मी जिंकेन, नव्हे जिंकणारच..!

संभाजी गंडमाळे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

‘मी जिंकेन, नव्हे जिंकणारच’ अशी खूणगाठ मनाशी बाळगून अनेकांनी यशाची शिखरं पादाक्रांत केली. अशाच महिला व मुलींचे प्रतिनिधीत्व रेश्‍मा व त्यांची मुलगी प्रिया खोत करतात. आपल्या मूकबधिर मुलीला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्याचवेळी स्वतः उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी रेश्‍मा यांनी पदर खोचला आहे. या मायलेकींविषयी...

‘मी जिंकेन, नव्हे जिंकणारच’ अशी खूणगाठ मनाशी बाळगून अनेकांनी यशाची शिखरं पादाक्रांत केली. अशाच महिला व मुलींचे प्रतिनिधीत्व रेश्‍मा व त्यांची मुलगी प्रिया खोत करतात. आपल्या मूकबधिर मुलीला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्याचवेळी स्वतः उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी रेश्‍मा यांनी पदर खोचला आहे. या मायलेकींविषयी...

पोटची पोर प्रिया दोन-अडीच वर्षांची झाली आणि ती मूकबधिर असल्याचं लक्षात आलं. खोत दांपत्य थोडसं कोलमडून पडलं. पण, वास्तव स्वीकारून याच पोरीला शिकवून मोठं करायचं, तिला आवडत्या खेळात करिअर करू द्यायचं आणि तिच्या आत्मनिर्भरतेसाठी जे काही करता येईल, तेवढं सारं करायचं, हा निर्धार मनाशी घट्ट करून त्यांनी कोल्हापूर गाठलं. तिळवणी (ता. हातकणंगले) गावचे हे दांपत्य.

प्रिया विशेष मुलगी असल्याचं लक्षात आल्यानंतर तिला तेथीलच एका विशेष मुलांच्या शाळेत घातलं आणि त्या वेळी तिला खेळायला खूप आवडतं, त्यातही ज्यूदो हा खेळ तिला आवडतो, हे लक्षात आल्यानंतर रेश्‍मा यांनी इचलकरंजीत अनेक ठिकाणी त्याची माहिती घेतली. पण, त्यांना पाहिजे तसा वर्ग कुठे सापडलाच नाही. अखेर त्यांनी कोल्हापुरात येऊन प्रियाला ज्यूदो शिकविण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पती संतोष इचलकरंजीत टेक्‍स्टाईल टेक्‍निशियन आहेत. त्यांनीही कोल्हापुरातून रोज अप-डाऊन करण्याचे ठरविले आणि हे दांपत्य कोल्हापुरात आले. 

गेले एक वर्ष प्रिया बाबूजमाल येथील शिवाजी हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अपर्णा पाटोळे यांच्याकडे प्रशिक्षण घेते. सुरवातीला त्यांनाही प्रशिक्षण देताना अडचणी आल्या. त्याचवेळी मग रेश्‍मा यांनीही ज्यूदो खेळायचा निर्णय घेतला आणि प्रियासह त्यांनीही चार महिने सराव केला. प्रिया आता या ज्यूदो वर्गात आणि वि. म. लोहिया मूकबधिर विद्यालयात चांगलीच रमली आहे. तिला ज्यूदोची इतकी आवड की मोबाईलवरही ती ज्यूदोच्या विविध मॅच पाहण्यालाच अधिक पसंती देते. त्याशिवाय, तिच्या चौथीच्या वर्गातही ती नेहमी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होते.

कोल्हापूर जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा नुकत्याच झाल्या. त्यात पहिल्याच प्रयत्नात प्रियाने १३ वर्षांखालील गटात सुवर्णपदक मिळविले आणि तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. आजच या मायलेकी गोंदिया येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाल्या. एकीकडे प्रियाच्या आत्मनिर्भरतेसाठी रेश्‍मा यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जे काही करायचं ते सर्व करण्याची त्यांची तयारी आहे आणि त्याचवेळी पदवी शिक्षण पूर्ण करून त्यांनी उच्चपदस्थ अधिकारी होण्याचा संकल्प केला आहे.

 

Web Title: kolhapur news jagar strishakticha