
"घर पहावे बांधून' या म्हणीची बांधकाम व्यावसायिकांना पावलोपावली आठवण यावी, अशी अस्थिर परिस्थिती या क्षेत्रात निर्माण झाली आहे. सळी, सिमेंट आणि मजुरी, वीट, वाळूपासून ते किरकोळ साहित्यापर्यंत बाजारभाव अस्थिरतेच्या चक्रव्यूहात अडकला आहे. या साहित्याचे दर का वाढवले जातात आणि ते कमी का होतात, याचे उत्तरच कुणी देत नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन व्यावसायाला स्थिरता द्यावी, तर वेध घेताच येत नाही, अशी अडचण झाली आहे.
घराचे काम अचानक थांबवावे लागले, गृह प्रकल्पाची गती ठप्प झाली... कारण काय? वीट दर अचानक 30 हजारांवर पोहचला, सिमेंटने 370 चा टप्पा गाठला. सळी 55 ते 60 रुपये किलो झाली. का झाली? ती कमी होईल की अजून वाढेल? या प्रश्नांची उत्तरे कुठल्याच यंत्रणेकडे नव्हती. 1300 ते 1400 रुपये प्रति चौरस फूट खर्चाच्या हिशेबाने हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी प्रत्यक्षात 1500 रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असेल, तर तोटा सहन कसा करायचा? त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली. सरकारने हस्तक्षेप करावा, या क्षेत्रातील मोनॉपॉली मोडून काढावी, कंपन्यांवर नियंत्रण असावे, अशी जाहीर मागणी करण्यात आली.
शासन गोरगरीब, प्रत्येकाने घर असले पाहिजे, अशी घोषणा करते. पैसे किती देते? पंतप्रधान आवास योजनेतून ग्रामीण भागात मिळतात 1 लाख 20 हजार. प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च किती? त्यामुळे केवळ प्रकल्पच नव्हे, तर आपले छोटेसे घरटे बांधावे, असे स्वप्न पाहणाऱ्यांनाही दणका बसला आहे. दुसरीकडे वीट दरात मोठी वाढ झाली आहे. बांधकाम मजुरी वाढते आहे. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात त्याचा बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम संभवतो आहे. कोरोना संकटानंतर जोरदार गतीने बांधकाम वाढले होते, त्यालाही खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दराचा तक्ता
महिना | सिमेंट (53 ग्रेड, टॉप कंपनी) | सळी (हजार रु) |
जानेवारी 2019 | 330 (रु. प्रति पोते) | 40 |
जानेवारी 2020 | -- | 40 |
मे 2020 | 350 | 48 |
डिसेंबर 2020 | 370 | 58 |
फेब्रुवारी 2021 | 325 | 60 (सध्या 55 हजार) |
दृष्टिक्षेप
मजुरी वाढली
वीट बनवण्यासाठी माती, कामगारांची मजुरी, वीट मागणी... सारेच एकदम वाढल्याने दरवाढ अटळ होती. भट्टीवर वीट दर पाच हजारच्या लोडला 29 ते 30 हजार रुपये आहे. डिझेल दरवाढीने भाडे वाढले आहे. एक हजार वीट थापायला आधी मजुरी 600 ते 700 होती. ती 800 झाली. माप उचलणे, भट्टी लावणे या साऱ्याची मजुरी वाढली आहे.
- उत्तम जगदाळे, वीट व्यावसायिक, हरिपूर
कंपन्यांच्या मोनॉपॉलीचा परिणाम जाणवतो
बांधकामात साहित्याच्या दरातील चढ-उतार अस्थिर आहे. त्याची कारणेही स्पष्ट केली जात नाहीत. काही महिन्यांत दरवाढीने प्रतिचौरस फुटाला 150 रुपये खर्च वाढला. आता पुन्हा थोडा दर खाली आला आहे, पुन्हा कधी वाढेल, याची माहिती नाही. व्यावसायात मोठ्या अडचणी येत आहेत. शासनाचे धोरण सर्वांना परवडणारे घर असावे असे आहे, त्याला मारक परिस्थिती आहे. कंपन्यांच्या मोनॉपॉलीचा परिणाम जाणवतो आहे. केंद्राने यात लक्ष घातलेच पाहिजे.
- दीपक सूर्यवंशी, बांधकाम व्यावसायिक
पुढे काय होईल, सांगता येणार नाही
सळीचे प्रतिकिलोचे दर कंपनीनुसार 50 ते 60 रुपयांपर्यंत गेले होते. ते पुन्हा 45 ते 55 रुपयांवर आले आहेत. टाटा स्टील 60 रुपये, जीएसडब्ल्यू 55 रुपये, राजुरी स्टील 51 रुपयांवर होते. ते पाच रुपये कमी झाले आहेत. कच्च्या मालाची कमतरता असल्याने दर वाढले होते. ते पूर्ववत झाले आहेत. पुढे काय होईल, सांगता येणार नाही.
- नितीन शहा, स्टील व्यावसायिक
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.