हलगी, ताशांचा कडकडाट अन्‌ घुमकं, ढोलाचा नाद 

हलगी, ताशांचा कडकडाट अन्‌ घुमकं, ढोलाचा नाद 

कोल्हापूर  - नायलॉन, सूत घेऊन चामड्याच्या दोरीला करकचून पीळ द्यायचा. हा पीळ इतका कठीण करायचा की, चामडे किंवा फायबर त्यातून सुटता कामा नये. शेवटाला गाठही अशी बसवायची की, वाजवताना ऐनवेळी ती सुटली नाही पाहिजे. मग लोखंडी कडे घ्यायचे. कुठे तडा गेलेला नाही ना, हे एकदा फिरवून ते पाहायचे. मग चामडे किंवा फायबर त्यावर चढवायचे. फायबर लवकर बसविता येते; पण चामड्याला ताण देऊन ऍल्युमिनियम, स्टीलच्या ड्रमवर बसवायचे म्हणजे मी मी म्हणणाऱ्यांचा कस लागतो. दोरी, वादी हुकात ओवून ती लोखंडी कड्यावर अडकवायची, यासाठी हवी मनगटात ताकद. छातीतही दम पाहिजे. मग चामड्यावर अगदी दाबून शाईचा डाग लावायचा. शाई वाळेल तसा हा डाग व्यवस्थित करायचा. इतकं सगळं झालं की, ढोल, हलगी, ताशा तयार. 

ही वाद्यं तयार करणाऱ्यांची कसरत खरे तर 15 मिनिटांची. फायबरपासून ढोल किंवा ताशा लवकर होतो; पण चामडे चढवून वाद्य तयार करायला थोडा वेळ लागतो. पापाची तिकटी, बिंदू चौकासमोरील बागवान गल्लीत पारंपरिक वाद्ये तयार करण्याची अक्षरश: लगबग सुरू आहे. नवीन वाद्ये तयार करणे, जुनी वाद्ये दुरुस्त करणे, जुन्या वाद्यांना चामड्याच्या वाद्या, सुताच्या किंवा प्लास्टिकच्या दोऱ्या लावणे, फायबर, चामड्याची थाळी बदलणे ही कामे सुरू आहेत. वर्षभर भजनी मंडळांचा राबता असणारी ही दुकाने गणेशोत्सवात फुलून गेली आहेत. अगदी ही वाद्ये विकत घेणे किंवा दुरुस्तीसाठी कोल्हापूर जिल्हा, परिसर तसेच कोकणातून ढोल-ताशा पथक, भजनी मंडळांतील कलाकार पापाची तिकटी, बागवान गल्लीत आले आहेत. 

डॉल्बीच्या विरोधात बऱ्यापैकी वातावरण तयार झाले आहे. शिवाय डॉल्बी सर्वांनाच परवडेल असे नाही. डॉल्बीचे दुष्परिणामही अनेकांना ठाऊक आहेत. त्यामुळे हलगी, लेझीम, घुमकं, झांज, ताशे, ढोल, लाकडी ढोल, शाळेतील ड्रम्स, कच्ची, झांज पथकातील ढोल, बोंगो अशा पारंपरिक वाद्यांना अलीकडे मागणी वाढली आहे. डॉल्बीच्या दणदणाटापेक्षा चर्मवाद्यांतून निर्माण झालेला नाद हा कर्णमधूर असतो. शिवाय या वाद्यांवर धरलेला ताल हा डॉल्बीपेक्षाही सरस, म्हणून तर अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या वाद्यांना पसंती दिली आहे. 

ढोल, ताशांबरोबरच लेझीम पथकेही मिरवणुकीत जान आणतात. युवकांबरोबरच महिला, युवतींची लेझीम पथके तयार झाली आहेत. आज बाजारात लाकडी दांड्याबरोबर स्टील, ऍल्युमिनियमचा दांडा असलेली लेझीमही मिळते. लेझीमचा खपही चांगला असल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले. याबाबत सावंता सोनवणे म्हणाले, ""ढोल, ताशासाठी लागणारे फायबर मेरठ (उत्तरप्रदेश) येथून येते; तर चर्मवाद्यांसाठी चामडे हे पंढरपूर, सोलापूर, बार्शीहून मागविले जाते. ताशासाठी लागणारे स्टीलचे भांडे आम्ही पुण्याहून मागवितो. त्यानंतर भांड्यावर स्क्रू बसविणे आदी कामे आम्ही इथेच करतो. अजूनही हलगीला गिऱ्हाईक आहे. बदलत्या काळानुसार वाद्यांचे दर थोडे वाढले आहेत. ढोल, ताशासारखी वाद्ये तयार करण्यासाठी चामडेच वापरले जायचे. फायबरचा दहा-बारा वर्षांपासून वापर होऊ लागला. मंडळांच्या कार्यकर्त्यांना वाद्यांचे दर कमी करून मागण्याकडे कल असतो. गणेशोत्सव हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो.'' 

""चामड्यांपासून तयार केलेल्या वाद्यांतून उत्कृष्ट नादाची निर्मिती होते. आवाजाची तीव्रता अतिशय मोठी नसल्याने ध्वनी प्रदूषण होत नाही. पूर्वीप्रमाणेच या वाद्यांना आजही पारंपरिक कलाकारांबरोबर युवकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही वाद्ये तयार करण्यासाठी लागणारे फायबर, चामडे, स्टील अन्‌ ऍल्युमिनियमचे ड्रम्स बाहेरून मागवावे लागतात. तरीही जशी ऑर्डर असेल तसे वाद्य तयार करून दिले जाते. पारंपरिक वाद्यांविषयी चांगली जनजागृती होत आहे.'' 
- सावंता बळीराम सोनवणे. 

""गणेश चतुर्थीच्या आगमनाआधी आम्ही हार्मोनियम, ढोलक, पखवाज, तबला, टाळ ही वाद्ये तयार करून ठेवतो. जुनी वाद्ये दुरुस्त करून देतो. अलीकडच्या काळात लोक पुन्हा पारंपरिक वाद्यांकडे वळले आहेत. अगदी युवकांनासुद्धा ही वाद्ये भुरळ घालत आहेत. या वाद्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ती आपल्या नैसर्गिक नादाने चांगली वातावरणनिर्मिती करतात. ही वाद्ये वाजू लागली म्हणजे सर्वजण ताल धरतात. यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या काळात या वाद्यांचे प्रमाण नक्कीच चांगले असेल.'' 
- अमित जाधव, दिलबहार हार्मोनियम वर्क्‍स. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com