उपअधीक्षकांनी डॉल्बीबाबत मित्रत्वाच्या नात्याने केले प्रबोधन 

राजेश मोरे 
रविवार, 27 ऑगस्ट 2017

यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करण्याचा निर्धार पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी घेतला.

कोल्हापूर : डॉल्बी आरोग्यास घातक आहेच, पण तो लावल्याने दाखल होणारे गुन्हे तुमचे करिअर खराब करू शकते, मित्रांनो धोडा उत्साहाला आवर घाला... अशा पद्धतीचे प्रबोधन शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आज शिवाजी पेठेतील मंडळात जावून केले. 

गतवर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत 16 मंडळांनी डॉल्बी लावून ध्वनी प्रदुषण केले होते. त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करण्याचा निर्धार पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी घेतला. नुकत्याच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत डॉल्बी मुक्त करण्यासाठी गुन्हे दाखल झालेल्या त्या 16 मंडळाना चहाला बोलवा. त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने चर्चा करा. असा सल्ला दिला होता. त्याच अनुषंगाने आज पोलिस अधीक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी शिवाजी पेठेतील त्या संबधित मंडळांना भेटी दिल्या. त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी मित्रत्वाच्या नात्याने खुली चर्चा करून प्रबोधन केले. 

सकाळी डॉ. अमृतकर यांनी हिंदवी स्पोर्टस्‌, दयावान, झुंझार, बीजीएम स्पोर्टस्‌ आदी तालीम मंडळांना भेटी दिल्या. त्यावेळी एक अधिकारीच नव्हे तर एक डॉक्‍टर या नात्याने कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. डॉल्बी लावल्याने होणारे ध्वनी प्रदुषण त्याचा आरोग्यावर होणारा परिणामाची सविस्तर माहिती दिली. याबाबत उपस्थित होणाऱ्या शंकाना वैद्यकीय शास्त्रानुसार उत्तरे दिली. इतकेच नव्हे तर डॉल्बीवर मद्य प्राशन करून थिरकरणारी मंडळींची संख्या जास्त असते. यंदाच्या मिरवणुकीत डॉल्बीला फाटा द्या. पारंपारिक वाद्याचा वापर कcरा. एका दिवसासाठी डॉल्बी लावून तरुण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून घेऊ नका. त्यांने त्यांचे करिअर बरबाद होऊ शकते. याचे भान ठेवा असे मैत्रिणपूर्ण चर्चेत समुपदेशन केले. थेट पोलिस उपअधीक्षकच मंडळात आल्याने कार्यकर्त्यांच्यातला उत्साह वाढला होता. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या शब्दाला मान द्या असे आवाहन तरुणांना केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 kolhapur sound pollution awareness