Maratha Kranti Morcha: कोल्हापूरात बंदमुळे शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 August 2018

कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता.

कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता.

महत्वाच्या चौकामध्ये, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही कंपन्यांच्या इंटरनेट सेवाही मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात आली होती. शहरासह ग्रामीण भागात सर्वच मोबाईल कंपन्यांनी सकाळी आठपासून इंटरनेट सेवा बंद केली आहे. 

कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालये, बस सेवा, वडाप, रिक्षा बंद ठेवण्यात आल्याने सकाळपासूनच रस्ते ओस पडले आहेत. औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांनी आज काम बंद ठेऊन आंदोलनास पाठींबा दिला आहे. मल्टिप्लेक्‍ससह चित्रपटगृहेही आज बंद राहणार आहेत. इंटरनेटसेवा बंद असल्याने रेशनच्या दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद ठेवली आहेत.  

काही ठिकाणी पेट्रोलपंपही बंद ठेवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या दोन दिवसांपासून बाटलीमध्ये पेट्रोल देणे पंपचालकांनी बंद केले होते. शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दसरा चौक हे आंदोलनाचे केंद्र असल्याने येथे अधिक बंदोबस्त आहे. सकाळपासूनच येथे जिल्ह्याच्या सर्व भागातून मराठा बंधाव जमा होत आहेत. येथे व्यासपीठ उभारण्यात आले असून येथे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Bandh in Kolhapur