104 जोडप्यांनी घेतली स्वखर्चातून सप्तपदी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

लग्नाच्या अवाढव्य खर्चाला फाटा देत शासनाने सामूहिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन देण्यासाठी "सप्तपदी' ही सामूहिक विवाह सोहळ्याची योजना आखली आहे

बेळगाव - शासनाच्या "सप्तपदी' सामूहिक विवाहाचा मुहूर्त वेळोवेळी लांबणीवर पडू लागला आहे. त्यामुळे यात नावनोंदणी करणाऱ्या जोडप्यांनी अखेर शासनाचा मुहूर्त न पाहता आपले लग्न उरकून घेत संसार थाटला आहे. कोरोना संसर्गामुळे शासनाकडून सप्तपदीचा मुहूर्त वेळोवेळी लांबणीवर टाकला जात असल्याने अखेर बेळगावातील 110 पैकी 104 जोडप्यांनी स्वतःच मुहूर्त ठरवून आपले लग्न उरकून घेतले आहे.

लग्नाच्या अवाढव्य खर्चाला फाटा देत शासनाने सामूहिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन देण्यासाठी "सप्तपदी' ही सामूहिक विवाह सोहळ्याची योजना आखली आहे. धर्मादाय खात्याच्या सहकार्याने योजनेची अंमलबजावणी केली जाते. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत धर्मादाय खात्याच्या प्रमुख मंदिरात वधू-वराकडील निवडक मंडळींना आमंत्रित करुन हा विवाह सोहळा पार पाडला जातो. गरीब कुटुंबांना विवाह सोहळ्याचा खर्च वाचविण्यासाठी ही योजना लाभदायक ठरली होती. त्यामुळे अनेकांनी या योजनेचा लाभही घेतला आहे. शासनाच्या सप्तपदी योजनेनुसार नावनोंदणी करणाऱ्या जोडप्याचा शासनाकडूनच मोफत विवाह लावून दिला जातो. यासह प्रत्येक दाम्पत्यास 8 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र, वधू-वराच्या वस्त्र आणि इतर खरेदीसाठी 55 हजार रुपये दिले जातात.

हे पण वाचाजोतिबा मालिकेचा वाद आता मुंबईत तो ही राज दरबारी

 राज्यातील 84 मंदिरांमध्ये 3,500 जोडप्यांनी सामूहिक विवाहासाठी नावनोंदणी केली होती. यात बेळगाव जिल्ह्यात 110 जोडप्यांची नोंदणी झाली होती. प्रारंभी 26 एप्रिल रोजीचा मुहूर्त ठरला होता. कोरोनामुळे नंतर तो 24 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आला, पण लॉकडाउन आणि कोरोना संसर्गामुळे तारीख निश्‍चित न करताच तो पुढे ढकलण्यात आला. सामूहिक लग्नाचा मुहूर्तच टळल्यामुळे जिल्ह्यातील 110 पैकी 104 जोडप्यांनी गावातील घरासमोर किंवा मठ आणि मंदिरांमध्ये साध्या पद्धतीने आपले लग्न अखेर उरकून घेतले आहे. तुळशी विवाह जवळ आला असल्याने पुन्हा शासनाकडून नवी तारीख जाहीर होईल याची अनेकजण प्रतीक्षा करत आहेत. मात्र सध्या अशा मुहूर्तावर अनिश्‍चिततेचे सावट पसरले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 104 couple got married at their own expense in belgaum