मोर्चा स्थगित केल्याचा ‘मेसेज’ पाठविणाऱ्या पोलिस निरीक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 August 2018

मोर्चा स्थगित केल्याचा ‘मेसेज’ पाठविणारे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही समाजाने केली आहे.

कोल्हापूर - ‘कोल्हापुरातील मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकार पोलिसांवर दबाव आणून मोडून काढणार असेल, तर मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्याबाहेर पडू देणार नाही. आंदोलकांवर दबाव आणू नका. अन्यथा अनुचित प्रकार घडेल,’ असा इशारा सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आला. मोर्चा स्थगित केल्याचा ‘मेसेज’ पाठविणारे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही समाजाने केली आहे.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री मराठा क्रांती ठोक मोर्चा फोडण्याचे काम करत असून, पोलिस दलावर दबाव आणत आहेत. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात कोणी येऊ नये, असे त्यांचे षड्‌यंत्र आहे. नोटिसा देऊन ते थांबलेले नाहीत. वैयक्तिक फोन करून दसरा चौकात न येण्याचे सांगत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो.’’

दिलीप देसाई म्हणाले, ‘‘पोलिस आडमुठे धोरण घेत आहेत. पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांनी आंदोलन स्थगित केल्याचे ‘मेसेज’ पाठवले आहेत. आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उलट, आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली आहे. पोलिस दहशत निर्माण करत असले, तरी बांधवांनी न घाबरता मोर्चात सहभागी व्हावे. राजारामपुरी, कळंबा, वडणगे, कसबा बावड्यातील बांधवांना आंदोलनाच्या ठिकाणी न येण्याचा पोलिसांचा फतवा आम्हाला मान्य नाही. मोर्चाला गालबोट लागले, तर त्याला जबाबदार पोलिस अधीक्षक राहतील. मोर्चाचे नियोजन पोलिस प्रशासनाने अद्याप केलेले नाही. पार्किंग, बॅरिकेड्‌सबाबत चर्चा केलेली नाही. आम्ही मात्र त्याची माहिती दिली आहे.’’

वसंत मुळीक यांनी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच लष्करातील निवृत्त अधिकारी व वीरमाता येणार असल्याचे सांगितले.

हर्षल सुर्वे म्हणाले, ‘‘पोलिस कर्मचाऱ्यांकडून आम्हाला नोटिसा देण्याचा प्रयत्न झाला. त्या नोटिसा आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणावर ठेवा, असे सांगितले आहे. आमचा मराठा बांधवांवर विश्‍वास आहे. ते मोर्चा यशस्वी करणार, याची खात्री आहे. त्यांनी ठोक मोर्चाने म्हणजेच वाजतगाजत व शासनविरोधी निषेधाच्या घोषणा देत सहभागी व्हावे.’’ 

रवींद्र पाटील म्हणाले, ‘‘पोलिसांनी आम्हाला गटाने गावात येऊ नका. गावातच थांबा, असा निरोप दिला आहे.’’ स्वप्नील पार्टे यांनी पालकमंत्र्यांना कोल्हापुरात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला. 

वकील पाठीशी
मोर्चाच्या ठिकाणी पोलिसांनी मराठा बांधवांची अडवणूक केली, तर त्यांच्या मदतीसाठी बार असोसिएशनचे वकील मदत करतील, अशी माहिती अध्यक्ष ॲड. प्रशांत चिटणीस यांनी दिली. दसरा चौकात वकील थांबणार आहेत. खंडपीठांतर्गत पाच जिल्हे बंदमध्ये सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पार्किंग ठिकाणे गैरसोईची
शेंडापार्क, ताराराणी चौक, पंचगंगा नदी येथे पार्किंग केले आहे. आंदोलकांची दमछाक व्हावी. त्यांनी दसरा चौकात येऊच नये, यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप समाजातर्फे केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand of suspension of Police Inspector Audumbar Patil