चिखलाचा ज्वालामुखी अन हजार वर्षं सुरू असलेली आग.. कधी पाहिलीये का?

Mud-Volcano
Mud-Volcano

आठ ते 13 मे या कालावधीत कझाकिस्तानमध्ये सुटी आहे, हे कळल्यावर मी माझा आवडता छंद-प्रवास, पुन्हा सुरू करण्याचा विचार केला. गेल्या वर्षी जरा थोडा प्रवास थांबलाच होते. पुन्हा प्रवास प्रकरण सुरू करायचं झालं, तर जागा-देश भन्नाटच हवा, या विचारात मी कझाकिस्तानवरून कुठे जाऊ शकतो याचा शोध घेतला. व्हिसाची कंटाळवाणी प्रक्रिया टाळून मी कुठे जाऊ शकतो, हे शोधलं, तर माझ्यासमोर उझबेकिस्तान, जॉर्जिया आणि अझरबैजान या तीन देशांचे पर्याय समोर होते. 'जॉर्जियामध्ये भारतीयांबद्दल द्वेष वाढत आहे आणि इथे ई-व्हिसावर आलेल्या भारतीयांना सहसा प्रवेश करू दिला जात नाही', असं वाचनात आलं. त्यामुळे जॉर्जियाचा पर्याय निघून गेला. उझबेकिस्तानमध्येही खूप जागा आहेत बघण्यासारखा पण चार दिवस पुरणार नाहीत, हे लक्षात आल्यावर माझ्यासमोर फक्त अझरबैजानचाच पर्याय शिल्लक होता. त्यामुळे मी तसा नाराजच होतो; पण प्रवास महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक देश विशेष असतो, असं स्वत:ला समजावत मी 'गुगल'वर अझरबैजानची माहिती घेतली.

पुढच्या दोनच मिनिटांमध्ये माझी अझरबैजानबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली. विज्ञान आणि भूगोलाचा शिक्षक असल्याने, तसेच भूगोल हा विषय लहानपणापासून प्रचंड आवडीचा असल्याने मला ज्वालामुखींबद्दल प्रचंड आकर्षण आहे. अझरबैजानची माहिती घेताना असे कळले, की इथे चिखलाचे जागृत ज्वालामुखी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. इथे रहस्यमय आगीचा डोंगरही आहे. गेल्या एक हजार वर्षांपासून इथली आग सुरूच आहे. या दोन गोष्टी मला अझरबैजानबद्दल आणि माझ्या प्रवासाबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी पुरेशा होत्या.

इंडोनेशियामध्ये कामाला असताना मी तेथील तिसऱ्या क्रमांकाचा उंच जागृत ज्वालामुखी म्हणजेच माऊंट अगुंगवर गेलो होतो. याच ज्वालामुखीचा गेल्या वर्षी उद्रेक झाला होता. आता मी चिखलाचा ज्वालामुखी पाहिला, तर ज्वालामुखीच्या तीनपैकी दोन प्रकार आपण पाहिले, असं काहीतरी होईल हा विचार आला आणि मी तिकीट बुक केले.

तिसऱ्या प्रकारच्या ज्वालामुखीला पृष्ठीय ज्वालामुखी म्हणतात. हे प्रामुख्याने अमेरिकेच्या हवाई बेटांवर आढळून येतात. इथे प्रत्यक्ष लाव्हा रस बाहेर पडताना दिसतो आणि आयुष्यात एकदातरी हा तिसरा प्रकार पाहणं होईलच; पण याआधी चिखलाचा ज्वालामुखी एकदा पाहून घ्यावा, या विचाराने मी विमानात बसलो.

अझरबैजानची राजधानी बाकू इथे रात्री दहा वाजता उतरलो. ई-व्हिसामुळे पटकन विमानतळाच्या बाहेर येऊन पब्लिक बसने बुक केलेल्या हॉटेलवर पोचलो. हॉटेलकडे जात असताना बाकू शहर न्याहाळत होतो.. खनिज तेलाने संपन्न असलेला देश आणि त्या देशाची राजधानी पाहून डोळे दिपून गेले. मुस्लीम बहुल देश असला, तरीही विचार आणि राहणीमान यामध्ये असलेली आधुनिकता चटकन दिसते. बाकू हे शहर इतर युरोपीय शहरांसारखेच आधुनिक, स्वच्छ, नीटनेटके आहे. इथे इंग्रजी खूप मोठ्या प्रमाणावर बोलले जाते.

