मिरजेत चित्तवेधक गणेशमूर्तींवर भर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 August 2017

मिरज - मिरजेतील गणेश मंडळांनी यंदा देखाव्यांपेक्षा चित्तवेधक मूर्तींवर भर दिला आहे. संतुलन साधणाऱ्या अधांतरी मूर्ती, दहा-वीस फूट उंच मूर्ती, सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी मढवलेले गणपतीबाप्पा अशा वैविध्यपूर्ण मूर्ती यंदाच्या उत्सवात मिरजकरांना पाहायला मिळत आहेत.

मिरज - मिरजेतील गणेश मंडळांनी यंदा देखाव्यांपेक्षा चित्तवेधक मूर्तींवर भर दिला आहे. संतुलन साधणाऱ्या अधांतरी मूर्ती, दहा-वीस फूट उंच मूर्ती, सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी मढवलेले गणपतीबाप्पा अशा वैविध्यपूर्ण मूर्ती यंदाच्या उत्सवात मिरजकरांना पाहायला मिळत आहेत.

उंच मूर्ती बसवू नका, असे आवाहन पोलिस आणि महसूल प्रशासनाने केलेले असतानाही मंडळांनी ते झुगारून लावल्याचे दिसून येते. डॉल्बीवर बंदी आल्याने मंडळांनी उंच व वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींकडे लक्ष वळवले आहे. विशेषतः संतुलन साधणाऱ्या मूर्तींची प्रतिष्ठापना अनेक मंडळांनी केली आहे. कोळेकर मठाजवळ न्यू अजिंक्‍यतारा  मंडळाने आकाशातून मूषकांच्या रथातून पृथ्वीवर अवतरणारा गणेश साकारला आहे. 

कुंभार खणीतील कृष्णेश्‍वर मंडळाने कृष्णलीला करणारा गणेश उभा केला आहे. बागेत पशू-पक्ष्यांसमवेत खेळांत रंगलेला गणेश पाहण्यासाठी गर्दी होत आहे. दिंडीवेशीतील जय भवानी मंडळाने समुद्रमंथन साकारले आहे. संतुलन साधणारी मूर्ती लक्षवेधी ठरली आहे. पाटील तालमीजवळच्या बाल गणेश मंडळाची घंटा वाजवणारी अधांतरी स्वरूपातील गणेशमूर्तीही चित्तवेधक ठरली आहे. ब्राह्मणपुरीतील एरंडोली गेट येथील मिरज विद्यार्थी मंडळाने बागेत रमलेला गणेश साकारला आहे. 

ओंकार गणेश मंडळाचा चंद्रकोरीवर स्वार झालेला गणेश पाहण्यासारखा आहे. नदीवेसमधील न्यू ओंकार मंडळाचा घोड्यांच्या रथावर स्वार गणेश भव्य आणि देखणा ठरला आहे. लोणारी गल्लीतील श्री राम मंडळाने गणपती आणि परशुराम यांचे युद्ध साकारले आहे. दोन्ही मूर्ती अधांतरी स्वरूपातील असल्याने लक्षवेधी बनल्या आहेत. 
मंगळवार पेठेत परंपरेप्रमाणे २१ फुटी गणेशाची  प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कर्मवीर चौकातील श्रीमंत महागणपती मंडळानेही २१ फूट उंचीच्या भव्य मूर्तीची परंपरा कायम ठेवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 miraj ganesh ustav