्य सरकारचे approval आले. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला, आता परत कामाला लागा आणि रेजिस्ट्रेशन पूर्ण करा. कारण तुम्ही १ प्रवासी घ्या नाहीतर १७४ घ्या इंडिगो ला पैसे तेवढेच द्यायचे होते. त्यामुळे परत लोकांना कॉल करून जास्त जास्त सीट भरतां येतील ते आम्हाला बघायचे होते. सगळे शुक्रवारी शांत झोपले आणि आता आपले flight जाणार हे नक्की झाले. पण अजून पुढे काय वाढून ठेवले आहे हे कोणालाच माहित नव्हते.

शनिवार १८ जुलै, आम्ही चौघे इंडिगो च्या ऑफिस मध्ये सकाळी पोहोचलो. तिथल्या माणसाने आम्हाला राज्य सरकारची संमती पत्र दाखवले, पण अजून एक अडथळा होता. जरी राज्य सरकार म्हणजेच मुंबई कलेक्टर ऑफिस मधून संमती मिळाली होती तरी विमान पुण्यात उतरणार होते. म्हणजेच पुणे कलेक्टर ऑफिस मधून परवानगी येणे अपेक्षित होते. बघून सांगतो आणि सांगून बघतो अशी वाक्य आम्हाला सगळीकडून एकायला येत होती. मगच पुढे भारतीय दूतावासात आमचे अँप्लिकेशन जमा केले जाणार होते. आमच्या पुढे अजून एक अडथळा होता, जर आम्हाला २० जुलै दुपारी १२ वाजे पर्यंत सगळ्या डिपार्टमेंट मधून परवानगी मिळाली नाही तर आमचा विमानाचा स्लॉट दम्माम-पुणे हा कॅन्सल होणार होता. मग पुढचा स्लॉट ८ ऑगस्ट ला आहे असे कळले. म्हणजे परत सगळी procedure करा आणि परत ह्या चक्रात अडक. सगळ्यांनी परत जोर लावला ज्यांची जिथे ओळख असेल त्याचे धागे दोरे वापरून आमची परिस्थिती सर्वाना समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयन्त केला. पुण्यातील नोडल ऑफिस ला हॉटेल बुकिंग झाले आहे ह्याची खात्री पाहिजे होती. म्हणून संमती मिळण्यासाठी उशीर होत होता. आम्ही मग पुण्यातल्या pride हॉटेल मध्ये पैसे भरले आणि त्यांना परत ई-मेल करून सांगितले. शेवटी शनिवारी दुपारी कलेक्टर पुणे ह्यांच्या कडून संमती मिळाली आणि आमचा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. आता आम्हाला १००% खात्री झाली कि आमचे हे चार्टर विमान उडणार.

आता पुढचे काम इंडिगो कंपनीचे होते. आम्ही पण भारतीय दूतावासात सांगून ठेवले होते, जशी आमची फाईल त्यांच्या कडे जाईल तसे जास्त विलंब ना करता ते आम्हाला संमती देतील. १९ जुलै ला मध्यरात्री दूतावासातून संमती मिळाली. झाले एकच दिवस आणि काम भरपूर. सगळ्यांची फायनल लिस्ट २० जुलै च्या दुपार पर्यंत इंडिगो ला पाठवायची होती. मगच पुढे तिकीट देऊ शकणार होतो. १९-२० जुलै ला इतके फोन येत होते. बहुतेक आत्ता पर्यंत आम्ही इतक्या लोकांचे एवढे फोन कधीच घेतले नव्हते. एवढे प्रश्न इतक्या शंका, आम्ही पण हे काम पहिल्यांदीच करत होतो. तिकीट काढून प्रवास करणे सोपे आहे, पण एखादे चार्टर विमान लावून सगळ्या document ची पूर्तता करून घेणे हे अवघड काम पूर्ण करणे हे आवश्यक होते.

फायनली २०जुलै ला दुपारी ३ वाजता अंतिम यादी इंडिगो ला पाठवली आणि साधारण दोन तासांनी आम्हाला त्यांनी ग्रुप बुकिंग ची यादी पाठवली. रात्री ८ वाजे पर्यंत सगळ्यांना तिकीट वाटण्यात आली. आणि सगळ्यांना उद्या म्हणजेच २१ जुलै ला सकाळी ६ वाजे पर्यंत दम्माम एअरपोर्ट ला भेटू. आम्ही अंतिम यादी मध्ये १६५ जण झालो. ८ गर्भवती महिला १० सिनियर सिटीझन आणि जवळपास १०० हुन अधिक नोकरी गेलेले ३-४ महिने पगार नसलेली माणसे. ह्या लोकांपैकी केवळ ५-१० लोक सोडली तर कोणीही एकमेकांना ओळखत नव्हते. ह्यात सगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या आर्थिक वर्गाची लोक समाविष्ट होती. आमच्या वर ह्या सर्वानी विश्वास ठेवण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक महाराष्ट्र मित्र मंडळ आणि दुसरे पैसे जमा करण्या साठी नेमलेला ट्रॅव्हल एजन्ट. आम्ही आमच्या जाहिराती मध्ये स्पष्ट लिहिले होते कि ज्याला refund पाहिजे त्याला सगळे पैसे परत दिले जातील. म्हणूनच लोकांनी विश्वास ठवून पैसे नेटबँकिंग मार्फत जमा केले.

आमच्या ह्या सर्व प्रोजेक्ट मध्ये मराठी मंडळाचे अनेक कार्यकर्ते, मुंबई, पुण्यात असणारा मित्र परिवार, ट्रॅव्हल एजन्ट ची काही माणसे, इंडिगो एअर लाइन मधली माणसे, सामाजिक आणि राजकीय वर्गातील माणसे, पोलीस आणि महानगर पालिकेमधील माणसे व अशी अनेक जण जी आमच्या हा प्रोजेक्ट यशस्वी होऊदेत म्हणून प्रार्थना करणारी. या सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.

टीप: या लेखात फक्त हा प्रोजेक्ट कसा पूर्णत्वास गेला हे याची माहिती दिली आहे. कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून सर्व प्रकारच्या मदतनीसांचा नामोल्लेख टाळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com