
इचलकरंजी - "एक मराठा-लाख मराठा' अशी गर्जना करीत आज महिलांनी थाळीनाद करीत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. सकल महिला मराठा समाजातर्फे हे आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले.
इचलकरंजी - "एक मराठा-लाख मराठा' अशी गर्जना करीत आज महिलांनी थाळीनाद करीत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. सकल महिला मराठा समाजातर्फे हे आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले. आरक्षण मिळेपर्यंत यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
मराठा आरक्षणप्रश्नी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला समाजातील विविध घटकांनी पाठिंबा दिला. आज सकल मराठा महिला समाजातर्फे थाळीनाद करीत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हातात लाटणे घेऊन काढलेल्या या महिलांच्या मोर्चाने मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आता सुटका नाही, असा इशाराच शासनाला दिला.
हातात भगवा झेंडा व डोक्यावर भगवी टोपी घालून घोषणा देत मोर्चास सुरवात झाली. मोर्चा ठिय्या आंदोलनस्थळी आला. तेथे महिलांनी थाळीनाद करीत शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर मोर्चा प्रांत कार्यालयाकडे गेला. फाटकाजवळ पोलिसांनी मोर्चाला रोखले.
त्यानंतर महिलांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी शिंगटे यांना निवेदन दिले. पाच मुलींच्या हस्ते हे निवेदन सादर करण्यात आले. मराठा आरक्षण देण्याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी रचना मोरे, ज्योती माने, सलोनी शिंत्रे या मुलींनी मनोगतात केली. प्रांताधिकारी शिंगटे यांनी शासनाला याबाबतच्या भावना कळविल्या जातील, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
आंदोलनात मेघा चाळके, प्रियांका आर्दाळकर, पूजा शिंदे, ऋतुजा बेलेकर, संगीता सूर्यवंशी, ऊर्मिला गायकवाड, सुनीता मोरबाळे, राजश्री माने, आशा बेलेकर, सायली लायकर, ध्रुवती दळवाई, सुजाता भोंगाळे, रूपाली कोकणे, लक्ष्मी पाटील, श्वेता मालवणकर आदी सहभागी झाले होते.
तीव्र आंदोलनाचा इशारा
शासनाकडून केवळ घोषणा करण्यात येत आहेत. मराठा आरक्षणासह अन्य प्रश्नांकडे महामोर्चे काढूनही शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. मराठा समाजाला तातडीने आरक्षण देऊन आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. यापुढेही अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.