कॅस्पियन समुद्र किनारी वसलेल्या नव्या-जुन्या इमारतींनी नटलेले सुंदर शहर पाहताना नकळत भारतातील बकाल शहरांशी तुलना होते. बाकूमधील अनेक नव्या इमारती इतक्‍या सुंदर आहेत, की त्या सगळ्या प्रिंट काढून बसविल्यासारखाच भास होतो. रात्री 10.30 ला हॉटेलमध्ये चेक-इन केले. लगेचच मी चिखलाच्या ज्वालामुखी आणि आगीच्या डोंगरावर जाण्याची चौकशी केली. थोडेफार पर्याय पाहून त्यातल्या त्यात स्वस्त असलेली 30 डॉलरवाली प्रायव्हेट टूर निवडली आणि रूमवर येऊन झोपलो.

सकाळी उठून, ब्रेकफास्ट करून 9.00 वाजता गाईड गाडी घेऊन आला. हे ज्वालामुखी शहरापासून अंदाजे 20 किलोमीटरवर आहेत. तिथे जायला रस्ता कच्चा आहे. कारण इथे जाण्यास अझरबैजानने औपचारिक बंदी घातली आहे. कारण हा ज्वालामुखी जागृत आहे आणि त्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो. तरीही काही गाईड्‌स अनौपचारिकरित्या पर्यटकांना घेऊन जातात.

बाकू शहराच्या दोन-तीन किलोमीटर बाहेर पडलं, की लक्षात येतं.. की खनिज तेलावर पूर्णपणे आधारित असलेल्या या परिसरात प्रचंड प्रमाणात सतत तेल उत्खनन सुरू असतं. जागोजागी मोठमोठी यंत्रे सतत सुरू असलेली दिसतात. साधारणत: तासाभरानंतर आमच्या गाडीने मुख्य रस्ता सोडला आणि आम्ही एका पायवाटेला लागलो. लगेचच उजाड व उनाड वाळवंटासारखा पृष्ठभाग दिसू लागला. थोड्याच वेळात आमची गाडी एका मोठ्या टेकडीसमोर आली आणि गाईडने गाडी त्या टेकडीवर चढविली. टेकडी पार करून तिच्या माथ्यावर खूप मोठा सपाट पृष्ठभाग आम्हाला दिसला.

अंदाजे 500 मीटर अंतरावर छोट्या-छोट्या टेकड्या होत्या. प्रत्येक टेकडीच्या टोकावरून चिखलाचा प्रवाह हळूहळू बाहेर येत होता. हे सर्व बघून मला स्वत:वर भानच ठेवता आले नाही. मी गाईडला गाडी थांबविण्यास सांगितले. तो म्हणाला, 'आधी आपण मोठ्या टेकडीवर जाऊ आणि येताना या छोट्या टेकड्या पाहू!' मोठी टेकडी पलीकडे होती आणि इतरांपेक्षा मोठी होती. त्या टेकडीवर ज्वालामुखीचा स्फोट झाला होता.

त्या टेकडीच्या 10-15 फूट आधी गाडी थांबविली. मी लगेच बाहेर येऊन धावतच वर गेलो. टेकडीच्या माथ्यावरून सतत बाहेर येणारा चिखल पाहून क्षणभर मला विश्‍वासच बसला नाही. टेकडीच्या टोकावर खड्ड्यासारख्या जागेतून सतत चिखलाच्या उकळ्या फुटत होत्या. अझरबैजानमधील ज्वालामुखीचा चिखल थंड आहे, असं मी आधीच वाचल्याने मी न घाबरता त्या खड्ड्यात चिखलाच्या उकळीत हात घातला. जमिनीच्या आतून येणारा चिखल माझ्या हाताला लागत होता. उत्सुकतेपोटी मी माझा हात आणखी आत घातला. हात खोल खोलच जात होता. आत मोठा खड्डा होता. माझा हात कोपरापर्यंत आत गेला, तेव्हा गाईडने मला थांबविले.

चिखलाचे ज्वालामुखी तयार होण्याचं कारण म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील भूपट्ट्यांच्या हालचाली! या सततच्या हालचालींमुळे आणि उष्णतेमुळे जमिनीतील गरम पाणी भूपृष्ठातील मातीत मिसळते आणि जमिनीत असणारे वायू, प्रामुख्याने मिथेन या चिखलात मिसळतात आणि हा चिखल बाहेर पडतो. जगात सगळ्यांत जास्त चिखलाचे ज्वालामुखी अझरबैजानमध्ये आढळून येतात. गोबस्तान नावाच्या राष्ट्रीय पार्कमध्ये हे ज्वालामुखी पर्यटकांसाठी अनौपचारिकरित्या उघडे आहेत; पण अझरबैजानमधील चिखलाचे प्रचंड ज्वालामुखी पाहण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. या दोन्ही ज्वालामुखींचा उद्रेक कधीही होऊ शकतो.

जगातील सर्वांत मोठा चिखलाचा ज्वालामुखी इंडोनेशियात आहे. यातून बाहेर पडणारा चिखल सहसा थंड असतो; पण इंडोनेशियातील ज्वालामुखीमधील चिखल गरम असतो.

