मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचा झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

येडियुराप्पा यांच्या अंतर्गत वर्तुळातील काही सदस्यांमधील मतभेदांमुळे संतोष हे मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ वर्तवली जात होती.

बंगळूर : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे राजकीय सचिव आणि नातू एन. आर. संतोष यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. काल (ता. २७) रात्री त्यांना उशिरा खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. 

संतोष हे येडियुराप्पांच्या बहिणीचे नातू आहेत. यंदा मेमध्ये त्यांची मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवपदी नियुक्ती झाली होती. झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने डॉलर्स कॉलनी येथील संतोष यांच्या निवासस्थानी ही घटना घडली.

येडियुराप्पा यांच्या अंतर्गत वर्तुळातील काही सदस्यांमधील मतभेदांमुळे संतोष हे मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ वर्तवली जात होती. तुमकूर जिल्ह्यातील तिप्टूर कल्पतरू तंत्रज्ञान संस्थेचे ते अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत. याच जिल्ह्यातील नानाविनाकेरेचे ते रहिवासी आहेत. पाच वर्षांपूर्वी येडियुराप्पा यांचे वैयक्तिक सहायक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. येडियुराप्पांच्या विश्वासातील एक व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या वर्षीच्या सत्तांतर नाटकात राजकीय वर्तुळात ते ठळकपणे समोर आले. काँग्रेस-धजद आमदारांच्या बंडखोर नाट्यात ते सक्रिय भूमिका साकारताना दिसले. ज्यात भाजपला सत्तेत येण्यास मदत झाली.

हेही वाचा- छळामुळे पेटवून घेतलेल्या विवाहितेच मृत्यू -

पण, बंडखोर आमदारांवर नामुष्की ओढवली होती.
येडियुराप्पा मुख्यमंत्री झाल्यावर मात्र त्यांची प्रतिमा खालावली होती. संतोष यांच्यावर येडियुराप्पाविरोधी गोटात सामील झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. पुढील सार्वत्रिक निवडणुकींवर डोळा ठेवून संतोष राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगत असल्याची चर्चा होती.

मी व संतोष सकाळी आम्ही ४५ मिनिटे एकत्र चाललो. कालही (ता. २७) मी पाहिले की ते आनंदी होते. हे का घडले मला माहीत नाही. मी त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करून कारण शोधण्याचा प्रयत्न करीन. त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार होत आहेत. चिंतेचे 
कारण नाही.
- बी. एस. येडियुराप्पा, मुख्यमंत्री

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister B. S. Yediyurappa political secretary and grandson N. R. Satisfaction