पैलवानांच्या मानधनाबाबत हात आखडता 

संदीप खांडेकर
बुधवार, 22 जानेवारी 2020

कोल्हापूर : हिंदकेसरी व महाराष्ट्रकेसरी पैलवानांच्या मानधन देण्यातील क्रूर चेष्टेला अद्याप ब्रेक मिळालेला नाही. नऊ महिन्यांचे मानधन थकलेले असताना, केवळ सहा महिन्यांचे मानधन त्यांच्या पदरात पडले आहे. पैलवानांबद्दलची अनास्था बदलायला शासन तयार नसल्याचे वास्तव कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन मंत्री मल्लांच्या दुर्दशेकडे किती आस्थेने पाहतात, हे पाहण्याची वेळ आता आली आहे. 

कोल्हापूर : हिंदकेसरी व महाराष्ट्रकेसरी पैलवानांच्या मानधन देण्यातील क्रूर चेष्टेला अद्याप ब्रेक मिळालेला नाही. नऊ महिन्यांचे मानधन थकलेले असताना, केवळ सहा महिन्यांचे मानधन त्यांच्या पदरात पडले आहे. पैलवानांबद्दलची अनास्था बदलायला शासन तयार नसल्याचे वास्तव कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन मंत्री मल्लांच्या दुर्दशेकडे किती आस्थेने पाहतात, हे पाहण्याची वेळ आता आली आहे. 

शासनाने हिंदकेसरी व महाराष्ट्रकेसरी पैलवानांना प्रत्येकी सहा हजार रूपये मानधनावर बोळवण केली आहे. हिंदकेसरीचा पैलवानांना किमान 25 हजार आणि महाराष्ट्र केसरी मल्लांना 20 हजार मानधन द्यावे, अशी मागणी झाली होती. पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांनी तशी मागणी कोल्हापुरातील हिंदकेरीच्या मैदानात केली होती. तत्कालीन राज्य सरकारने दोन्ही किताबाच्या मल्लांना 10 हजार रूपये मानधन देण्याचा विचार केला होता. प्रत्यक्षात प्रत्येकी सहा हजार मानधनावर शिक्कामोर्तब झाले. याआधीच्या सरकारने मानधनाच्या रक्कमेतत वाढ करायला नाक मुरडले. त्यातून मल्लांच्या मानधनवाढीच्या अपेक्षेवर पाणी फिरले. महिन्याकाठीचे मानधन त्यांना हातात मिळत नाही.

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या पायऱ्या किती वेळ झिजवायच्या?, असा प्रश्‍न त्यांना आजही पडतो. एप्रिल-2019 पासून पैलवानांचे मानधन थकले होते. आज उद्या मिळेल, या आशेवर त्यांचे समाधानकारक करण्यात येत होते. उशीर का होईना, पैलवानांच्या मानधनाचे धनादेश जिल्हा क्रीडा कार्यालयात आले आहेत. हयातीचा दाखला पैलवानांकडून घेऊन ते त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात येत आहेत. नऊ महिन्यांचे मानधन तटलेले असताना केवळ सहा महिन्यांचे मानधन दिल्याने पैलवानांत नाराजीचा सूर आहे. सहा हजारांत घरखर्च चालायचा कसा?, असा प्रश्‍न त्यांच्यासमोरला आहे. 

आंतरराष्ट्रीय पैलवानांना केवळ चार हजार.... 
राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, दीनानाथसिंह, रूस्तम ए हिंद दादू चौगले, कुस्ती सम्राट युवराज पाटील, हिंदकेसरी विनोद चौगले, महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील-आसगावकर, आनंदा मोरे, संभाजी वरूटे, सुनंदा माणगावे, बंडू पाटील-रेठरेकर, रंगराव चव्हाण, आदींची मानधनाच्या यादीत नावे आहेत. जे मल्ल हयात नाहीत, त्यांच्या पत्नीला मानधन मिळते. वाढत्या महागाईत ते तुटपुंजे असल्याचा तक्रारीचा सूर आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मल्लाच्या हाती केवळ चार हजार रूपये मानधन ठेवले जाते. 

बदललेल्या सत्ता समीकरणांमुळे कोल्हापूर जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळाली आहेत. गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ज्येष्ठ पैलवानांच्या मानधनाची सोडवणूक करावी. महिन्याकाठी त्यांना मानधन देण्याची व्यवस्था करावी, शिवाय मानधनवाढीचा रक्कमेत वाढ करावी. तिन्ही मंत्री याबाबत कोणती पावले उचलणार?,याची उत्सुकता आहे. 
- हिंदकेसरी दीनानाथसिंह 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shaking hands with respect to wrestlers