आपल्या पृथ्वीच्या अंतरंगात सतत चालू असलेल्या घडामोडींचा रंजक पुरावा बघून मला अनोखी उर्जा मिळाल्याचा आनंद झाला होता. विज्ञान आणि भूगोल आवडणाऱ्या शिक्षकासाठी ही एक मेजवानीच होती. या परिसरात साधारणत: पाच-सहा छोट्या टेकड्या आहेत; ज्यातून सतत चिखल बाहेर पडत असतो. सगळ्या टेकड्यांवर जाऊन फोटो काढण्याचं महत्त्वाचं काम मी उरकून घेतलं. नंतर आणखी काही वेळ या परिसरात थांबून निसर्गाच्या चमत्काराचा आनंद घेत राहिलो. थोड्यावेळानं गाईडनं मला निघण्यासाठी खूण केली. 'आता जेवण करायला जायचं आहे', असं तो म्हणाला. आता एवढं सगळं बघितल्यानंतर भूकच लागली नव्हती. पण आणखी एका रहस्यमय जागी जायचं आहे, हे मी विसरूनच गेलो होतो.

ज्वालामुखी बघून मला झालेला आनंद पाहून गाईड म्हणाला, की आपल्याला आगीचा डोंगर बघायला रात्री अंधारात जायंच आहे. अंधारात ती आग आणखी चांगली दिसते. तेव्हा मला आठवलं, की इथलं आणखी एक आकर्षण बाकी आहे. या आगीच्या डोंगराचं वैशिष्ट्य म्हणजे या डोंगराच्या पायथ्याशी आग सतत चालू असते. पाऊस, बर्फ सगळ्या वातावरणात ही आग सतत चालू असते. ही आग गेल्या तीन हजार वर्षांपासून चालू आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यावर माझा फारसा विश्‍वास बसला नाही; पण 13 व्या शतकातील एका फ्रेंच प्रवाशाने त्याच्या पुस्तकात त्या परिसराची नोंद आगीचा परिसर म्हणून केली आहे. तो म्हणतो, की मला इथे खूप ठिकाणी जमिनीवर आगी दिसून येतात.

पुन्हा एकदा माझी उत्सुकता शिगेला पोचली. साधारणत: संध्याकाळी 7.30 ते 8.30 च्या दरम्यान आम्ही त्या डोंगरावर पोचलो. बाकूपासून ही जागा 20 किमीवर आहे. एका उंच डोंगरासमोर आमची गाडी थांबली. त्या टेकडीच्या पायथ्याशी जाण्यासाठी पायऱ्या आहेत. एका मोठ्या भिंतीमुळे पायऱ्यांपर्यंत गेल्याशिवाय आगीच्या ज्वाला दिसत नाहीत. भिंत ओलांडली आणि समोर मोठमोठ्या ज्वाला त्या डोंगरातून निघताना दिसल्या. साधारण 10 मीटरचा डोंगर पायथा आगीच्या ज्वाळांनी घेरलेला होता. मी पुन्हा एकदा पायऱ्या उतरून चटकन खाली गेलो. ज्वाला नीट निरखून पाहिल्यानंतर लक्षात आलं, की त्यांचा रंग केवळ पिवळा आणि निळा आहे. लाल आणि नारिंगी रंगांच्या ज्वाळा इथे नव्हत्या. त्याचा अर्थ म्हनजे इथे होणारे ज्वलन पूर्ण प्रकारचे आहे. तसेच, पायथ्याशी ज्वाला निघत होत्या, तेथे कुठल्याही प्रकारचा पाईप किंवा काडी वगैरे काहीच नव्हतं.. चक्क माती व छोटी-मोठी छिद्रे आणि आगीच्या ज्वाला!

बाकू शहराच्या आजूबाजूला जमिनीत मिथेनचे खूप मोठे साठे आहेत. हा मिथेन वायू हवेतील ऑक्‍सिजनशी संयोग पावतो आणि जळत राहतो. इथपर्यंत सगळं ठीक; पण ही आग नेमकी कशी लागली किंवा कुणी लागली हे मात्र आजही रहस्यच आहे. या बाबतीत काही दंतकथा आहेत; पण त्या फक्त कथाच!

खूप वेळ त्या आगीचं निरीक्षण करत मी पुन्हा गाडीत बसलो. निसर्गांच्या अनेक रहस्यांपैकी एक रहस्य जवळून अनुभवता आलं, याचा आनंद तर होताच; सोबतच एका गोष्टीचं समाधानही वाटलं.. आपल्याकडे कोणत्याही चमत्कारिक जागेचं विज्ञान समजून न घेता धार्मिक ठिकाणात रुपांतर होते, तसे इथे झाले नाही. इथल्या समाजाकडून या जागेच्या वैशिष्ट्याचा वैज्ञानिक विचारच कायम ठेवला गेला, हा विचार नकळतच मनात डोकावून गेला..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com