राजारामपुरीतील डॉल्बी बंद,विसर्जनावेळी कसोटी 

राजारामपुरीतील डॉल्बी बंद,विसर्जनावेळी कसोटी 

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमचा दणदणाट रोखून पोलिसांनी पूर्व परीक्षा पास केली आहे. आता विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य परीक्षेत त्यांची कसोटी लागणार आहे. राजकीय नेत्यांच्या शब्दालाही पोलिसांनी दाद दिली नाही. पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी येथे दाखविलेली खाकीची ताकद नक्कीच पोलिसांच्या कौतुकास पात्र ठरली; पण हीच भूमिका विसर्जन मिरवणुकीत कायम ठेवली पाहिजे. 'सर्वांना एकच न्याय द्या' ही कार्यकर्त्यांची भूमिका योग्यच आहे, हे पोलिसांनी विसरून चालणार नाही. 

राजारामपुरीतील मुख्य मार्गावरील गणेश आगमन मिरवणुकीत हजारो कार्यकर्त्यांनी डॉल्बी सिस्टीमचा आग्रह धरला; मात्र उपअधीक्षक अमृतकरांनी त्यांना हिसका दाखवत यंत्रणाच बंद पाडली. किमान दोन टॉप दोन बेससाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला; मात्र पोलिसांनी त्यालाही नकार दिला. पारंपरिक वाद्यांत मिरवणूक सुरू ठेवा, असा सल्लाही दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गणेश मिरवणूक विना स्पीकरची सुरू करायची काय, असा सवाल केला; मात्र पोलिस त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. अर्थात यापूर्वी दोन टॉप दोन बॉक्‍सला परवानगी देऊनही कार्यकर्त्यांनी अतिरेक केला होता. त्याचाच फटका येथे बसला. 

आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर या दोन्ही आमदारांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. किमान स्पीकर लावण्यास परवानगी द्या, अशी मागणी केली; मात्र तीही पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी धुडकावून लावली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास-नांगरे पाटील यांनीही त्यांची भूमिका कायम ठेवली. राजकीय नेत्यांच्या आश्रयाखालीच कार्यकर्ते डॉल्बी लावत असल्याच्या आजपर्यंतच्या चर्चेला येथे पूर्णविराम मिळाला. मिरवणूक तेथेच थांबविण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला, त्यालाही उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी जुमानले नाही. अखेर रात्री दहानंतर वाद्ये बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मंडळांचे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत जनता बझार चौकात थांबून राहिले. पोलिसांचा फौजफाटा वाढला. वाहतूक कोंडी नको, असे सांगून उपअधीक्षक अमृतकर यांनी सर्व मंडळांना गणपती मूर्ती, ट्रॅक्‍टर, वाद्यांसह तेथून हलविण्यास सांगितले आणि मध्यरात्री चारच्या सुमारास जनता बझार चौक रिकामा झाला. 

पोलिसांनी एकादी भूमिका घेतली, तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय येथे आला. पोलिसांनी काल शाब्बासकी मिळवली; पण आता विसर्जन मिरवणुकीत अर्थात मुख्य परीक्षेत डॉल्बी सिस्टीम लागणार नाही, याचीही जबाबदारी त्यांच्यावरच राहील. राजारामपुरीत डॉल्बी सिस्टीम बंद राहिली तशीच इतर ठिकाणी बंद राहिली पाहिजे. त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांचीच राहील. एकास एक न्याय आणि दुसऱ्यास एक न्याय, असे झाले तर राजारामपुरीतील कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, हेसुद्धा पोलिसांनी विसरून चालणार नाही. 

डॉ. अमृतकरांना पाठिंबा हवा 
ज्या उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी यापूर्वीच्या अपर पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग, निरीक्षक मा. शा. पाटील, निरीक्षक अमृत देशमुख यांची आठवण करून दिली. त्याच डॉ. अमृतकर यांनी आता विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बी सिस्टीम बंद करण्याचे धाडस दाखविले पाहिजे. त्यालाही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तितकाच 'सपोर्ट' केला पाहिजे. किंबहुना आवश्‍यकता भासल्यास रस्त्यावर उतरले पाहिजे, तरच पोलिसांचा उद्देश सफल होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com